समुद्रसपाटीपासून वाढत्या खोलीनुसार महासागराचे स्थूलमानाने चार विभाग केले जातात : (१) सागरमग्न खंडभूमी – ० ते २०० मी. खोलीचा तळभाग, (२) खंडान्त उतार – २०० ते २,००० मी. खोलीचा तळभाग, (३) अगाधीय सागरी मैदान – २,००० ते ६,००० मी. खोलीचा मैदानी प्रदेश आणि (४) सागरी खंदक व गर्ता – ६,००० मी. पेक्षा अधिक खोलीचा सागरतळ.

सागरमग्न खंडभूमी : खंडाजवळच्या उथळ सागरी प्रदेशाला सागरमग्न खंडभूमी असे म्हणतात. हिंदी महासागरातील सागरमग्न खंडभूमी प्रदेश अरुंद आहेत. येथील सागरमग्न खंडभूमीचा किनाऱ्यापासूनचा सरासरी विस्तार सुमारे १२० किमी., तर  सर्वाधिक विस्तार सुमारे ३०० किमी. पर्यंत असून, तो भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील मुंबईजवळ आणि ऑस्ट्रेलियाच्या वायव्य किनाऱ्याजवळ आढळतो. बेटांजवळच्या सागरमग्न खंडभूमीची रुंदी केवळ सुमारे ३०० मी. इतकी कमी आढळते. सागरमग्न खंडभूमीच्या पुढे खंडान्त उतार सुरू होतो. आफ्रिका, आशिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्याभोवती असलेल्या सागरमग्न खंडभूमीचा उतार हळूहळू उतरत जाऊन तो सरासरी १४० मी. खोलीपर्यंत गेलेला आढळतो. सागरमग्न खंडभूमीच्या पुढील सागरतळ बराच ओबडधोबड असून त्यावर जलमग्न पर्वतरांगा (कटक), रुंद पठारी प्रदेश, खोल द्रोणी, तीव्र उताराचे खंदक आणि गर्ता आढळतात. आशियातील गंगा व सिंधू नदी आणि आफ्रिकेतील झँबीझी या नद्यांनी आपल्या पात्रांची मोठ्या प्रमाणावर झीज करून वाहून आणलेला गाळ त्यांच्या मुखाजवळच्या सागरमग्न खंडभूमीवर, खंडान्त उताराच्या पायथ्याजवळील खंडीय उंचवटा आणि अगाधीय सागरी मैदान या प्रदेशांत साचलेला आढळतो. गंगा नदीच्या अवसादाचा शंकू जगातील सर्वांत विस्तृत व जाडीचा आहे.

अगाधीय टेकड्या : अगाधीय (गभीर) सागरी मैदानी प्रदेशातून एकदम उंचावलेल्या आणि ज्यांची सागरतळापासून किमान उंची १,००० मी. आहे, अशा टेकड्यांना (शिखरांना) अगाधीय टेकड्या किंवा जलमग्न शिखरे असे म्हणतात. ही सामान्यपणे सपाट माथ्याची आणि  मृत ज्वालामुखीचे शंकू असतात. मध्य हिंदी महासागरीय द्रोणी प्रदेशात प्रामुख्याने रेयून्यों आणि सेशेल्स बेटांच्या दरम्यान, तसेच ह्वॉर्टन द्रोणीजवळील व्हेनिंग मेइनेस्झ समूहात अनेक ज्वालामुखी अगाधीय टेकड्या आहेत. बार्दीन, कोलर, निकितीन व विल्यम्स या काही प्रमुख अगाधीय टेकड्या आहेत.

महासागरी द्रोणी प्रदेश : हिंदी महासागरातील द्रोणी प्रदेश सफाईदार, दाट निक्षेपयुक्त सपाट मैदानांनी आणि त्यांवरील जलमग्न कटक व टेकड्यांनी युक्त असे आहेत. यातील टेकड्यांची उंची १,००० मी. पेक्षा कमी असते. या महासागरातील जटिल कटकरचनेमुळे सुमारे ३२० ते ९,००० किमी. रुंदीचे द्रोणीप्रदेश निर्माण झाले आहेत. द्रोणींची खोली भूपृष्ठापासून सुमारे ५,००० मी. पेक्षा अधिक आढळते. ढोबळमानाने उत्तरेकडून दक्षिणेकडे अनुक्रमे अरेबियन, सोमाली, मास्कारेन्य, मादागास्कर, मोझँबीक, अगुल्हास व क्रॉझे हे पश्चिम भागातील द्रोणीप्रदेश; मध्य हिंदी महासागरातील विस्तृत ह्वॉर्टन द्रोणी आणि पूर्व भागातील दक्षिण ऑस्ट्रेलियन द्रोणी हे प्रमुख द्रोणी प्रदेश आहेत.

सागरी खंदक व गर्ता : महासागराच्या तळाशी आढळणाऱ्या लांब, चिंचोळ्या आणि तीव्र उतार असलेल्या भूमिस्वरूपाला किंवा खळग्याला सागरी खंदक आणि गर्ता (खोलवा) असे म्हणतात. खंदकाच्या अतिखोल भागास गर्ता म्हणतात. सामान्यपणे ज्या भागात एक भूपट्ट दुसऱ्या भूपट्टाखाली सरकलेला असतो त्या भागात किंवा लगतच्या बेटांच्या कमानींना अनुसरून सागरी खंदक व गर्ता आढळतात. पॅसिफिक  महासागरातील मॅरिआना गर्त (११,०३४ मी.) ही जगातील ज्ञात असलेली सर्वाधिक खोल गर्त आहे. हिंदी महासागरात तुलनेने कमी खंदक व गर्ता आहेत. या महासागराची सरासरी खोली ३,८९० मी. असून सर्वाधिक खोली (७,४५० मी.) जावा बेटाच्या दक्षिणेस असलेल्या जावा खंदकातील सूंदा गर्तेत आहे. जावा खंदकाची लांबी सुमारे ४,५०६ किमी. व रुंदी ८० किमी. असून हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा लांब खंदक आहे. दक्षिणेस जावा बेटाच्या नैर्ऋत्य भागापासून सुरू होणारा हा खंदक उत्तरेस सुमात्रा बेटाच्या पश्चिम भागातून पुढे अंदमान व निकोबार बेटांच्या किनाऱ्यापर्यंत विस्तारलेला आहे. उत्तर भागात हा खंदक सूंदा या नावाने ओळखला जातो. सुमात्राजवळचा हा सूंदा खंदक अरुंद असून जागृत ज्वालामुखीय आणि क्रियाशील भूकंपीय प्रदेश आहे. याच भागात २००४ मध्ये झालेल्या ९.१ इतक्या प्रचंड तीव्रतेच्या सागरांतर्गत भूकंपामुळे अतिविनाशकारी त्सुनामी लाटा निर्माण झाल्या होत्या. त्यात भूकंपाच्या केंद्रापासून सुमारे १,००० किमी.पर्यंतचे क्षेत्र प्रभावित झाले होते. त्यात प्रामुख्याने इंडोनेशियाच्या किनाऱ्यावरील शहरे, बंगालच्या उपसागराच्या अगदी उत्तर टोकापर्यंतची शहरे, त्याचबरोबर या महासागराच्या पश्चिम किनाऱ्यावरील शहरे यांची खूप हानी झाली होती. भारताच्या दोन्ही किनारपट्ट्यांनाही त्यांचा तडाखा बसला होता. त्यामुळे फार मोठी प्राणहानी आणि वित्तहानी झाली होती.

समीक्षक : माधव चौंडे