ऋतुनिवृत्ती : स्वाभाविक ऋतुस्राव बंद होण्याच्या कालाला ऋतुनिवृत्ती किंवा रजोनिवृत्ती असे म्हणतात. सर्वसाधारणपणे वयाच्या ४५ ते ५० व्या वर्षी स्त्रीला येणारी मासिकपाळी बंद होते. वयाच्या चाळीशी दरम्यान शीर्षस्थ ग्रंथीच्या (Apical Glands) पुटक उद्दिपक संप्रेरकाला (Follicle stimulating hormone)  अंडकोशाकडून (Ovary) पूर्वीसारखा प्रतिसाद मिळू शकत नाही. त्यामुळे बीजोत्सर्ग (Ovulation) अनियमित होते. त्याचा परिणाम मासिकपाळीवर होतो व ती अनियमितपणे मागे पुढे होते. हळूहळू बीजोत्सर्ग कायमचा बंद होतो. तेव्हा मासिक पाळीही कायमची बंद होते. पाळी पुर्णपणे बंद होण्याअगोदर साधारणपणे एक ते दोन वर्ष मासिकपाळी अनियमित होऊ शकते. पाळी दरम्यान रक्तस्राव होण्याचे प्रमाणही कमी होते. अगदी क्वचित प्रसंगी यादरम्यान गर्भधारणा होऊ शकते. या कालावधीत स्त्रियांना गर्भाशयाचा कर्करोग होण्याची भीती असते. त्यामुळे या काळात होणाऱ्या कोणत्याही त्रासाकडे दुर्लक्ष न करता, पुढील संभाव्य धोके टाळण्यासाठी योग्यवेळेत उपचार करून घेणे अत्यंत आवश्यक आहे.

ऋतुनिवृत्ती कालात उद्भवणाऱ्या तक्रारी : शरीरात स्त्री-संप्रेरकांची असमतोलता झाल्यामुळे काही महिलांना रजोनिवृत्तीच्या वेळी काही तक्रारी उद्भवतात जसे की, चेहरा लालबुंद होऊन शरीरातून वाफा आल्यासारखे वाटणे, भरपूर घाम येणे, हात, पाय, कान, अंगातून अचानक वाफा आल्यासारखे वाटणे, छातीत धडधडणे, झोप अनियमित होणे, स्तनांमध्ये बदल होणे, योनिमार्ग कोरडा पडणे, अकारण भीती वाटणे, तापटपणा चिडचिड वाढणे असे शारीरिक व मानसिक बदलही होतात. त्याचबरोबर रक्तभिसरण संस्था, पचनसंस्था, मज्जासंस्था इत्यादींमध्येही बदल झाल्याचे आढळते त्यामुळे रक्तदाब वाढणे (Hypertension), मधुमेह (Diabetes Mellitus) यासारख्या व्याधी; डोकेदुखी, पायदुखी, कंबरदुखी, कमी दिसणे, कानामध्ये विचित्र आवाज येणे, कमी ऐकु येणे, याही तक्रारींची भर पडते. त्याच्या परिणामांमुळे महिलांची मानसिक स्थिती बिघडण्यात आणखीनच भर पडते. या दरम्यान स्त्रियांमध्ये उदासिनता (Depression) अतिकाळजी (anxiety) निद्रानाश (Insomnia) मानसिक ताणतणाव (Stress) चिडचिडी वृत्ती (irritability) ही लक्षणे थोड्याबहुत प्रमाणात आढळतात.

ज्या महिला सुशिक्षित आहेत आणि झालेल्या बदलांचा स्वीकार करून त्याच्याशी समरस होतात. त्या महिलांना ऋतुनिवृत्तीचा त्रास कमी होतो. घरातील सर्व मंडळींनी यामागचे कारण समजून घेऊन त्या स्त्रीला मानसिक आधार देणे गरजेचे असते. या वयात त्यांना समजून घेणे, समजावून सांगणे, त्यांच्याशी आत्मियतेने वागणे महत्त्वाचे आहे म्हणून त्यांचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकुन घेणे अतिशय गरजेचे असते.

परिचारिकेची भूमिका :

  • परिचारिकांनी या स्त्रियांशी योग्य संवाद साधून त्यांना होणारा त्रास, त्यांचे म्हणणे संवेदनशीलतेने ऐकूण घेणे अत्यंत गरजेचे असते. त्यांच्याशी बोलावे मनातील भीती वाटणार्‍या शंका यांना बोलते करावे.
  • पाळी बंद झाली म्हणजे आपले स्त्रीत्व जात नाही. तसेच त्यामुळे शारीरिक संबंधात बाधा येत नाही. हे समजावून सांगणे. जसे आपले वय वाढते तसे वाढते आपल्या नवर्‍याचेही वय वाढत असते व त्याच्याही शरीरात बदल घडत असतात. याचीही तिला कल्पना द्यावी.
  • काहींची लवकर तर काहींची थोडीशी उशिरा ठराविक वयानंतर पाळी बंद होणारच आहे. याचीही कल्पना द्यावी.
  • या दरम्यान आपले मन स्थिर ठेवण्यासाठी वाचन, टीव्ही पाहणे, विणकाम, भरतकाम, रेडियो ऐकणे यात मन गुंतविण्यास सांगणे. इतर आवडते छंदही मन रमविण्यास उपयोगी पडतात.
  • सकाळ संध्याकाळ मोकळ्या हवेत फिरणे, व्यायाम करणे, चौरस आहार घेणे हे अतिशय आवश्यक असते.
  • आपली वृत्ती आनंदित ठेवण्यासाठी घरातील प्रत्येक व्यक्तीशी हसून खेळून संवाद साधला पाहिजे. म्हणजे पाळीच्या तात्पुरत्या तक्रारींकडे दुर्लक्ष होऊन त्रास कमी होईल.
  • त्याचबरोबर आहाराव्यतिरिक्त डॉक्टरांच्या सल्ल्याने कॅल्शियमच्या गोळ्या घेणेही गरजेचे असते. त्यामुळे हाडे ठिसुळ होणे, पोटर्‍यांमध्ये पेटके, गोळा येणे हे त्रास होत नाहीत.
  • परिचारिका वरील विषयासंबंधी महिला मंडळे, बचत गट, पालक संघटना यांचा आरोग्य शिक्षण देण्यास प्रभावीपणे वापर करू शकतात. त्याचबरोबर बाह्य रुग्ण विभागात स्त्री रुग्णांना भेटूनही सदर प्रकरणी अवगत करू शकतात.

योग्य आहार आवश्यक व्यायाम याबाबत गटचर्चामधून स्त्रियांचे प्रबोधन करू शकतात. परिचारिकेची रजोनिवृत्ती बद्दल संपूर्ण माहिती देण्यात महत्त्वाची भूमिका असते.

पहा : ऋतुनिवृत्ति

संदर्भ :

  • http://www.webmd.com……Guide
  • http://www.mayoclinic.org

समीक्षक : सरोज उपासनी