पेद्रो अल्व्हारेस काब्राल : (१४६७ ? – १५२०). पोर्तुगीज प्रवासी आणि समन्वेषक. त्याचा जन्म पोर्तुगालमधील बेलमोंट या शहरात झाला. त्याच्या वडिलांचे नाव फर्नाओ काब्राल तर आईचे नाव इझाबेल. त्याच्या अकरा भावंडात तो दुसरा होता. त्याचे वडील जॉन (द्वितीय) याच्या राजवटीत मुख्य न्यायाधीश होते. वयाच्या ३३ व्या वर्षी पोर्तुगालच्या राजाने भारताच्या सफरीवरून नुकत्याच परत आलेल्या वास्को-द-गामा याच्या शिफारशीनुसार काब्रालला समुद्र सफरीवर पाठवले. मात्र त्याला या कामाचा पूर्वानुभव होता किंवा नाही याबाबत कोणतीही माहिती मिळत नाही. तेरा जहाजे व त्यावरील १२०० सैनिक व खलाशी यांच्यासह त्याने भारतात जाण्यासाठी ८ मार्च १५०० या दिवशी पोर्तुगाल सोडले. या काफिल्यात २०० ते ३०० टनांची १० मोठी जहाजे व तीन लहान जहाजे होती. काब्राल हा पोर्तुगीज राजाचा प्रतिनिधी म्हणून भारताकडे निघाला होता. त्याला कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत कार्य करण्याचा पूर्ण अधिकार देण्यात आला होता. त्याच्या प्रवासाचे वर्णन त्याच्या ताफ्यातील लोकांनी लिहून ठेवलेल्या वृत्तांतावरून समजते.
काब्राल २२ मार्च रोजी केप वर्दे बेटावर पोचला. तेथे त्याला वादळाचा तडाखा बसला. त्यात त्याच्या ताफ्यातील एक जहाज भरकटले व नंतर ते लिस्बनला पोचले. तेथून निघाल्यावर एप्रिलच्या अखेरीस काब्रालला जमीन दिसली. तो इतका पश्चिमेस गेला होता की, तो ब्राझीलच्या किनाऱ्यावर पोचला होता. तो ब्राझीलचा किनाऱ्यावर पाय ठेवणारा पहिला पोर्तुगीज ठरला. येथे अधिक काळ न घालवता पाणी भरून घेऊन त्याने एक जहाज पोर्तुगालच्या राजाकडे पाठविले. ‘ब्राझीलच्या किनाऱ्यावर आपली एक वसाहत स्थापन करावी, जी आपल्याला कालिकतला जाण्यास उपयोगी पडेल’ अशा आशयाचा अहवाल पाठवून काब्राल पूर्वेकडे निघाला. प्रवास करत दक्षिण आफ्रिकेच्या टोकाला म्हणजे ‘केप ऑफ गुड होप’ला वळसा घालून मोझांबिक जवळ येताना वाटेत त्याला मोठ्या वादळाला तोंड द्यावे लागले. या वादळात त्याला आपली चार जहाजे व अनेक माणसे गमवावी लागली. यातील एका जहाजावर आफ्रिकेच्या दक्षिण टोकावर म्हणजे ‘केप ऑफ गुड होप’ वर प्रथम पाय ठेवणारा बार्थोलोम्यू दीयश होता. ‘केप ऑफ गुड होप’ ही दीयशची दफनभूमी ठरली. वाचलेल्या सात जहाजांपैकी एका जहाजाचा प्रमुख दीयशचा भाऊ पेद्रो दीयश होता. या वादळातून बाहेर पडल्यावर काब्राल सध्याच्या टांझानियातील किल्वा येथे पोचला. तेथील अमीर अब्राहम याने काब्रालला पाणी व अन्नपदार्थांची मदत केली. तेथून पुढे तो सध्याच्या केनियातील मालिंदी बंदरात पोहोचला. तेथे त्याचे भव्य स्वागत झाले. मालिंदी बंदरात त्याने खंबायत येथील ३ जहाजे बघितली. या जहाजांचे वर्णन करताना, ती २०० टनाची असून त्यांची बांधणी अतिशय उत्कृष्ट दर्जाची असल्याचे तो सांगतो. बांधणीत दोरीचा वापर कुशलपणे केला असल्याचे देखील तो नमूद करतो. तेथील वर्णनात मालिंदीच्या राजाने त्याचे स्वागत केल्याबद्दल माहिती मिळते. तेथून तो ७ ऑगस्ट रोजी मलबारला जाण्यास निघाला. वाटेत तो सोमालियातील मॉगाडिशू आणि इराणमधील होर्मूझ बंदराला भेट देत भारताच्या किनारपट्टीवर २२ ऑगस्टला पोहोचला. तेथून पुढे प्रवास करत हा काफिला १३ सप्टेंबरला कालिकत येथे पोहोचला.
कालिकतला पोहोचल्यावर काब्राल तेथील राजाला भेटला. त्यावेळच्या वर्णनात तो असे म्हणतो की, राजा एका उंच चौथऱ्यावर बसलेला होता, त्याच्या आजूबाजूला २० रेशमी उशा होत्या, छताला जांभळ्या रंगाचे रेशमी कापड लावलेले होते. राजाने कंबरेच्या वर कोणतेही वस्त्र परिधान केलेले नव्हते. त्याने सोनेरी कडा असलेले पांढऱ्या रंगाचे उंची कापड परिधान केलेले होते. त्याच्या डोक्यावर सोन्याचा उंच मुकुट असून त्यात अनेक रत्ने व मोती बसवलेले होते. राजाच्या जवळच त्याचे वडील व दोन भाऊ उभे असल्याचे तो सांगतो. नंतर काब्रालने पोर्तुगीज राजाचे पत्र कालिकतच्या राजाला दिले. जवळपास अडीच महिन्यांच्या वाटाघाटीनंतर पोर्तुगीज व कालिकतच्या राजात तह झाला. राजाने समुद्राजवळ पोर्तुगीजांना जागा दिली. कालिकतच्या राजाने हा तह ताम्रपटावर करून दिल्याचे वर्णनात म्हटलेले आहे. त्याने कालिकत बंदरात पाच हत्ती घेऊन जाणारे जहाज बघितल्याचे लिहिलेले आहे.
काब्रालने कालिकतमधील प्रथा व शिष्टाचार याबद्दल वर्णन करताना सांगितले आहे की, कालिकत हे शहर खूप मोठे असून ते बंदिस्त नाही. येथील दोन घरात खूप मोकळी जागा असून घरे कोरलेल्या दगडांत बांधलेली आहेत. घराच्या बाजूला झाडे, स्नानाचे तलाव व पिण्याच्या पाण्याच्या विहिरी आहेत. येथील लोक दिवसातून ३-४ वेळा स्नान करतात. राजा मूर्तिपूजक आहे. येथील लोक रंगाने काळे असून शरीराने दणकट आहेत. त्यांचे कान टोचलेले असून ते कानात दागिने घालतात. या लोकांच्या कमरेला इतर कोठेही न दिसणारी व टोकाकडे रुंद असणारी तलवार असते. ते एक ते पाच बायकांशी लग्न करतात. येथील स्त्रियांच्या शरीराच्या कमरेवरील भाग उघडा असतो. येथील लोक दिवसातून दोनदा जेवतात. ते ब्रेड, मांस तसेच दारू घेत नसल्याचे वर्णनही केले आहे. येथील पुरुष व स्त्रिया पान खात असल्याचे, तसेच एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास ते दात घासतात व अनेक दिवस जेवत नसल्याचे वर्णन केलेले आहे. पुढे येथील राजाला दोन बायका असल्याचे व राजाच्या मृत्यूनंतर त्याच्या मुलांच्या ऐवजी राजाचा पुतण्या किवा बहिणीचा मुलगा राज्यावर बसत असल्याचे नमूद केले आहे. राजाच्या मृत्यूनंतर त्याला चंदनाच्या चितेवर अग्नी दिला जात असल्याचे आणि कालिकतमधे सतीप्रथा असल्याचे सांगतो. विशिष्ट जातीतील लोकांना मृत्यूनंतर पुरण्याच्या प्रथेचे वर्णन त्याने केलेले आहे.
तेथील व्यापाराच्या वर्णनात सोने, चांदी, रत्ने, मोती कस्तुरी, राळ (Ambar), धूप (Benzon), अगरबत्ती, कोरफड, चिनी मातीच्या वस्तू, कबूतरे, दालचिनी, ब्राझील-लाकूड, चंदन, लाख, जायफळ व जायपात्रीचा व्यापार शेट्टी लोक करतात, असे वर्णन काब्रालने केले आहे. हे व्यापारी केसांची वेणी घालत असल्याचे तो म्हणतो. कालिकतमधील वस्तूंच्या व्यापार विनिमयाचे दर काब्रालच्या वर्णनात मिळतात.
काब्रालने पुढे डिसेंबरमध्ये कालिकत सोडले, कोचीन, कुन्नूर मार्गे त्याने आपला परतीचा प्रवास चालू केला. परतीच्या प्रवासात त्याचे एक जहाज फुटले, त्यातील माणसे वाचवून त्या जहाजास त्याने आग लावली. पोर्तुगालहून १३ जहाजे घेऊन निघालेला काब्राल २२ मे १५०१ रोजी फक्त चार जहाजांसह पोर्तुगालच्या किनाऱ्यावर पोहोचला. या प्रवासात त्याने अनेक संकटांचा सामना करताना आपली पुष्कळ जहाजे आणि माणसे गमावली.
संदर्भ :
- Beeton, Samuel Orchart, Beeton’s Dictionary of Universal Biography, London, 1870.
- Greenlee, William Brooks, The Voyage of Pedro Alvares Cabral to Brazil and India, London, 1938.
समीक्षक : प्रमोद जोगळेकर