एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीला देखील इतर प्रगत देशांच्या तुलनेत भारतातील मातामृत्युचे प्रमाण खूपच अधिक आहे. खरे तर मातामृत्यूची बरीचशी कारणे टाळता येणे सहज शक्य आहे. गर्भधारणा आणि प्रसूती यादरम्यान अचानक उद्भवणाऱ्या विपरीत समस्यांमुळे निरोगी असलेल्या अनेक स्त्रियांना अकाली मृत्यूला सामोरे जावे लागते. मातामृत्यूचे हे प्रमाण कमी करण्याच्या उदात्त उद्देशाने १९९२ पासून भारतात सुरक्षित मातृत्वाचा कार्यक्रम (Safe motherhood & child survival ) राष्ट्रीय पातळीवर राबविण्यास सुरुवात झाली. सध्याच्या प्रजनन आणि बालआरोग्य (Reproductive & Child Health) कार्यक्रमात देखील सुरक्षित मातृत्वाचा समावेश करण्यात आलेला आहे.

मातामृत्यू दर : गरोदरपणात किंवा गरोदरपण खंडित झाल्यानंतर बेचाळीस दिवसात गरोदरपणाशी संबधित कारणांनी किंवा गरोदरपणामुळे बळावलेल्या आजारांनी स्त्रीचा झालेला मृत्यू म्हणजे मातामृत्यू होय. तर दरसाल एक लाख (१,००,०००) जिवंत जन्मामागे होणार्‍या मातामृत्यूची संख्या म्हणजे मातामृत्यू दर होय.

मातामृत्यूचे परिणाम : मातामृत्यूनंतर नवजात अर्भकाचे पालणपोषण व्यवस्थित होत नाही. त्यामुळे अशा बाळाचा मृत्यू होण्याची शक्यता वाढते. मातेच्या अगोदरच्या मुलांची देखील आईविना आबाळ होते.

माता मृत्यूची कारणे :

  • गरोदरपणातील गुंतागुंत.
  • प्रसूतिपूर्वी किंवा प्रसूवोत्तर होणारा अताक्तस्राव ( Post partum hemorrhage).
  • गरोदरपणा दरम्यान येणारी आकडी.
  • प्रसूतिनंतर किंवा गर्भपातानंतर होणारा जंतुसंसर्ग.
  • अडलेले बाळंतपण आणि फाटलेले गर्भाशय.
  • गरोदरपणामुळे बळविणारे किंवा हृदयाचे आजार तसेच रक्तक्षय (Anemia), कावीळ, हिवताप इत्यादी आजार.
  • रक्त वाहिन्यांमधील गुठळ्या.

 मातामृत्यू टाळण्यासाठी आरोग्यसेवा :

आरोग्यसेवा
  • प्रसूतिपूर्व सेवा : गरोदरपणाची चाहूल लागताच नोंदणी व किमान सेवा भेटी घेणे. जोखमीच्या लक्षणांचा मागोवा, गुंतागुंतीचे लवकर निदान, जोखमीच्या / गुंतागुंतीच्या मातांना संदर्भसेवा देणे.
  • प्रसूती दरम्यान काळजी : बाळंतपणात कटाक्षाने स्वछतेचे पालन करणे, प्रसूती प्रशिक्षित व्यक्तींकडून व शक्यतो दवाखान्यातच करून घेणे.
  • प्रसूती नंतरची सेवा : गुंतागुंतीचे निदान व संदर्भसेवा देणे.
  • कुटुंबनियोजन : यासंदर्भात योग्य सल्ला व मदत देणे.
  • सुरक्षित गर्भपात, सुसज्ज शस्त्रक्रियागृहे, रक्तपेढी सेवा उपलब्धता इत्यादींसंदर्भात माहिती देणे.

 मातामृत्यू कमी करण्यासाठी आवश्यक सामाजिक बदल :

  •  गरीबी रोजगारीचे निर्मूलन.
  •  साक्षरता व स्त्रीशिक्षण प्रसार.
  •  स्त्रियांचे आर्थिक स्वावलंबित्व व समाजातील स्त्रियांचे स्थान उंचविणे.
  •  कुटुंबामध्ये आरोग्य विषयक आस्था व जाणीव निर्माण करणे.
  •  आरोग्य सेवांसाठी आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधा उपलब्ध करणे.
  •  रस्ते आणि दळणवळणाची साधने, सक्षम संदेशयंत्रणा.

सुरक्षित मातृत्वाच्या कार्यक्रमात परिचारिकांकडून अपेक्षा : आपल्या क्षेत्रातील प्रत्येक गर्भवती स्त्रीची माहिती मिळवून तिची लवकरात लवकर नोंदणी करून तिला ठरलेल्या दिवशी तिच्या गावातील माता-बाळ आरोग्य सेवा सत्राला (MCP Session) नियमितपणे येण्यास प्रवृत्त करणे आणि तिला आवश्यक असलेल्या सर्व सेवा व सल्ला देणे. यासाठी आपल्या क्षेत्रातील गर्भवती स्त्रियांची अपेक्षित संख्या काढता यायला हवी आणि नंतर आपल्या कार्याचे नियोजन करून सर्वच मातांना सेवा द्यायला हव्यात. ही संख्या माहीत करून घेण्यासाठी आपल्या जिल्ह्याचा जन्मदर आणि आपल्या क्षेत्राची लोकसंख्या माहिती आसायला हवी.

सुरक्षित मातृत्व समाजाचा सहभाग : प्रत्येक गावामध्ये बाळंतपण करण्यासाठी किमान एक तरी प्रशिक्षित व्यक्ति असणे गरजेचे आहे. याकरिता इच्छुक महिलांना या कामासाठी प्रवृत्त करून त्यांना प्रशिक्षण देता येईल. गावातील एखाद्या मध्यवर्ती ठिकाणी प्रसूतिकेंद्र स्थापन करता येईल. या ठिकाणी बाळंतपण करण्यासाठी लागणारे सर्व साहित्य, निर्जंतुकीकरणाचे साहित्य व उपकरणे, आवश्यक औषधे उपलब्ध ठेवावीत. प्रसूती घरी करण्याऐवजी दवाखान्यातच करण्याचे महत्त्व जनतेला पटवून द्यावे. मोठ्या शहरात राहत असलेल्या स्त्रियांनी केवळ प्रथा म्हणून बाळंतपण करण्यासाठी माहेरी खेडेगावात जाण्याऐवजी बाळंतपणानंतर माहेरी जाण्याबद्दल त्यांचे प्रबोधन करावे. गरोदरपणातील आणि बाळंतपणातील धोक्याच्या लक्षणांची कुटुंबातील सर्वांना आरोग्य शिक्षणाद्वारे माहिती करून घ्यावी.

गावातील सर्व प्रकारच्या वाहनांची यादी करून बाळंतपणासाठी केव्हा व कशी वाहनव्यवस्था उपलब्ध होऊ शकेल याचे वेळापत्रक तयार करून तशी माहिती या केंद्रात ठेवावी. त्यामुळे आणीबाणीच्या प्रसंगी गर्भवतीला तत्काळ दवाखान्यात किंवा संदर्भसेवेसाठी इतरत्र हलविणे शक्य व लवकर होईल. तसेच या केंद्रात फोन किंवा मोबाइल ठेऊन, नजीकचे डॉक्टर / परिचारिका, रुग्णालय, रक्तदाते, वाहने इत्यादींच्या दूरध्वनी क्रमांकांची यादी सहज नजरेस येईल अशी ठेवावी.

जवळच्या सरकारी आणि खाजगी रुग्णालयांची आणि त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या सोनोग्राफी, शस्त्रक्रिया यासारख्या सोईसुविधांची माहिती सर्व गर्भवतींना मिळण्याची व्यवस्था करावी. अशावेळी गरज पडल्यास रक्त दात्यांची किंवा रक्त अथवा इतर औषधे आणून देणे, इत्यादी मदत करू इछिणार्‍या स्वयंसेवकाची यादी तयार ठेवावी. ज्या स्त्रियांचे कोणीही नातेवाईक ऐनवेळी हजर नसतात त्यांना अशी माहिती खूपच उपयोगी पडते.

सुरक्षित मातृत्वासाठी उपलब्ध शासकीय सेवांची सर्व संबधितांना माहिती देऊन त्यांचा लाभ घेण्यासाठी त्यांना सर्वतोपरी मदत करावी. झालेल्या प्रत्येक जन्माची लगेचच्या लगेच चोवीस तासात नोंद करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. बाळंतपणानंतर जोडप्याला कुटुंब नियोजनाविषयी सविस्तर माहिती आणि सेवा मिळण्याची योग्य सोय प्रत्येक गावात असली पाहिजे. तसेच गरजू स्त्रियांना सुरक्षित गर्भपाताविषयी मार्गदर्शन मिळणे आवश्यक आहे.

पहा : गर्भारपणा.

संदर्भ :

  • नॅशनल हेल्थ पॉलिसी, मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर.