प्रसूति व स्त्रीरोग परिचारिका गरोदर माता तपासणी केंद्रात गरोदर स्त्रियांची तपासणी करताना स्वाभाविक गरोदरपण व जोखमीचे गरोदरपण यांची लक्षणे समजून त्याप्रमाणे आरोग्य सेवा देतात.

जोखमीच्या गरोदरपणाची महत्त्वाची कारणे :

 • प्रथम प्रसवा स्त्रीचे वय ३० वर्षांपेक्षा अधिक किंवा १७ वर्षांपेषा कमी असेल; तिची उंची १४५ सेंमी. पेक्षा कमी असेल किंवा तिला कुबड, लंगडेपणा किंवा पोलिओ इत्यादीप्रमाणे एखादे व्यंग असेल.
 • आधीची प्रसूती ही शस्त्रक्रियेने करण्यात आली असेल, दिलेल्या वेळेआधी प्रसूती झाली असेल, उपजत किंवा नवजात बालकाचा मृत्यू झाला असेल.
 • बहुप्रसवा स्त्रीची गरोदरपणाची पाचवी किंवा त्यापेक्षा अधिक खेप असेल.
 • गरोदर स्त्रीला हृदयविकार, मधुमेह यांसारखे गंभीर आजार असेल.

अशा प्रकारच्या गरोदर मातांच्या प्रत्येक भेटीत परिचारिका (Nurse Midwife)  धोक्याच्या लक्षणांची नोंद करते, दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार पुढील कार्यवाही करते आणि अशा मातांना तपासणीसाठी वैद्यकीय अधिकार्‍यांकडे घेऊन जाते.

धोके व उपाययोजना किंवा परिचर्येचे नियोजन :

 • प्रथम प्रसवा स्त्रीचे वय ३० वर्षांपेक्षा अधिक असेल तर प्रसूतीदरम्यान रक्तदाब वाढू शकतो व शस्त्रक्रियेची शक्यता वाढते. अशा वेळी गरोदरपणात तज्ञांकडून वेळोवेळी तपासणी करून घेणे आणि प्रसूती सुसज्ज रुग्णालयात करणे गरजेचे असते.
 • प्रथम प्रसवा स्त्रीचे वय १७ वर्षांपेक्षा कमी असेल तर प्रसूतीदरम्यान रक्तदाब वाढणे, रक्तक्षय (Anaemia), बाळंतपण लांबणे, मुदतपूर्व प्रसूती, बाळाचे कमी वजन यांसारखे धोके उद्भवतात. यावर उपाययोजना म्हणजे नियमित तपासणी करणे; रक्तातील हीमोग्लोबिन,लघवी व रक्तदाब तपासणे; ३६व्या आठवड्यात योनिमार्ग, जनमार्ग तपासणे आणि प्रसूती सुसज्ज रुग्णालयात करणे.
 • प्रथम प्रसवा स्त्रीची उंची १४५ सेंमी. पेक्षा कमी असल्यास बाळंतपणाचा मार्ग आणि कटीर संकुचित असण्याची व त्यामुळे बाळंतपण अडण्याची शक्यता वाढते, तसेच मुदतपूर्व प्रसूति व कमी वजनाचे बाळ हे धोके असतात. अशा स्त्रीला पुरेशी विश्रांती व पौष्टिक आहाराची आवश्यकता असते. त्याचबरोबर ३६ व्या आठवड्यात जननमार्गाची तपासणी करावी आणि जन्मवाट अरुंद असल्यास सुसज्ज रुग्णालयात पाठवणी करावी.
 • गरोदर स्त्रीला कुबड, लंगडेपणा किंवा पोलिओ यांसारखे व्यंग असेल तर लांबलेली किंवा अडलेली प्रसूती, बाळ गुदमरणे, बाळाच्या मेंदूला ईजा, मातेच्या जन्म मार्गाला ईजा इ. धोके संभवतात. अशा वेळी नवव्या महिन्यात जन्म मार्गाची तपासणी करावी आणि प्रसूती सुसज्ज रुग्णालयातच करावी.
 • बहूप्रसवा किंवा प्रसूतीच्या अधिक खेपा असेल तर रक्तक्षय, बाळाची अनैसर्गिक स्थिती, गर्भाशय फुटण्याची शक्यता, प्रसूती पश्यात अती रक्तस्राव बसे धोके संभवतात. अशा स्त्रियांना गरोदरपणात नियमित लोहयुक्त गोळ्या द्याव्या, नवव्या महिन्यात तपासणी करून बाळाची स्थिती पाहून प्रसूती रुग्णालयातच करावी. प्रसूतीनंतर त्वरीत मेथर्जिन इंजेक्शन द्यावे.
 • आधीची प्रसूती शस्त्रक्रियेने झाली असल्यास किंवा गर्भाशयावर शस्त्रक्रिया झाली असल्यास नंतरची प्रसूती शस्त्रक्रियेनेच होण्याची शक्यता अधिक असते. काही वेळा गर्भाशय फुटून बाळाच्या व मातेच्या जीवाला धोका निर्माण होतो. अशा वेळी गरोदरपणात तज्ञांच्या सल्ल्यान्वये काळजी घ्यावी व प्रसूती तज्ञांकडून सुसज्ज रुग्णालयातच प्रसूती करून घ्यावी.
 • गर्भाशयाची समान्यापेक्षा अधिक वाढ (जुळे – तिळे, अति गर्भोदक अशा परिस्थितीत) झाली असल्यास अतिरिक्त रक्तदाब, प्रसूतीपूर्व रक्तस्राव, बाळाची अनैसर्गिक स्थिती, प्रसूतीपश्यात रक्तस्राव, विकृतगर्भ इ. धोके असतात. अशा वेळी वेळोवेळी सोनोग्राफी करून घेणे व नोंदी ठेवणे गरजेचे असते.
 • अतिरिक्त रक्तदाब, गुप्तरोग, ग्रीवेची शिथिलता (Incompetent cervix), विजोड आर. एच. रक्तगट, मधुमेह, मूत्रसंस्थेचे विकार, गर्भाशयाची विकृती इ. कारणांमुळे जोखीमीच्या गरोदरपणाची पुनरावृत्तीची शक्यता अधिक असते. असे धोके टाळण्याकरिता प्रसूती तज्ञांचा सल्ला व उपचार घेणे आणि सुसज्ज रुग्णालयात प्रसूती ही योग्य उपाययोजना आहे.

सारांश : परिचर्या नियोजनात जोखमीचे गर्भारपण आणि त्यांतील धोके यांचे प्रथमावस्थेत निदान केल्याने व त्वरित उपाय योजना झाल्यास नवजात शिशु व माता मूत्यू टाळणे शक्य होऊ शकते.

संदर्भ :

 • अपर्णा श्रोत्री, सुरक्षित प्रसूति, तृतीय आवृत्ती.

समीक्षक : सरोज वा. उपासनी