भारतीय मध्ययुगीन कालखंडातील दख्खनमधील एक शहर. बहमनी सुलतान फिरोझशाह बहमनी (कार. १६ नोव्हेंबर १३९७–२२ सप्टेंबर १४२२) याने कर्नाटक राज्यातील गुलबर्गा येथे भीमा नदीच्या काठावर हे शहर वसवले.

दोन रंगांच्या दगडांतील दरवाजा, फिरोझाबाद.

दक्षिणमध्य भारतात १३४७ साली स्थापन झालेले बहमनी साम्राज्य पुढे सु. दोनशे वर्षे टिकले. या प्रदीर्घ कालावधीत अनेक बहमनी सुलतानांनी आपल्या साम्राज्याच्या वैभवात भर घातली. आठवा बहमनी सुलतान फिरोझशाह याने गुलबर्गा या बहमनी साम्राज्याच्या राजधानीच्या दक्षिणेस सु. ३० किमी. अंतरावर भीमा नदीच्या काठी एक नवीन तटबंदीयुक्त शहर निर्माण केले.

मध्ययुगीन इतिहासकार फरिश्ताच्या मते, फिरोझशाहानेच या शहराला फिरोझाबाद हे नाव दिले. शहरातील रस्ते अत्यंत रुंद व व्यवस्थित आखणी करून बांधण्यात आले होते. शहरात अनेक वेगवेगळे भव्य असे राजवाडे होते. या प्रत्येक राजवाड्याला भीमा नदीतून कालवे खोदून पाणीपुरवठा करण्यात आला होता. हे राजवाडे फिरोझशाहने आपल्या आवडत्या राण्यांना देऊ केले होते.

हमामखाना, फिरोझाबाद.

एके काळी वैभवाच्या शिखरावर असलेले फिरोझाबाद हे शहर सांप्रत भग्न अवस्थेत आहे. शहराचा विस्तार काहीसा चौकोनी असून शहराच्या चारही बाजूला तटबंदीचे अवशेष दिसून येतात. हा भुईकोट किल्ल्याचा एक प्रकार असून याच्या पश्चिम व दक्षिण बाजूला भीमा नदी आहे. शहराला चार दरवाजे असून सर्वच दरवाजे आजही टिकून आहेत. तटबंदीची पडझड झाली असली, तरीही ठिकठिकाणी बुरूज अस्तित्वात आहेत. तटबंदीच्या आत राजवाडा, मशीद, दोन हमामखाने, स्वयंपाकघर यांचे अवशेष विखुरलेले आहेत. किल्ल्यामध्ये फरिश्ताने नमूद केलेल्या खोदीव कालव्याच्या खुणा मात्र दिसत नाहीत. किल्ल्याच्या आतील भागात मोठ्या प्रमाणावर शेती असल्यामुळे बरेच अवशेष दिसून येत नाहीत.

हमामखान्याची आतील बाजू, फिरोझाबाद.

फिरोझाबाद येथील वास्तुरचनेचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे येथील हमामखाना आणि स्वयंपाकघर यांच्यावर छोटे गोलघुमट व त्रिकोणी पिरॅमिड यांचे मिश्रण असलेले छत. अशा प्रकारचे छत हे गुलबर्गा किल्ल्यातील जामा मशिदीवर तसेच पूर्वेकडील दरवाजाजवळ असलेल्या वसाहतीच्या छतावर आढळून येते. हा प्रकार बहुधा यूरोप किंवा मध्यपूर्व येथून आला असण्याची शक्यता आहे. फिरोझाबाद येथे एका मोठ्या मशिदीचे अवशेष आहेत. या मशिदीच्या अवशेषांवरून तिच्या भव्यतेचा अंदाज बांधता येतो. किल्ल्यातील मध्य भागामध्ये काही ठिकाणी दोन मजली इमारतींचे अवशेष दिसून येतात. हे राजवाड्यांचे अवशेष असावेत. हे शहर एका पावसाळ्यात भीमा नदीच्या भीषण पुराच्या तडाख्यात सापडल्याचा उल्लेख सय्यिद अली तबातबा याने आपल्या बुर्हान-इ-मआसिर या ग्रंथात केला आहे. भीमा नदीच्या बाजूला बांधलेला किल्ल्याचा दरवाजा अत्यंत आकर्षक असून तो शहाबादी व बेसाल्ट या दोन प्रकारच्या दगडांत बांधल्यामुळे दरवाजाचा रंग काळा व राखाडी असा दिसतो. या दरवाजाच्या बाजूला दोन पंचकोनी बुरूज बांधले आहेत.

भव्य मशिदीचे अवशेष, फिरोझाबाद.

फिरोझशाहाने केवळ स्वतःला विलासी जीवनाचा आनंद लुटता यावा, या उद्देशाने या शहराची निर्मिती केली होती. पुढे त्याच्या मृत्यूनंतर हे शहर फार काळ राहू शकले नाही. फिरोझशाहानंतर त्याचा भाऊ अहमदशाह बहमनी हा सत्तेवर आला (१४२२). अहमदशाह याने फिरोझशाहचा मुलगा हसनखान याला फिरोझाबाद हे शहर जहागीर म्हणून दिले व तेथेच त्याला नजरकैदेत ठेवले. पुढे या शहराचे महत्त्व कमी होत गेले.

 

 

 

 

संदर्भ :

  • Nayeem, M. A. The Heritage of the Bahmanis & The Baridis of the Deccan, Hyderabad, 2012.
  • कुंटे, भ. ग. फरिश्ता लिखित गुलशन ई इब्राहिमी, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई, १९८२.
  • खरे, ग. ह. मध्ययुगीन महाराष्ट्राचा इतिहास (इ.स.१२९६ ते १६३६), महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई, २००१.
  • फडके, य. दी.; माटे, म. श्री.; कंटक, मा. रा.; कुलकर्णी, गो. त्र्यं. शिवछत्रपती इतिहास आणि चरित्र,खंड :१, शिवपूर्वकाल, पुणे, २००१.                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                       समीक्षक :  प्रमोद जोगळेकर