बाळंतपण हा स्त्रीचा पुनर्जन्म असतो आणि म्हणूनच मातृत्वप्राप्तीसाठी प्रसूतिपूर्व काळापासूनच काळजी घेणे इष्ट ठरते. यासाठी प्रसूतिपूर्व तपासणी व सल्ला अत्यंत महत्त्वाचा असतो. प्रत्येक गर्भवती मातेच्या प्रथम संपर्कात येणारी व्यक्ती ही परिचारिकाच असते. त्यामुळे परिचर्या प्रशिक्षणात प्रसूती व स्त्रीरोग अभ्यासक्रमाला अनन्य साधारण महत्त्व दिलेले असते. प्रशिक्षण यशस्वी रीत्या पूर्ण केल्यावर परिचारिकेची जनरल नर्स व मिडवाईफ अशी नोंदणी त्याच्या राज्याच्या परिचर्या परिषदेद्वारे केली जाते.

अ) गरोदर मातेला आरोग्यसेवा देताना परिचारिकेसाठी आवश्यक असलेली ज्ञान आणि कौशल्य :

 • गर्भवतीची संपूर्ण माहिती मिळविणे.
 • सध्या होत असलेल्या त्रासाची माहिती घेणे.
 • गर्भवतीची संपूर्ण तपासणी करणे
 • रक्त, लघवी या तपासणी साठी संदर्भ सेवा पुरविणे

आ) परिचारिका गर्भधारणेचे निदान करून खालील निरीक्षणे करून नोंदी ठेवते :

 • मातेची उंची व वजन पाहून जोखमीचे निदान.
 • रक्तदाब वाढल्याचे निदान
 • शरीरावरील सुजेचे निदान
 • गर्भाशयाची वाढ योग्य प्रमाणात होत असल्याचे निदान
 • गर्भाच्या स्थितीचे निदान
 • रक्तक्षयाचे निदान
 • लघवीतील दोषांचे निदान (साखर व प्रथिने)
 • गुंतागुंतीचे निदान व त्यावरील प्राथमिक उपचार यासाठी परिचारिका आवश्यक गोष्टी

इ) परिचारिका गरोदर मातेची वैयक्तिक माहिती घेते :

 • मातेचे वय, गर्भारपणाची खेप, बाळंतपणाची खेप, पूर्वीच्या प्रसूतींची वा गर्भपाताची माहिती. शेवटच्या पाळीची तारीख तसेच दैनंदिन आहार, काही व्यसने, पूर्वीचे आजार, किंवा कौटुंबिक आजार, इत्यादी
 • सध्या काही त्रास होतो का? जसे कि, चालताना थकवा येणे धाप लागणे, डोकेदुखी, अंधुक दिसणे, तसेच ताप, खोकला किंवा कावीळ, इत्यादी. योनिमार्गातून पाणी जाणे, रक्तस्राव, पोटात वेदना, बाळाची हालचाल न जाणवणे, मंदावणे, थांबणे.
 • परिचारिका मातेची संपूर्ण तपासणी करून ( विशेषता ग्रामीण भागातील परिचारिका) धोक्याची लक्षणे शोधून काढून शक्य असतील ते प्राथमिक उपचार करून योग्य ठिकाणी संदर्भ सेवेसाठी पाठविते. गर्भधारणेचे लवकरात लवकर निदान करताना पुढील बाबी लक्षात घेते : १) मासिक पाळी चुकल्याची तारीख. २) सर्वसाधारण तक्रार, मळमळ उलट्या, अन्नावरची वासना उडते. ३) स्तनांचा आकार वाढतो, स्तनाग्रे काळसर होतात, स्तंनातून थोडासा चिक येतो.
 • १) योनिमार्गातून तपासणी : गर्भाशयाचा आकार वाढलेला आढळतो, गर्भाशय मऊ लागते. २) पोटावरून तपासणी : गरोदर तीन महिन्यांनंतर गर्भाशय हाताला लागते.
 • गरोदरपणाचे लवकर निदान करण्यासाठी करण्यात येणार्‍या विशिष्ट चाचण्या : १) लघवीची विशिष्ट चाचणी : पाच आठवड्यानंतर निदान, २) सोनोग्राफी : सहा आठवड्यानंतर निदान.
 • गरोदरपणाचे लवकर निदान केल्यामुळे लवकर नोंदणी होऊन अधिक चांगली प्रसूतिपूर्व सेवा देता येते आणि गुंतागुंतीचे प्रमाण कमी करता येते.
 • परिचारिका गरोदर स्त्रीच्या नाव नोंदणीच्या वेळी पुढील निरीक्षणे / तपासण्या करते : १) वजन व उंची, २) डोळे जीभ यांचा पांढुरकेपणा (Pallor), ३) हात- पाय चेहर्यावरील सूज, ४) रक्तदाब, ५) गर्भारपणाचा कालखंड आणि गर्भाशयाची उंची, ६) गर्भाची स्थिती ( गरोदरपणाच्या सातव्या महिन्यानंतर), ७) गर्भाचे हृदय ठोके मोजणे, ८) रक्तातील हीमोग्लोबिनचे प्रमाण, ९) लघवीची तपासणी – साखर व प्रथिनांसाठी, १०) रक्तातील आर एच गट, ११) रक्त गट, १२) रक्ताची व्ही.डी.आर.एल. चाचणी, १३) एच.आय.व्ही. साठी रक्ताची ऐच्छिक तपासणी.
 • परिचारिका गरोदर मातेच्या तपासणीचे वेळापत्रक तिला समजावून सांगते  – आदर्श वेळापत्रक : गरोदरपणाच्या कालमानानुसार

१) २८ आठवड्यापर्यंत – महिन्यातून एकदा

२) २८ ते ३६ आठवडे – दर पंधरा दिवसांनी

३) ३६ आठवड्यानंतर – आठवड्यातून एकदा

किमान वेळापत्रक :

१) १२-१६ आठवडे – नोंदणी व पहिली तपासणी

२) ३२ आठवडे – दुसरी तपासणी

३) ३६ आठवडे – तिसरी तपासणी

 • परिचारिका गर्भवतीची तपासणी करताना खालील गोष्टींंचे निरीक्षण करून नोंद करते :

) गर्भवतीची उंची : सेंटीमीटरमध्ये मोजावी पहिलटकरणीची उंची मोजणे महत्त्वाचे आहे. उंची १४५ सें.मी. पेक्षा कमी असेल तर जननमार्ग बाळाला अपुरा असल्याची शक्यता असते. यासाठी ३६ व्या आठवड्यात योनिमार्ग तपासणी करावी.

२) गर्भवतीचे वजन : पहिल्या आणि पुढील प्रत्येक भेटीत वजन करून त्याची नोंद ठेवावी. गर्भवती स्त्रीचे वजन एकूण गरोदरपणात १०-१२ किग्रॅ. म्हणजेच एका महिन्यात दीड ते दोन किलो वाढणे अपेक्षित आहे. जर एका महिन्यात तीन किलो किंवा त्यापेक्षा अधिक वजन वाढले तर गरोदरपणात अतिरक्तदाब (Preeclampsia) होण्याची शक्यता असते. आणि मातेच्या वजनात पुरेशी वाढ झाली नाही तर गर्भशयात बाळाची वाढ खुंटलेली असण्याची शक्यता (Intrauterine growth retardation) असते.

३) मातेचा रक्तदाब : रक्तदाब (१४०/९० एम.एम.ऑफ एच जी ) १४० सिस्टॉलिक आणि /किंवा ९० डायस्टॉलिक पेक्षा अधिक असेल तर गर्भवतीला चार ते सहा तास विश्रांती घेण्यास सांगून पुन्हा रक्तदाब घ्यावा. विश्रांती नंतरही रक्तदाब १४०/९० पेक्षा अधिक असेल तर वैद्यकीय अधिकार्‍यांकडे (स्त्रीरोग तज्ञ)  पुढील उपचारासाठी पाठवावे.

४) सुजेची तपासणी : गरोदर स्त्रीच्या पायावर, चेहर्‍यावर सूज आहे का पहावे. पायावरील सूज बघतांना बोटाने दाबले असतं त्याठिकाणी खड्डा पडतो व हाताच्या बोटावर सूज असल्यास बोटातील अंगठी घट्ट होते का यावरून समजते.

गरोदर मातेच्या अंगावर सूज येण्याची कारणे : (i) अतिरक्तदाब, (ii) रक्तक्षय (Anaemia), (iii) प्रथिनांची कमतरता, (iv) मूत्र संस्थेचे विकार, (v) हृदयविकार, (vi) स्वाभाविक सूज (Physiological).

५) सूज स्वाभाविक आहे की आजाराची निर्देशक आहे, हे ठरविण्यासाठी रक्तदाब, रक्तातील हीमोग्लोबिनचे प्रमाण व लघवीची प्रथिनांसाठी तपासणी करणे आवश्यक असते.

अ.क्र. आजाराची लक्षणे गरोदरपणी
पायावर, हातावर व  चेहर्‍यावर सूज स्वाभाविक सूज फक्त पायावर
विश्रांतीनंतर देखील सूज विश्रांतीनंतर सूज कमी होते.
रक्तदाब वाढलेला रक्तदाब १४०/९० पेक्षा कमी
लघवीतून प्रथिने जातात लघवीतून प्रथिने जात नाहीत.
रक्तातील हीमोग्लोबिनचे प्रणाम कमी हीमोग्लोबिनचे प्रमाण १० ग्रॅम पेक्षा अधिक

ई) गर्भाशयाची उंची मोजणे प्रक्रिया : परिचारिका प्रत्येक भेटीत गरोदर मातेच्या गर्भशयाची उंची गर्भारपणाच्या कालानुसार आठवड्यामध्ये तसेच मेजरिंग टेपच्या साहाय्याने सेंटीमीटर मध्ये उंची मोजते. या तपासणी साठी मातेला लघवी करून यायला सांगावे. गुडघ्यात पाय वाकवून उताणे निजवावे. गर्भाशय एका बाजूला झुकलेले असल्यास ते उजव्या हाताने मध्य रेषेत आणावे. डाव्या हाताने छातीच्या हाडाच्या खालच्या टोकापासून हळूहळू खाली तपासात यावे. गर्भशयाचा गोलाकार पृष्टभाग लागल्यावर जघनास्थि प्रतरसंधीच्या (Pubis Symphysis) वरच्या टोकापासून गर्भाशयाची उंची मोजावी.

आकृती : गर्भशयाची उंची

गर्भारपणाच्या आठवड्यांनुसार गर्भाशय पुढीलप्रमाणे हाताला लागते.

१) गर्भाशय ओटीपोटावर किंचित लागते : १२ आठवडे गर्भकाळ

२) गर्भाशय बेंबीच्या रेषेत : २४ आठवडे गर्भकाळ

३) गर्भाशय छातीच्या हाडाच्या खालच्या टोकाजवळ लागते  : ३६ आठवडे गर्भकाळ

गर्भशयाची उंची गर्भ धारणेच्या कालखंडांनुसार असायला हवी ( पुढील निरीक्षणे महत्त्वाची) :

अ.क्र. अपेक्षेपेक्षा कमी उंची असल्यास अपेक्षेपेक्षा जास्त उंची असल्यास
पाळीची तारीख चुकीची पाळीची तारीख चुकीची
गर्भ धारणेपूर्वी पाळी अनियमित अति गर्भोदक (गर्भाशयातील पाणी )
बाळाची खुंटलेली वाढ जुळी गर्भधारणा
गर्भमृत्यू मोठ्या आकाराचे बाळ
गर्भोदक अतिशय कमी द्राक्षगर्भ / गर्भशयातील अर्बुदके (Fibroids)

उ) परिचारिका प्रसवपूर्व तपासणी दरम्यान प्रत्येक गरोदर स्त्रीला (पहिले गर्भारपण किंवा बहुप्रसवा) नवीन जन्मणाऱ्या बाळाला चिकाचे दूध व स्तनपान कसे व का करावे या विषयी प्रेरणा आणि माहिती देते.

ऊ) बाळाची गर्भाशयातील स्थिती : गर्भाशयाच्या खालच्या (कटीर – ओटी पोट) भागाची तपासणी करून ठरविले जाते

१) बाळाचे डोके खाली – नैसर्गिक स्थिति

२) डोक्याव्यतिरिक्त इतर भाग खाली – अनैसर्गिक स्थिति

३) बाळाचे नितंब खाली – पायाळू मूल

४) खाली काहीच लागत नाही – आडवे मूल

गरोदरपणाच्या आठव्या महिन्यापर्यंत अनैसर्गिक स्थिती फारशी महत्त्वाची नाही. बाळ गर्भाशयात फिरून स्वत:च नैसर्गिक स्थितीत येऊ शकते. नवव्या महिन्यापासून किंवा ३४ आठवड्यांनंतर मात्र ते जोखमीचे लक्षण समजावे. अनैसर्गिक स्थिती बाळ असलेल्या मातेला शस्त्रक्रियेची ( Cesareans action) गरज भासू शकते, म्हणून परिचारिका त्वरित तिची रवानगी खाजगी सुसज्ज रुग्णालयात करते. ( जेथे रक्तपेढीची सुविधा असेल)

ऋ) बाळाच्या हृदयाची स्पंदने : परिचारिका फिटोस्कोप किंवा स्टेथोस्कोपने बाळाच्या हृदयाचे ठोके पूर्ण एक मिनिटभर ऐकते. गर्भवतीच्या बेंबीखाली आणि बाळाच्या पाठीच्या बाजूस ठोके चांगले ऐकू येतात. ठोके दर मिनिटास १२० ते १६० आणि नियमित असावेत.

ऌ) मातेच्या रक्तातील हीमोग्लोबिनचे प्रमाण : रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण ११ ग्रॅम पेक्षा कमी असेल तर ते ॲनिमियाचे लक्षण आहे. परंतु हिमोग्लोबीनचे प्रमाण ८ ग्रॅम पेक्षा कमी असेल तर गर्भवतीला आणि बाळाला अधिक प्रमाणात धोके असतात.

ए) लघवीची तपासणी : गर्भवती स्त्रीच्या प्रत्येक भेटीत तिची लघवी प्रथिनांसाठी व साखरेसाठी तपासावी. लघवीमध्ये प्रथिने आढळल्यास त्याचे प्रमुख कारण गर्भधारणाजन्य अतिरक्तदाब हे आहे. अशा मातेची त्वरित वैद्यकीय अधिकार्‍यांकडे रवानगी करावी. मधुमेही स्त्रीयांच्या लघवीतून साखर (ग्लुकोज ) जात असते. अशा स्त्रीलाही त्वरित वैद्यकीय सल्ला घेण्यास सांगावे. गर्भवतीची माहिती, तपासणी व रक्त लघवीवरील चाचण्या यांच्या आधारे तिच्यात जोखमीचे लक्षण नाही ना याची खात्री करावी.

सारांश : “सुरक्षित मातृत्व आणि बाल जीवित्व ” ही संकल्पना राबविताना गर्भवती मातेला द्यावयाच्या आवश्यक सेवा :

१) गरोदर मातेची गरोदरपणाविषयी दवाखान्यात /आरोग्य केंद्रात लवकरात लवकर  नोंदणी

२) संपूर्ण गरोदरपणात किमान तीन तपासण्या

३) धनुर्वात प्रतिबंधक लस

५) रक्तवर्धक गोळ्या ( रक्तक्षय रोखण्यासाठी)

६ ) आहाराविषयक सल्ला

७) धोक्याची लक्षणे आढळल्यास ताबडतोब वैद्यकीय सल्ला : अंगावर सूज, अंधुक दिसणे, योनिमार्गातून रक्त किंवा पाणी जाणे, कावीळ, असह्य डोकेदुखी, सतत उलट्या, बाळाची हालचाल मंदावणे किंवा थांबणे ही धोक्याची लक्षणे आहेत.

वर उल्लेखिलेल्या परिचारिकेच्या सर्व जबाबदाऱ्या व भूमिका ह्या विविध ठिकाणी उदा. आरोग्य सेवा पुरविणारी उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालये, जिल्हा रुग्णालये, दवाखाने, आणि अतिविशिष्ट रुग्णालये इ. ठिकाणी विविध स्तरांवर जसे परिसेविका, अधिसेविका, विशिष्ट पदवीधर व्यावसायिक परिचारिका, प्राध्यापक परिचारिका याप्रमाणे पार पाडीत असतात.

पहा : प्रसवोत्तर परिचर्या, प्रसूतिपूर्व परिचर्या, प्रसूतिविज्ञान.

संदर्भ :- डॉ. अपर्णा श्रोत्री, सुरक्षित प्रसूति, तृतीय आवृत्ती.

समीक्षक : सरोज उपासनी