परिचर्या व्यवस्थापनात व आरोग्य सेवेत मानवी सबंध आणि परस्पर सबंध हे महत्त्वाचे घटक असतात. मानवी संबध ही एक सामाजिक प्रक्रिया आहे. मानवामध्ये जन्मजात इतर मानव जातीसाठी दयेच्या, सहानभूतीच्या व कोमल भावभावना असतात. परिचर्येची तात्विक बैठक ही व्यक्ती, कुटुंब आणि समाज या सभोवती फिरत असते. ज्यामध्ये प्रत्येक ठिकाणी मानवी संबंध व परस्पर संबंध हे मूलभूत घटक ठरतात. सतत वास्तव आणि वातावरणाशी होणारी परस्पर क्रिया व प्रक्रिया म्हणजेच मानवी संबंध. या वातावरणातील व्यक्ती व समुहाचे मानवी संबंध हे अधोरेखित केल्याने आयुष्यात जिवंतपणा येतो. मानवी संबंध राखणे ही एक कला असून तिचा वापर समजून – उमजून करणे गरजेचे असते.

मानवी संबंधातील विस्तार-कंगोरे

मानवी संबंध संकल्पना : आरोग्य सेवा पुरविताना परिचारिका आकृतीत दाखविलेले सर्व मानवी कंगोरे ध्यानात ठेवतात .

  • मानवी संबंध हे लोकांशी संलग्न असतात. तद्वतच ते रुग्ण, त्याचे नातेवाईक आणि परिचारिका यांचेशी सुद्धा संलग्न असतात.
  • रुग्णालय व्यवस्थापनेत मानवी संबंध थेट रुग्ण शुश्रूषा व ती पुरविणारा संपूर्ण गट यांच्याशी जोडला जातो.
  • रुग्णालयाच्या व्यवस्थापनेत मानवी संबंध साखळी आवश्यक असते. त्यामध्ये लोकांचा सहभाग राबविण्याची प्रक्रिया रुग्ण सेवेचा एक अविभाज्य भाग असतो.
  • आरोग्य सेवा पुरविताना परिचारिका रुग्णालय व गटातील इतर सदस्य ( डॉक्टर, परिचारिका, तंत्रज्ञ, आयाबाई , वार्ड बॉय इ.) यांच्या सोबत अनुबंध निर्माण करतात.
  • प्रत्येक परिचारिका आपल्या रुग्णाची सुश्रुषा करतांना रुग्णालय, त्यांचे नियम, व सभोवतीचा समाज यातील परस्पर सम्बन्ध जपून रुग्णाला संपूर्णपणे बरा करण्याचा प्रयत्न करते .

मानवी संबंध राखण्यासाठी उद्दिष्टे : 

.क्र.  रुग्णालय किवा संस्थेची उद्दिष्टे .क्र. आरोग्य सेवा पुरविणारे कर्मचारी, परिचारिका यांची उद्दिष्टे
अस्तित्व टिकविणे, सकारात्मक व उन्नत आरोग्य सेवा पुरविणे योग्य तो पगार व हवे तसे काम केल्याचे समाधान मिळविणे
आरोग्य सेवेत वाढ, विस्तार करून समृद्धी वाढविणे सेवा पुरविण्यासाठी आवश्यक ती साधने उपलब्ध असणे व वातावरण निर्माण करणे.
प्रशिक्षण देऊन कौशल्य निपुण आरोग्य कर्मचारी तयार करणे आणि आजारातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढविणे . आरोग्य कर्मचारी सदस्यांमध्ये (Health Team Members) सुसंवाद व परस्पर अनुबंध तयार करणे .
गुणवत्तापूर्वक रुग्ण सेवा देण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना कार्यालयीन आणि निरंतर प्रशिक्षण देण्याची सोय करणे.  स्वयंप्रेरणेतून निरंतर प्रशिक्षण घेऊन गुणवत्तापूर्वक रुग्ण सेवा देण्यासाठी तत्पर असणे

मानवी संबंध जपण्यासाठी संधी :  रुग्णालयातील विविध विभाग आणि विविध स्तरावरती परिचारिका म्हणून काम करताना, तसेच व्यवस्थापक, नेता किंवा परिचर्या संशोधक  म्हणून काम करताना देखील मानवी संबंध जपण्याच्या संधी प्राप्त होतात.

मानवी संबंध आणि वर्तणूक :

  • आरोग्य सेवा देणाऱ्या चमूमधील वार्तालाप व परस्परांशी वागणे समजुतीचे असणे गरजेचे असते.
  • मानवी संबंध सामाजिक बदलासाठी उपयुक्त असतात म्हणून ते जपणे गरजेचे असते.
  • व्यक्ती ही एकटी असतांना वेगळी व इतरांबरोबर असतांना वेगळ्या पद्धतीने वागते. याचमुळे पर्यवेक्षक (supervisor) असतांना कर्मचारी वेगळे वागतात.
  • सहकार्यामुळे मानवी सबंध व वागण्याचा पद्धती सुधारतात.
  • प्रत्येक व्यक्ती ही एक स्वतंत्र व्यक्तिमत्व असून ते स्वत: स्वावलंबी असतात.

 आरोग्य सेवा व्यवस्थापन आणि मानवी संबंध :

  • रुग्ण किंवा त्याचे नातेवाईक यांचेशी बोलतांना त्या व्यक्तीच्या शारीरिक, मानसिक व सामाजिक बाबींचा विचार करावा.
  • रुग्ण किंवा त्याचे नातेवाईक यांचेकडे बघण्याचा दृष्टीकोण : रुग्णाला सेवा देणाऱ्या व्यक्ती या त्यांच्या क्षेत्रातील ज्ञानी असतात. त्या रुग्णाचे स्वातंत्र्य ओळखून त्याला गुणवत्तापूर्वक सेवा देताना मानवी संबंध जपतात. त्यामूळे अपेक्षित परिणाम दिसून येतात.

मानवी संबंध व परस्पर संबंध याबाबत महत्त्वाच्या संज्ञा आणि परिचर्या :

  • मूल्याधारित वर्तणूक प्रणाली (Value System ) : लोकांच्या वागण्यातील काही पद्धती ज्या त्यांच्या वर्तणूक प्रणालीनुसार त्यांच्या सवयी बनतात, त्या ठराविक वागण्यातील सवयी त्यांच्या आजारपणात देखील तशाच राहतात त्याचा परिचर्या देताना विचार करावा लागतो .
  • आकलन शक्ती (Perception ) : प्रत्येक व्यक्तीची आकलन क्षमता ही त्याच्या सत्य-असत्य विषयीच्या कल्पना व मानवी संबंध यांच्याशी निगडीत असते. रुग्णांची मानसिकता व शारीरिक बदल ह्या बाबत परिचारिकेची आकलन क्षमता रुग्णाचे आजार समजवून घेण्यासाठी मदत करते ज्यायोगे रुग्ण–परिचारिका–त्यांचे नातेवाईक यामधील संबंध दोन स्तरावर जपले जातात. उदा., (१) रुग्णातील  संवेदनशीलता  (२) वास्तवतावादी संबंध.
  • वागण्याची साचेबद्ध पद्धत (Steriotype) : परिचारिका स्वतः किंवा पर्यवेक्षक (Nursing Suprvisor) हे परस्पर वागण्यातील साचेबद्धता लक्षात घेऊन रुग्णविभागातील कर्मचारी व रुग्ण यांचेशी संबंध दृढ करतात.
  • दृष्टीकोन (Attitude) : प्रत्येक व्यक्तीचा एखाद्या वस्तूकडे, कामाकडे आणि दुसऱ्याकडे बघण्याचा दृष्टीकोन वेग वेगळा असू शकतो. ही बाब रुग्णाच्या बाबतीत देखील लागू पडते. म्हणून परिचारिकांसाठी त्यांचा त्याच्या आजाराकडे बघण्याचा दृष्टीकोन समजवून घेण्यास सोपे जाते.
  • व्यक्तिमत्त्व (Personality) : सर्वसाधारपणे व्यक्तिमत्त्व हे प्रत्येक व्यक्तीची गुणवैशिष्टे व धारणा यावरून ठरते व त्याचा त्या व्यक्तीच्या आजारपणातून बरे होण्यावर परिणाम होत असतो. व्यक्तिमत्त्व हे अनुवंशिकता, सामाजिक स्तर व कौटुंबिक संबंध यावर अवलंबून असते. या सर्व बाबींचा परिचारिकेला रुग्णाला सेवा देताना उपयोग होतो.
  • समूह (Group) : समूह म्हणजे दोन किंवा अधिक व्यक्ती, ज्या एकमेकात संवाद साधतात व परस्परावलंबी असून त्यांची ध्येय एकच असतात. परिचर्येत गटातील सदस्यांसमवेत संवाद साधून परिचारिका आरोग्य शिक्षण व समुपदेशन करू शकतात.

  मानवी संबंध व परिचारिकेसाठी अलिखित जबाबदाऱ्या :

अ.क्र. वर्तणूक  जबाबदाऱ्या
बोलणे कमी  अधिक ऐकावे
घ्यावे  द्यावे
अडचणी असल्यास  त्यावर मार्ग शोधणे
आराम दायी असणे  दुसऱ्यांना आरामदायी ठेवावे
कार्यरत असावे  चांगले कार्य करवे
चुका झाल्यास  चुकीची दुरुस्ती करावी
हसत मुख असावे  दुसऱ्यांना आनंदी करावे
मित्र मैत्रिणी असाव्यात  दुसऱ्यांना मित्र करावे
टीका करता यावी  कौतुक करता यावे
१० कामाचे बक्षीस मिळाल्यास  दुसऱ्यांना बक्षीस द्यावे
११ स्वावलंबी असावे  अवलंबून राहता यावे
१२ स्वत:स रडू आले तरी  दुसऱ्यांचे आसू पुसावेत
१३ स्वत:वर प्रेम असावे  दुसऱ्यावर प्रेम करावे

 

संदर्भ :

  • Crow, Lester D; Crow, Alice, Human relations in practical nursing.
  • Hayes, Wayland J., Human Relation in Nursing, 1964.
  • Patel, Khushbu, Human Relation.