मृदुकाय (मॉलस्का) संघातील शीर्षपाद (सेफॅलोपोडा) वर्गाच्या सेपिडी कुलातील एक सागरी प्राणी. त्याला माकूल अथवा कवठी माकूळ असेही म्हणतात. माखली हा मासा नसून एक अपृष्ठवंशी प्राणी आहे. त्याच्या १००पेक्षा अधिक जाती असून हिंदी महासागरात प्रामुख्याने आढळणाऱ्या जातीचे शास्त्रीय नाव सेपिया अॅक्युलिएटा आहे.
माखली साधारणपणे १५–२० सेंमी. लांब असतात. त्यांचे वास्तव्य समुद्राच्या उथळ पाण्यात खबदाडीच्या जागेत असते. परंतु अनेक वेळा ते बिळात राहतात. काही वेळा ते समुद्रात ३,०००–४,००० मी. खोलीपर्यंत आढळतात. वर्षातून ठराविक काळात ते नियमितपणे स्थलांतर करतात. डोके आणि धड असे त्यांच्या शरीराचे भाग असून त्यांना जोडणारी मान लहान व निमुळती असते. डोक्याचा भाग गोलाकार असून डोक्याच्या दोन्ही बाजूंना मोठे डोळे असतात. पुढच्या भागात तोंड व त्याभोवती दहा बाहूंचे वलय असते. बाहूंच्या पाच जोड्या असून त्यांपैकी चौथी जोडी इतरांपेक्षा वेगळ्या आकाराची व जास्त लांबीची असते. या जोडीला स्पर्शक म्हणतात. इतर बाहू सुरुवातीला जाड व टोकाकडे निमुळते होत गेलेले असतात. त्यांच्या आतील भागावर खोलगट चूषके असतात. स्पर्शक जोडीचा आकार टोकाकडे गदेसारखा मोठा असून त्यावर फक्त टोकाकडे चूषके असतात. माखलीच्या शरीराच्या लांबीपेक्षा स्पर्शकांची लांबी जास्त असते. फलन होताना याच बाहूंद्वारे नरातील शुक्राणुधर (शुक्रपेशींची पिशवी) मादीला दिली जाते. या बाहूंमुळे नर-माखली व मादी-माखली स्पष्टपणे वेगळे दिसतात. हे बाहू आणि स्पर्शक आकुंचन-प्रसरण पावतात. भक्ष्य पकडण्यासाठी व स्वसंरक्षणासाठी त्यांचा उपयोग होतो. धडाचा आकार लांबट गोल असतो. पाठीवर निरनिराळ्या रंगांचे पट्टे असतात. पोटाखालच्या भागात एक लांब व नरसाळ्याच्या आकाराची नलिका असते. या नलिकेतून उत्सर्जक पदार्थ, न पचलेले अन्न, शाई, शुक्रपेशी किंवा अंडी बाहेर टाकली जातात. बाहूंच्या वलयात मुख असते. मुखाच्या पोकळीत पोपटाच्या चोचीच्या आकाराचे दोन जबडे असतात. त्यांच्या साहाय्याने माखली आपल्या भक्ष्याचे कवच फोडतात. खेकडे, शेवंडे, झिंगे व मासे हे माखलीचे प्रमुख अन्न आहे.
माखलीच्या धडात ऊर्ध्व बाजूस कातडीच्या खाली कवच असते. त्याचा आकार लांबट पानासारखा व कडेस टोकदार असतो. कवचाचा मुख्य गाभा कॅल्शियम कार्बोनेटच्या पातळ थरापासून तयार होतो. निरनिराळ्या थरांमध्ये असणाऱ्या पोकळ्यांत हवा भरलेली असते. शरीराच्या बाजूस पर असतात. जवळजवळ संपूर्ण शरीराभोवती पर असतात. माखली अतिशय चपळपणे उलट्या दिशेने पोहू शकतात. त्यांच्या शरीरात एक ग्रंथी असते. त्यात भुरकट शाईसारखा द्रव तयार होतो. शत्रूपासून तसेच संकटकाळी स्वसंरक्षणार्थ हा द्रव पाण्यात सोडून ते स्वत:ची सुटका करून घेतात. माखलींना रंग ओळखता येत नाही. परंतु ते आपल्या त्वचेचा रंग पर्यावरणाशी जुळेल असा चटकन बदलू शकतात.
भारत, चीन, जपान, इटली व ग्रीस या देशांत माखली खातात. खाण्यासाठी ताजे किंवा उन्हात वाळवून ठेवलेले माखली वापरतात. माखलीच्या धडाच्या बारीक तुकड्यांचा उपयोग मासे पकडताना गळाला लावण्यासाठी करतात. माखलीपासून मिळणाऱ्या भुरकट रंगाच्या द्रवाला ‘सेपिया इंक’ म्हणतात. तो शाई म्हणून वापरतात. कवचाचा उपयोग दंतमंजन करण्यासाठी, काही यंत्रांचे भाग साफ करण्यासाठी व ठसे घेण्यासाठी करतात. कवचाचे तुकडे लव्हबर्ड, पोपट व कॅनरी इत्यादी पाळीव पक्ष्यांना शरीरवाढीसाठी कॅल्शियम मिळावे म्हणून देतात. माखली मृत झाल्यावर त्यांचे कवच समुद्रावर तरंगू लागते. त्याला समुद्रफेन म्हणतात. हा समुद्रफेन आम्लरोधी, स्तंभक व शामक असतो.