नोमिरा (केओंझार; ओडिशा) भागात लोह धातुक खनिज पट्ट्यात (Iron ore formation belt) असणारे उशी लाव्हा हे चांगल्या प्रकारे संरक्षित राहिलेले आहेत. येथील उशी लाव्हा हे अंडाकृती आणि मोठ्या आकारात (Large size ellipsoidal) असून एकत्रितपणे २ मी. × ०.६ मी. जाडीच्या घट्ट राशीमध्ये आहेत. हे उशी लाव्हा हिरव्या ते निळसर हिरव्या रंगाचे लहान ते मध्यम कणांचे (Fine and medium grained) आणि अल्पसिलिक (Basic) गटातील आहेत. त्यांच्यातील पिटुक्यांचे / कुहरींचे (Vesicles) प्रमाण जास्त असून ते सर्व क्वॉर्ट्झ सिलिका खनिजाने भरलेले आहेत. हा उशी लाव्हा आणि त्याबरोबर असलेले स्फोटशकली आणि टफ घटक (Pyroclastics and Tuff material) हे अंदाजे १६०० ते २००० द.ल. वर्षांपूर्वीचे असून ते त्यांच्यापेक्षा जुन्या अशा क्वॉर्ट्झाइट (Quartzites) गटाच्या खडकांवर विराजमान असून त्यांच्यापेक्षा तरुण अशा अवसादी लोहयुक्त धातुक खडकांच्या (उदा., शेल, चर्टीशेल, पट्टीत हेमॅटाइट जास्पर इ.) गटाने आच्छादलेले आहेत.
केओंझार – बार्बिल – लहुणीपाडा या राज्य रस्ते महामार्गावरील जोडा या शहरापासून १८ किमी. दक्षिणेला हे उशी लाव्हाचे राष्ट्रीय भूवैज्ञानिकीय स्मारक आहे. उशी लाव्हा याला उपधानी लाव्हा / शिरोधान लाव्हा (Ellipsoidal Lava) असेही म्हणतात.
संदर्भ :
समीक्षक : पी. एस. कुलकर्णी