प्रशासन हा शब्द व्यवस्थापनाच्या संदर्भात वापरला जातो. याचा सर्वसाधारण अर्थ म्हणजे कोणत्याही प्रकारची सेवा देणाऱ्या लोकांची काळजी घेण्याची सामूहिक क्रिया होय. परिचर्या विभागाचे प्रशासन आणि व्यवस्थापन ही एक गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. परिचर्येमध्ये प्रशासन हे व्यक्तींमधील संबंधाचे मौल्य आणि व्यावसायिक नीतिमूल्ये यावर आधारित असते. परिणामकारक परिचर्येचे व्यवस्थापन हे प्रशासकीय जबाबदारी देणे व घेणे यासाठी लागणारा पर्याप्त अधिकार यावर अवलंबून असते.
परिचर्या विभाग व त्यातील प्रशासन संकल्पना : परिचर्या म्हणजेच व्यक्तीची सेवा शुश्रूषा, जी कौशल्य हुशारी व चतुरपणे दिली जाते. त्यासाठी परिचारिका ही आजाऱ्यासमवेत राहून सेवा देते. या सर्व प्रक्रियेचा हेतू हाच असतो की, लोकांना आरोग्यदायी ठेवणे व आजारी व्यक्तिची काळजी घेऊन त्याला आजारातून बरे करण्यास मदत करणे. औषधोपचार आणि परिचर्या ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. परिचर्या विभाग हा दवाखान्यातील इतर विभागांशी संलग्न असून कार्यरत असतो. परिचर्या विभागाच्या प्रशासन व व्यवस्थापन यांचे दवाखान्यातील सर्व विभागांशी सर्व स्तरांवर अविरत व सतत असे नियोजन-आयोजन चालू असते. ज्यावरती आधारित परिचर्या सेवा- शुश्रूषा देण्याचे कार्य केले जाते. कोणत्याही दवाखान्याची प्रतिष्ठा किंवा नावलौकिक हा परिचर्या सेवा (Nursing Services) यावर अवलंबून असतो.
- चांगली ‘परिचर्या-सेवा’, ही प्रशासकीय नियोजन, दवाखाना व परिचर्येचे व्यवस्थापन आणि विशिष्ट सेवेच्या अटी (Policy) यांवर अवलंबून असते.
- परिचर्या सेवा विभाग हा प्रत्येक दवाखान्याचा अविभाज्य भाग असतो. ज्यामध्ये परिचारिका बसतात अशी जागा (Nurses Station), आजारी व्यक्तींचे बिछाने, परिचर्येच्या सेवा (Nursing Procedures) देण्याची जागा इत्यादींचा समावेश केला जातो. शिवाय नोंदी पुस्तके, औषधे-इंजेक्शन इ. ठेवण्याची जागा व कपाटे यांचाही समावेश होतो.
- परिचर्या विभागप्रमुख व्यक्ती (Head Nurse) ज्यांना परिचर्या संचालक, परिचर्या उपसंचालक, मेट्रन – अधिसेविका किंवा परिचर्या अधिकारी (Nursing Officer) असे संबोधतात. परिचर्या प्रमुख व्यक्ती ही दवाखान्याच्या व्यवस्थापकीय संचालकास उत्तराधिकारी म्हणुन जबाबदार असते. परिचर्या विभागात काम करणाऱ्या विविध परिचारिकांची पदे सर्वसाधारण अशी असतात. उदा. व्यावसायिक नर्सेस (Full Trained Staff Nurse), परिसेविका, परिचर्या प्रॅक्टीशनर, प्रशिक्षणार्थी परिचारिका, परिचर्या मदतनीस इ.
परिचर्येतील सेवा प्रशासन (Nursing Service Administration) : या संकल्पनेचा उहापोह करतांना पुढील तीन संज्ञा समजवून घेणे जरूरीचे असते. १. परिचर्या, २. आरोग्य सेवा आणि ३. प्रशासन व व्यवस्थापन.
१. परिचर्या ही एक प्रक्रिया आहे ज्यात परिचारिका ही निरोगी अथवा आजारी व्यक्तीला त्याच्या आरोग्याच्या स्थितीला सांभाळणे, बरे करणे किंवा आरोग्य संवर्धनासाठी मदत करीत असतो.
२. आरोग्य सेवा ह्यांचा अनेकविध अशा सेवांशी संबंध व संदर्भ येतो. ज्या एक व्यक्ती, कुटुंब किंवा समाजातील व्यक्तीसाठी व्यावसायिक आरोग्य सेवा देतात. आरोग्य सेवांचा प्रमुख हेतू म्हणजे आरोग्यवर्धन, संवर्धन आणि आरोग्याचे पुनर्वसन इ. या सर्व सेवांमध्ये परिचारिकेचा महत्त्वाचा सहभाग असतो.
३. परिचर्या प्रशासन ही एक वैज्ञानिक व कलात्मक प्रक्रिया असते. या प्रक्रियेत परिचारिका सेवा देतांना विविध विभागाचे नियोजन, आयोजन, संघटन यांचा समावेश होतो. उदा., बालरोग परिचर्या विभाग, स्त्री रोग परिचर्या, वैद्यकीय व शल्य परिचर्या, शस्त्रक्रिया विभाग आणि अपघात तात्कालिक परिचर्या विभाग इ.
परिचर्या प्रशासकीय विभागाचा प्रमुख उद्देश : परिचर्या सेवा देण्याच्या प्रक्रियेतून रोग्याची सर्वंकष काळजी घेण्यासाठी त्या हॉस्पिटलच्या नियमाधीन राहून शुश्रूषा देताना त्या अधिकाधिक परिणामकारक कशा होतील याचा विचार केला जातो.
परिचर्या प्रशासन – तात्विक बैठक :
- परिचर्या विभाग कायम आपल्या सेवा उत्कृष्ट प्रतीच्या व उत्तम नेतृत्वाखाली देण्यासाठी तयार असतात.
- परिचर्या विभागात काम करताना परिचारिका आपल्या सेवा दवाखान्याच्या उद्दिष्टांवर आधारित व उत्कृष्ट प्रतीच्या देण्यासाठी तत्पर असतात.
- परिचर्या सेवा या परिचारिका ज्ञान, कौशल्य व अनुभव आणि सेवाभाव (Attitude) यावर आधारित देतात.
- परिचारिका ह्या आजारी व्यक्तीला ती व्यक्ती लवकरात लवकर बरी होऊन निरोगी बनण्यास मदत करते.
- प्रत्येक परिचारिका सेवा पुरवितांना वय, लिंग, रंग, गरीब, श्रीमंत असा भेद आजाऱ्याच्या बाबतीत करीत नसते.
- परिचारिका सेवा देतांना समाजाच्या कल्याणकारी आणि आरोग्याच्या गरजा विचारात घेऊन सेवा पुरवितात.
- परिचारिकेच्या जबाबदाऱ्या, त्यांना देण्यात आलेल्या कामाचे स्वरूप, कामाचे वर्णन व काम करण्यासाठी स्वायत्तता या सर्व बाबी प्रशासकीय पत्रकात अधोरेखित केलेल्या असतात.
वर उल्लेखलेल्या सर्व बाबी परिचर्या प्रशासनासाठी (Administration) मार्गदर्शक तत्त्वे म्हणुन प्रत्येक व्यावसायिक परिचारिकेपर्यंत पोहोचविलेली असतात. गरजेनुसार सर्व मुद्दे वाचले व समजून घेतले का यासाठी प्रत्यक्ष सही घेऊन नोंद ठेवली जाते.
परिचर्या विभाग प्रशासनाची उद्दिष्टे :
- उत्कृष्ट प्रतीची सर्वंकष आरोग्यसेवा देणे ज्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला शारीरिक, मानसिक, सामाजिक व अध्यात्मिक आरोग्य वर्धनासाठी गरजेनुसार आरोग्यसेवा द्याव्यात.
- परिचारिका शुश्रुषा करतांना आजार्याची स्वावलंबनाची गरज पूर्ण करतात. शारीरिक शुश्रूषा करताना त्यांचे खाजगीपण (Privacy) सांभाळावे.
- आजाराविषयी समजुन घेण्यासाठी रोग्याची मानसिकता तयार करण्यास मदत करते.
- परिणामकारक व चांगली सेवा देतांना रुग्णाच्या गरजा, सेवा देण्याचे नियोजन, घरी गेल्यानंतरची काळजी, निरंतर सेवा इ. चा अंतर्भाव केला जातो.
- परिचर्या विभागात अशी वातावरण निर्मिती केली जाते की, ज्यामुळे सर्व कर्मचारी नितीमूल्यांचा विचार करून पेशंटची सेवा शुश्रूषा करतात.
- प्रत्येक परिचारिकेचे एक कर्मचारी म्हणुन स्वत:च्या कामाचे मूल्यमापन करून विभागाची सेवा देण्याची ठराविक मानके राखण्याचा प्रयत्न केला जातो.
- सर्व परिचर्या विभाग हॉस्पिटलने आखुन दिलेली तत्वे,उद्दिष्टे व हेतू याच्याशी समन्वय ठेऊन सेवा पुरवितात.
- परिचारिका डॉक्टरांनी आखून दिलेल्या औषधोपचारानुसार रुग्णाची शुश्रूषा करतात.
- निरंतर वैद्यकीय व परिचर्या शिक्षण पुरविणे हे एक महत्त्वाचे उद्दिष्ट असते.
- नवनवीन संशोधन करून अद्ययावत परिचर्या प्रशिक्षणाचा सेवा शुश्रूषेत समावेश करणे ही काळाची गरज समजून त्यादृष्टीने संशोधन करणे.
- आरोग्य सेवा देतांना इतर आरोग्य संस्थांना सहभागी करून सामाजिक कल्याण योजना राबविण्यात मदत करणे. उदा. धर्मादाय, समाज कल्याण, ज्योतिबा फुले योजना इ.
- पुरविण्यात आलेल्या परिचर्या सेवांचे मूल्यमापन करून फेरनियोजन करून सेवा द्याव्यात.
परिचर्या प्रशासकाची कार्ये (Functions of Nursing Administrator) :
- प्रशासक म्हणुन आपण आपली जागा (Position) बळकट करून अधिकार प्राप्त करणे.
- परिचर्येतील यशस्वी नेतृत्व सांभाळणे व जबाबदारीची वाटणी करून काम पूर्णत्वास नेणे.
- रुग्ण विभागामध्ये पर्यवेक्षक म्हणुन निरीक्षण करणे तसेच परिसेविका व मुख्य परिचारिका यांच्याबरोबर आरोग्य सेवेसंदर्भात बैठका आयोजित करणे.
- गरजेप्रमाणे कर्मचाऱ्यांना समुपदेशन करणे व एकत्रित काम करण्यास प्रेरणा देणे.
- विभागातील परिचारिकांसाठी व्यावसायिक विकसनशील कार्यक्रम राबविणे.
- हॉस्पिटलच्या उच्चस्तरीय समिती सदस्य म्हणुन बैठकांना उपस्थित राहून अहवाल प्रस्तुत करणे.
- संस्थेचे प्रमुख उद्देश लक्षात घेऊन आपल्या कर्तव्याचे पालन करावे व निर्णय घ्यावेत.
- हॉस्पिटलने ठरविलेले उद्दिष्ट, वेळेचे बंधन व जबाबदारीची जाणीव ठेवावी.
- सहकार्याची वागणूक व भावना बाळगणे. सहकारी व हाताखालील कर्मचाऱ्यांवर चिडणे टाळावे. नवनवीन कल्पनांचा विरोध करू नये. बदल स्विकारावा, इतरांचे मत लक्षात घेऊन कामे पूर्ण करावीत.
- व्यावसायिक वर्तणूक सेवा देतांना इष्ट व खरी असणारी बाजू लक्षात घेऊन निर्णय घ्यावा. कोणावरही अन्याय होणार नाही याची काळजी घ्यावी.
- प्रशासकीय परिचर्येतील सर्व नोंदी अद्ययावत ठेवाव्यात.
सारांश : दिवसेंदिवस वैद्यकीय सेवा व शल्य चिकित्सा यात होत असलेल्या नवनवीन संशोधनातून होणारी प्रगती व आरोग्य सेवेसाठी लागणारी कौशल्ये व ज्ञान यांच्या अद्ययावतीकरणासाठी परिचर्या प्रशासन व व्यवस्थापन यातील अद्ययावतीकरण गरजेचे आहे. यात परिचर्या प्रशासक (Nurse Administrator) यांचा वाटा महत्त्वाचा असतो.
संदर्भ :
- एम. सुमिथा, मॅनेजमेंट ऑफ नर्सिंग सर्व्हिस ॲण्ड एज्युकेशन , २०१५.
- बी. टी. बसवन्नथापा, नर्सिंग ॲडमिनीस्ट्रेशन, २००९
- विरभद्रा, जी. एम. नर्सिंग सर्व्हिस ॲडमिनीस्ट्रेशन .