बहमनी साम्राज्याचा आठवा सुलतान (कार. १६ नोव्हेंबर १३९७–२२ सप्टेंबर १४२२). मूळ नाव ताजुद्दीन फिरोझ. फार्सी इतिहासकार फिरिश्ताच्या मते, हा दाऊदशाह बहमनीचा मुलगा. सत्तासंघर्षात दाऊदशाह मारला जाऊन त्याचे जागी दुसरा मुहंमदशाह (कार. १३७८–९७) सत्तेवर आला. सुलतान मुहंमदशाहने दाऊदशाहच्या फिरोझ आणि अहमद या दोन्ही मुलांचा सांभाळ केला. त्यांना लष्करी व राजकीय प्रशिक्षण देण्याची व्यवस्था केली. त्यासाठी मीर फैजुल्ला अंजू या शिक्षकाची खास नेमणूक केली. तसेच त्याने आपल्या दोन मुलींची लग्ने अनुक्रमे फिरोझ आणि अहमद यांच्यासोबत लावून दिली. सुरुवातीला मुहंमदशाहास मुलगा नव्हता, तेव्हा फिरोझ हाच साम्राज्याचा वारस आहे, अशी त्याची समजूत होती. परंतु पुढे मुहंमदशाहास पुत्र झाला. मरतेवेळी त्याने आपला पुत्र घियासुद्दीन यास सुलतानपद दिले (एप्रिल १३९७) व फिरोझ आणि अहमद यांचेकडून घियासुद्दीन बरोबर एकनिष्ठ राहण्याची शपथ घेतली.
फिरोझ आणि अहमद सुलतान घियासुद्दीन बरोबर एकनिष्ठ राहिले. घियासुद्दीन याने इराणी उमरावांना प्राधान्य दिल्याने तुर्की उमरावांपैकी तघलचीन याने घियासुद्दीनला कैद करून मुहंमदशाहचा मुलगा शमसुद्दीन दाऊद यास गादीवर बसविले (जून १३९७). तघलचीनने स्वतः वजीर पदाची सूत्रे हातात घेतली. या सर्व गोष्टींचा राग येऊन फिरोझ आणि अहमद बंधूंनी बहमनी साम्राज्याची राजधानी गुलबर्ग्यावर आक्रमण करून तघलचीन आणि शमसुद्दीन यांना कैद केले. यानंतर फिरोझ याने तघलचीन यास ठार मारले व शमसुद्दीनचे डोळे काढून त्याला बिदर येथे कैदेत ठेवले. तसेच घियासुद्दीनला कैदेतून सोडवून मक्का यात्रेला पाठवून दिले. त्यानंतर फिरोझने स्वतःला राज्याभिषेक करून घेतला. त्याने ‘फिरोझशाह रोज अफजून’ हा किताब धारण केला. फिरोझशाहने आपला भाऊ अहमद यास आमीर उल उमरा, तसेच आपला शिक्षक मीर फैजुल्लाह इंजू यास वजीर या पदावर नेमले. सत्तेवर येताच फिरोझशाहने सर्वप्रथम आपल्या साम्राज्यात शांतता प्रस्थापित करण्यास प्राधान्य दिले. त्याने हिंदूना शासकीय सेवेत नोकऱ्या देण्यास सुरुवात केली. बहमनी साम्राज्याच्या पूर्व सीमेवर रेड्डी जमीनदार आणि विजयनगर साम्राज्य यांचा उपद्रव होत होता. हा उपद्रव फिरोझशाह याने आपला विश्वासू सरदार सिद्धू याच्या मदतीने मोडून काढला. या कामगिरीचे बक्षीस म्हणून सिद्धू याचा मुलगा भैरवसिंग यास मुधोळ व त्याच्या आजूबाजूची ८४ गावे जहागिरी म्हणून देण्यात आली.
फिरोझशाहने आपल्या २५ वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत शेजारील विजयनगर साम्राज्याबरोबर अनुक्रमे इ. स. १३९७, १४०६ व १४१७ या वर्षी युद्धे केली. यांपैकी १४०६ साली झालेल्या लढाईत विजयनगरने फिरोझशाहबरोबर तह केला. यावेळी त्याने विजयनगरच्या राजकन्येबरोबर विवाह केला. तसेच खेडला येथील सरदार नरसिंगराय याचे बंड त्याने मोडून काढले. विजयनगर बरोबर पानगळ येथे झालेल्या युद्धात बहमनी फौजांचा साफ पराभव होऊन फिरोझशाहला माघार घ्यावी लागली.
हजरत मुहंमद बंदेनवाज गेसू दराज हे सुफी संत गुलबर्गा येथे येऊन स्थायिक झाले (१४००). सुरुवातीला फिरोझशाहने त्यांना अतिशय सन्मानाने वागविले, परंतु पुढे या दोघांमधे वितुष्ट निर्माण झाले. फिरोझशाहचा भाऊ अहमदशाह मात्र या साधूंचा निस्सीम भक्त बनला. आपल्या उतारवयात त्याने आपला मुलगा हसनखान यास सुलतान बनविण्याचा एक दुबळा प्रयत्न केला. परंतु फिरोझशाहचा भाऊ अहमदशाह याने हा बेत यशस्वी होऊ दिला नाही. शेवटी फिरोझशाहने शहाणपणा दाखवून सुलतानपदाचा त्याग केला व अहमदशाह यास सुलतान म्हणून मान्यता दिली. या घटनेनंतर थोड्याच दिवसांत रोजी गुलबर्गा येथे फिरोझशाहचे निधन झाले (३ ऑक्टोबर १४२२).
फिरोझशाह बहमनी घराण्यातील एक विद्वान आणि व्यासंगी सुलतान म्हणून प्रसिद्ध होता. त्याला अनेक भाषा अवगत होत्या. त्याच्या कारकिर्दीत व्यापार-उदीम यांची भरभराट झाली. त्याच्या दरबारात अनेक कवी, तत्त्ववेत्ते व विद्वान यांचा समावेश होता. त्याने राज्यात सामान्य प्रजेसाठी सरकारी खर्चाने दवाखाने उघडले, तसेच भीमा नदीच्या काठी फिरोझाबाद हे नवीन शहर वसवून तेथे एक राजवाडा बांधला. त्याला खगोलशास्त्रात रुची होती. यासाठी त्याने दौलताबाद येथे हाकीम हसन व सय्यिद मुहंमद (काझीरून) या गीलान (इराण) येथील दोन प्रसिद्ध ज्योतिषांच्या मार्गदर्शनाखाली वेधशाळा बांधण्याचे काम सुरू केले होते. असे असले तरी अतिरिक्त मद्यपान आणि विषयोपभोग हे त्याचे ठळक दोष होते.
संदर्भ :
- Nayeem, M. A. The Heritage of the Bahmanis & The Baridis of the Deccan, Hyderabad, 2012.
- कुंटे, भ. ग. फरिश्ता लिखित गुलशन ई इब्राहिमी, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई, १९८२.
- खरे, ग. ह. मध्ययुगीन महाराष्ट्राचा इतिहास (इ.स.१२९६ ते १६३६), महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई, २००१.
- फडके, य. दी.; माटे, म. श्री.; कंटक, मा. रा.; कुलकर्णी, गो. त्र्यं. शिवछत्रपती इतिहास आणि चरित्र,खंड :१, शिवपूर्वकाल, पुणे, २००१.
समीक्षक : प्रमोद जोगळेकर