ईजिप्तमधील सर्वांत प्राचीन देवतांपैकी एक. नाईल नदीचा रक्षकदेवता. त्याचा काळ साधारणतः इ.स.पू. २९२५‒२७७५ असा सांगितला जातो. त्याला नाईल नदीचा स्रोत; तसेच जल, उत्पत्ती, प्रजनन आणि सुपीकता यांच्याशी संबंधित असलेला देव म्हणून मानले जात असे. ख्नेमू या नावानेही तो परिचित आहे.
आडवी नागमोडी शिंगे असलेला मेंढा, पुरुषाच्या शरीरावर मेंढ्याचे एक किंवा चार मस्तके किंवा मगरीचे मस्तक असे ह्या देवाचे मूर्त स्वरूप होते. कुंभकाराच्या चाकामागे बसलेला, हातात चंबू असलेला व त्यातून जलधारा (नाईल नदीचे जल) पडत असलेला ख्नूम अशीही ह्या देवाची प्रतिमा काही ठिकाणी आढळते. मेंढ्याची चार मस्तके म्हणजे पृथ्वी, अग्नी, वायू आणि जल ह्यांचे एकत्रीकरण किंवा ओसायरिस, रा, शू आणि गेब ह्या चार देवतांच्या प्राणशक्तीचा (का–Ka) संयोग दर्शवितात, असे मानले जाते. ख्नूमचे हे स्वरूप ‘महा आदिशक्ती’ (The Great Primeval Force) म्हणून ओळखले जाई.
ख्नूम शब्दाचा मूळ ईजिप्शियन अर्थ जोडणे किंवा निर्माण करणे असा आहे. कुंभकाराप्रमाणे हा देव चाकांवर नाईल नदीच्या तीरावरील सुपीक मातीची विविध आकारांची लहान मानवी शरीरे बनवून मातेच्या उदरात त्यांची स्थापना करत असे. अशाप्रकारे संपूर्ण मानव जातच नाही, तर संपूर्ण विश्व, देवदेवता आणि निर्मितीच्या वेळचे पहिले अंडे ज्यातून सूर्यदेवता रा निर्माण झाला, तोदेखील ख्नूमनेच निर्माण केले, असे मानले जाई. म्हणून त्याला दैवी कुंभकार म्हटले गेले आहे.
ख्नूम देवाचा पंथ सर्वप्रथम मध्य ईजिप्तमध्ये अल्-अशमुन्यान (Al-Ashmunyan) जवळील हर्वर येथे उदयाला आला. एलिफंटाईन आणि दक्षिण थीब्झमधील एसना ह्या ठिकाणी त्याचे मुख्य पंथ होते व ही दोन्ही ठिकाणे पवित्र मानली जात असत. इ.स.पू. १५३९‒१०७५ काळात तो एलिफंटाईन द्वीपाचा देव म्हणून प्रसिद्ध झाला. येथील मंदिरात तो, त्याची पत्नी सॅटीस आणि मुलगी एन्युबिस ही देवतात्रयी पूजली जात असे.
एसना येथील मंदिरात ख्नूम, नीथ आणि हेका ही देवतात्रयी आढळते. हेका हा ख्नूमचा पुत्र आणि उत्तराधिकारी असून ख्नूम आणि नीथ ह्या दोन्ही निर्मिती व सृजनाशी संबंधित देवता असल्याचा उल्लेख येथील लेखांमध्ये आहे. ख्नूमला पित्यांचा पिता (Father of the Fathers) आणि नीथला मातांची माता (Mother of the Mothers) म्हटले आहे. हेगेट देवता ख्नूमने निर्माण केलेल्या आकारांमध्ये प्राणांची स्थापना करत असे, म्हणून काही ठिकाणी हेगेटलादेखील ख्नूमची पत्नी मानले जात असे.
थोथ (टोट) देवतेच्या मार्गदर्शनाखाली ख्नूमने प्ताहसोबत हे लौकिक विश्व निर्माण केले, असाही एक समज आढळतो. ह्या शिल्पकार ख्नूमची सात रूपे मानली गेली आहेत, ती अशी : १. निर्माता, २. दोन भूमींचा नियंत्रक, ३. प्रकाशाचा विणकर, ४. प्राणगृहाचा नियंत्रक, ५. प्राणभूमीचा ईश्वर, ६. सुखी प्राणगृहाचा नियंत्रक, ७. प्रभू/परमेश्वर.
संदर्भ :
समीक्षक : शकुंतला गावडे