प्राचीन ईजिप्शियन स्त्रीदेवता. ती मस्तकावर दक्षिण ईजिप्तचा लाल मुकुट धारण केलेली, हातात ढाल आणि बाण घेतलेली एक स्त्रीदेवता असून तिला प्राचीन ग्रीक लोक अथेनानामक देवता मानत असत.
नीथ ही प्रादेशिक कलेची, युद्धाची, निर्मितीची, मातृदेवता आणि मृताच्या उत्तरक्रियेशी संबंधित आहे. तिने जन्माचा म्हणजेच विणण्याच्या कलेचा शोध लावला. संपूर्ण जग तिने विणले अशी समजुत आहे. जीवंत तसेच वाढणाऱ्या गोष्टींशीही तिचा संबंध लावला जात असे. इ.स.पू. ६६४–५२५ या कालावधीत साएस (Sais) ह्या ईजिप्तच्या राजधानीची नीथ आश्रयदाती मानली जात असून तिचा मुख्य पंथ साएस प्रांतात होता.
नीथ, तिचा सहचर सेथ आणि त्यांचा पुत्र मगरदेवता सोबेक ही महत्त्वाची त्रयी मानली जात असे. मातृदेवता असल्याने काही ठिकाणी ‘महान गाय’ (The Great Cow), देवतांची आजी, देवतांची माता असाही तिचा उल्लेख आढळतो. एका आख्यायिकेनुसार देवतांच्या वादविवादात नीथ देवता मध्यस्थी करत असे. ईजिप्तवर होरस राज्य करणार की सेथ ह्या वादात जेव्हा इतर देवता न्यायसभेत निर्णय घेऊ शकल्या नाहीत, तेव्हा तिने न्यायनिवाडा करून तो वाद मिटविला. युद्धदेवता म्हणून तिला धनुष्याची राणी (Mistress Of Bow) असेही म्हटले जाते. काही ठिकाणी निर्मितीची देवता म्हणून तिला विश्वनिर्मितीच्या अगोदर अस्तित्वात असलेल्या वैश्विक जलाशी (ननशी) संबंधित म्हटले आहे.
नीथ देवता मृताच्या उत्तरक्रियेशी संबंधित मानली जायची. मृताचे ममीकरण केलेले शरीर पुरायच्या आधी नीथ त्या शरीराचे रक्षण करते, असा प्राचीन ईजिप्शियनांचा समज होता. तुतांखामेनच्या थडग्यात इसिस, नेफ्थिस आणि विंचू देवता सेरकेट या उत्तरक्रियेशी संबंधित देवतांबरोबर नीथ देवतेचाही पुतळा आहे.
वरील प्रत्येक देवता होरसच्या चार पुत्रांपैकी एकाची संरक्षकदेवता होती. त्यांपैकी मृताच्या पोटाचे आणि आतड्यांची रक्षा करणाऱ्या होरसच्या दुआमूटेफ ह्या पुत्राची नीथ देवता संरक्षक होती.
संदर्भ :
- Oakes, Lorna; Gahlin, Lucia, Ancient Egypt, Pennsylvania, 2007.
- Willis, Roy, World Mythology : The Illustrated Guide, London, 1993.
- https://www.ancient.eu/article/885/egyptian-gods—the-complete-list/
समीक्षक : शकुंतला गावडे