बॉझ्निया आणि हेर्ट्सगोव्हीना या देशाची राजधानी आणि देशातील एक प्रमुख औद्योगिक व सांस्कृतिक केंद्र. लोकसंख्या ४,१९,९५७ (२०१९). हे देशाच्या पूर्वमध्य भागात बॉस्ना नदीच्या काठावर, ट्रेबेव्हिक पर्वताच्या पायथ्याशी वसले आहे. शहराची स्थापना इ. स. १२६३ मध्ये झाली. इ. स. १४२९ मध्ये तुर्कांच्या ताब्यात गेले, तेव्हा त्याचे बॉझ्ना साराई असे नाव बदलण्यात आले. तुर्कांचे हे प्रमुख लष्करी व व्यापारी केंद्र बनले होते. इ. स. १४८० मध्ये हंगेरियनांनी शहराची लूट केली. सोळाव्या शतकात हे भरभराटीच्या शिखरावर पोहोचले. इ. स. १६९७ मध्ये ऑस्ट्रियनांनी शहराची जाळपोळ केली. इ. स. १८१८ मध्ये ते यूगोस्लाव्हियाकडे आले. ऑटोमन साम्राज्याला उतरती कळा लागल्यानंतर इ. स. १८५१ मध्ये तुर्कांनी बॉझ्निया-हेर्ट्सगोव्हीना प्रांताची राजधानी सारायेव्हो केली. पुन्हा इ. स. १८७८ मध्ये ते ऑस्ट्रिया-हंगेरीच्या ताब्यात आले. पुढे ते सर्बियन क्रांतिकारी चळवळीचे प्रमुख केंद्र बनले. २८ जून १९१४ रोजी सारायेव्होचा आर्चड्यूक फ्रान्सिस फर्डिनंड व त्याची पत्नी यांची हत्या झाली. या घटनेतूनच पहिल्या महायुद्धाला तोंड फुटले. इ. स. १९१८ मध्ये हे यूगोस्लाव्हियात समाविष्ट करण्यात आले. दुसऱ्या महायुद्धात एप्रिल १९४१ ते एप्रिल १९४५ या काळात सारायेव्हो जर्मनांच्या ताब्यात होते. १९९२ मध्ये बॉझ्निया-हेर्ट्सगोव्हीनाच्या स्वातंत्र्यानंतर ही त्याची राजधानी करण्यात आली. याच वर्षी झालेल्या वांशिक दंगलीच्या वेळी सर्बियाच्या लोकसेनेने सारायेव्होला वेढा घातला. या हल्यात सारायेव्होचे बरेच नुकसान झाले होते.

शहरात धातुउत्पादने, पोलाद, विद्युत साहित्य, कापड, गालिचे, रेशीम, तयार कपडे, तंबाखू प्रक्रिया, बीटपासून साखर निर्मिती, फर्निचर, मातीची भांडी, जडजवाहीर, मद्यनिर्मिती, यंत्रसामग्री व कृषिविपणन इत्यादी उद्योगधंदे चालतात. परिसरातून लोहखनिज, लिग्नाइट कोळसा, मँगॅनीज या खनिजांचे उत्पादन मिळते. ऑर्थोडॉक्स चर्च, रोमन कॅथलिक चर्च, तसेच मुस्लिम उलेमा यांचे हे प्रमुख केंद्र आहे. शहरातील जवळजवळ निम्मे लोक मुस्लिम आहेत. मुस्लिम वास्तुकलेसाठी हे शहर विशेष प्रसिद्ध आहे. अनेक मशिदी, सुशोभित लाकडी घरे, जुनी तुर्की बाजारपेठ इत्यादी मुस्लिम प्रभावाची ठळक वैशिष्ट्ये अजूनही येथे पाहायला मिळतात. सुमारे शंभरावर मशिदी येथे असून त्यांपैकी गाझी हुशरफबीची मशीद किंवा बेंगोव्हा झामिनाद (स्था. १५३०) व अली पाशाची मशीद (१५६०-६१) या प्रमुख मशिदी आहेत. बेंगोव्हा झामिनाद मशिदीजवळ सोळाव्या शतकातील घड्याळ मनोरा आहे. शहरात एक विद्यापीठ (स्था. १९४९), अनेक मुस्लिम मदरसे (धार्मिक विद्यालये) व महाविद्यालये आणि वस्तुसंग्रहालये आहेत. शहरात गरिबांसाठी मोफत अन्नछ्त्र चालविले जाते व सार्वजनिक स्नानसुविधा पुरविली जाते. सारायेव्हो हे हिवाळी खेळांचे केंद्र असून १९८४ मधील हिवाळी ऑलिंपिक क्रीडा सामने येथे झाले होते. या शहराजवळ नवाश्मयुगकलीन वसाहतीचे अवशेष आढळतात.
समीक्षक : ना. स. गाडे
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.