बुलढाणा जिल्ह्यातील लोणार गावाजवळ असलेले जगप्रसिद्ध असे खाऱ्या पाण्याचे सरोवर. शास्त्रज्ञांच्या मते भूशास्त्रीय क्रिटेसिअस काळात (सु. ५.५ ते ६.५ कोटी वर्षांपूर्वी) ज्वालामुखीच्या उद्रेकातून निर्माण झालेल्या महाराष्ट्रातील दख्खन बेसाल्टच्या पठारावर उल्का आघाताने तयार झालेले हे विवर आहे. काहींच्या मते यापूर्वी हे ज्वालामुखीच्या केंद्रीय उद्रेकातून तयार झाले असावे, मात्र  हे नेमके केंव्हा अस्तित्वात आले यावर अद्याप एकमत झालेले नाही. परंतु अलीकडील काळात झालेल्या  संशोधनावरून अवकाशातून अतिवेगाने आलेल्या उल्केच्या आघातानेच असे प्रचंड आकाराचे विवर निर्माण होऊ शकते, हे तेथील खडक, खनिजे व माती यांच्या नमुना चाचणी आणि अभ्यासातून शास्त्रज्ञांनी सांगितले आहे.

जगातील उल्कापाषाण पतनामुळे निर्माण झालेल्यांमध्ये हे तिसऱ्या क्रमांकाचे मोठे विवर आहे. या विवरात दडला गेलेला उल्कापाषाण साधारण ६०० मी. खोलीवर रुतून बसला असावा, असा एक अंदाज आहे. या प्रचंड आकाराच्या विवराचा सरासरी व्यास १७१० मी. असून कडांची सरासरी उंची ४० मी., तर खोली २३० ते २४५ मी. आहे. या साधारण वर्तुळाकृती असलेल्या सरोवराच्या मध्यवर्ती भागातील पाणी हे आल्कधर्मी व खारे आहे. पृथ्वीच्या अंदाजे ४.५ अब्ज वर्षे अशा प्रचंड भूशास्त्रीय काळामध्ये तयार झालेली अशा प्रकारची कित्येक किमी. व्यासाची आणि जास्तीत जास्त २ अब्ज वर्षांपूर्वीपर्यंत आयुर्मान असू शकणारी सुमारे १३० विवरे शास्त्रज्ञांनी शोधली आहेत.

हे सरोवर लोणार गावाच्या नैऋत्य दिशेला असून त्याचा परिसर हा वनस्पती, प्राणी, पक्षी इ. जैवविविधतेचा असल्याने ते प्रतिबंधित अभयारण्य म्हणून राखीव आहे. लोणार हे गाव मेहकर बुलढाणा हमरस्त्यावर बुलढाणा शहराच्या आग्नेय दिशेला ९० किमी. अंतरावर असून परभणी हे नजीकचे रेल्वेस्थानक आहे, ते लोणारच्या दक्षिण-दक्षिणपूर्व दिशेला १०० किमी. अंतरावर असून पश्चिमेला ८२ किमी. अंतरावर असलेल्या जालना या द. पू. मनमाड – काचीगुडा मार्गावरील स्थानकावरूनही तेथे जाता येते.

संदर्भ :

                                                                                                                                                                                                                        समीक्षक : पी. एस. कुलकर्णी