माल्कम आदिशेषय्या (Malcom Adiseshiah) : (१८ एप्रिल १९१० – २१ नोव्हेंबर १९९४). प्रसिद्ध भारतीय अर्थतज्ज्ञ व पद्मभूषण पुरस्काराचे मानकरी. विकासाचे अर्थशास्त्र ही आजच्या काळातील महत्त्वपूर्ण संकल्पना मांडण्याची अतिशय महत्त्वपूर्ण कामगिरी त्यांनी केली. त्यांचा जन्म तमिळनाडू राज्यातील वेल्लोरे येथे सुशिक्षित कुंटुंबात झाला. त्यांचे वडिल पॉल हे व्हूरीस कॉलेज, वेल्लोरे येथे तत्त्वज्ञान विषयाचे प्राध्यापक होते आणि तेथेच पहिले भारतीय प्राचार्य पदाचा मान मिळविला; तर आई या संगीतकार व वेल्लोरे नगरपालिकेच्या पहिल्या महिला नगरसेविका होत्या. माल्कम यांचे माध्यमिकपर्यंतचे शिक्षण व्हूरीस विद्यालयात झाले, तर मद्रास येथील लोयोला कॉलेजमधून त्यांनी पदवी मिळविली. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी ते केंब्रिज विद्यापीठ व लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अशा अत्यंत ख्यातनाम ठिकाणी गेले. ‘पैशाची गतिशीलता’ या विषयावर आपले संशोधन लिहून त्यांनी डॉक्टरेट ही पदवी मिळविली. त्यांना प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ जॉन मेनार्ड केन्स यांच्या प्रत्यक्ष भेटीचाही योग आला होता.

भारतामध्ये सर्वप्रथम केन्स यांचे विचार शिकविण्याचा बहुमान माल्कम यांच्याकडे जातो. कलकत्त्याच्या सेंट पॉल कॉलेजमध्ये व्याख्याते म्हणून त्यांनी अनुभव घेतला. ‘काय शिकवायचे’ हा मूलभूत प्रश्न त्यांना कारकिर्दीच्या सुरुवातीलाच पडला होता. नेहमीच्या तासांशिवाय परिसंवाद घेण्याचा पायंडाही त्यांनी पाडला. सिद्धांत शिकविण्याबरोबरच व्यावहारिक ज्ञान व उपयोजन विद्यार्थ्यांना मिळावे, ही त्यांची तळमळ होती. रशियात लेनिनने राबविलेल्या साक्षरता प्रसार मोहिमेने प्रभावित होऊन भारतानेही साक्षरता प्रसाराकडे पुरेसे लक्ष द्यावे, अशी त्यांची तळमळीची इच्छा होती. युनेस्को या संस्थेतील त्यांची इ. स. १९४६ – १९७० अशी प्रदीर्घ कारकीर्द अनेक महत्त्वाच्या पदांवर पार पडली. युनेस्कोमार्फत भारतात विज्ञान-तंत्रज्ञान शिक्षण विकासाच्या अनेक योजना त्यांनी राबविल्या. त्यांना तत्त्वज्ञान व प्राचीन साहित्य या विषयांतही रुची होती. अभ्यासातील व कामातील शिस्त हे त्यांचे वैशिष्ट्य होते. १९७१ – १९७६ या काळात ते मद्रास विद्यापीठाचे कुलगुरू होते. अर्थशास्त्रातील अर्थमिती (इकॉनॉमॅट्रिक्स) ही गणिततंत्राधारित अभ्यासशाखा त्यांनी सुरू केली. तसेच शिक्षण, प्रौढ शिक्षण, सामरिक शिक्षणशास्त्र, विभागीय अभ्यास अशा नव्या विभागांचीही त्यांनी स्थापना केली. सत्रपद्धत अंमलात आणून अनेक उजळणी वर्ग, अभ्यासवर्गांची आखणी केली व समाजसेवा योजना लागू केली. एकूण सामाजिकशास्त्र, शिक्षणाचा दर्जा, रचना, दिशा, पद्धती व अंतर्भूत घटक उच्च प्रकारचे असावेत यासाठी ते अखेरपर्यंत कार्यरत राहिले. निवृत्तीनंतर भारतात परतून त्यांनी अड्यार येथील आपल्या मालकीची जागा ट्रस्टसाठी दान केली. बुलेटिन नावाचे एक नियतकालिक सुरू करून अत्यंत निष्ठेने चालविले.

माल्कम हे प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ सी. डी. देशमुख यांनी स्थापन केलेल्या ‘इंडिया इंटरनॅशनल सेंटर‘ या संस्थेशी निगडीत होते. तेथे त्यांनी आर्थिक घडामोडींची चर्चा करण्यासाठी ‘इकॉनॉमिक अफेअर्स ग्रुप’ स्थापन केला. याचे कार्य इतके महत्त्वाचे ठरले की, शासकीय धोरण आखताना त्यांचे मत विचारात घेतले जाई. माल्कम यांनी शैक्षणिक क्षेत्रातील माहिती, आकडेवारींचे संकलन व विश्लेषण अशा वैचारिक प्रकारचे प्रचंड लिखाण केले. तमिळनाडूच्या आर्थिक धोरणाचे परखड परीक्षण ते दरवषी प्रसिद्ध करित असत. त्यांच्या मताची विचारवंतांच्या जगात प्रतीक्षा केली जाई. एक्सपेरिमेंटल इकॉनॉमिक्स या अर्थशास्त्राच्या उपयोजित शाखेत त्यांनी महत्त्वपूर्ण भर घातली आहे.

आपल्या वर्षानुवर्षांच्या अर्थशास्त्राच्या अध्यापन व अध्ययनातून अर्थशास्त्राचा पद्धतशीर अभ्यास कसा करावा, याचे एक वस्तुनिष्ठ प्रारूप त्यांनी तयार केले. त्यांच्या मते, ‘पहिल्या टप्प्यात अर्थशात्रातील एखाद्या विषयाचे अनेक लहान भागात विभाजन करून नमुना उदाहरणे अभ्यासावीत. दुसऱ्या टप्प्यात इतर ठिकाणी झालेला अभ्यास, उदाहरणे, सैद्धांतिक तत्त्वे अभ्यासणे योग्य ठरेल. तिसरा टप्प्या हा अतिशय कठीण असून त्यामध्ये सैद्धांतिक चौकटी व संकल्पनांच्या माध्यमातून आपल्या अर्थव्यवस्थेला अनुकूल होऊ शकतील अशी तत्त्वे निवडावी आणि त्यानुसार धोरणे आखून अंमलबजावणी करावी’. अर्थशास्त्राच्या अभ्यासाचा शेवटचा टप्पा म्हणजे आजवर विकसित झालेल्या आर्थिक विचारांचा इतिहास अभ्यासणे होय. हिस्टोरी ऑफ इकॉनॉमिक ही शाखा विविध शाखांमध्ये मुकुटमणी आहे, असे ते म्हणत.

माल्कम यांनी मुख्य योगदान दिलेल्या क्षेत्रांपैकी एक महत्त्वाचे क्षेत्र म्हणजे त्या काळात तुलनेने नवे असलेले पर्यावरणीय अर्थशास्त्र ही अभ्यासशाखा होय. मुख्य प्रवाहातील अर्थशास्त्राच्या पर्यावरणाकडे दुर्लक्ष केले गेले आहे. अर्थशास्त्रासारख्या सामाजिक शास्त्राचे निसर्गाशी काही देणे-घेणे नाही, असा अपसमज बळावत गेला. अर्थातच, हे अतिशय चुकीचे विचार होते आणि त्याची बरीच मोठी किंमत आर्थिक विकासाच्या धोरणात वसूल झाली, असे त्यांचे मत होते. हवा, पाणी असे नैसर्गिक घटक विनामूल्य उपलब्ध आहेत असे भासत असल्याने त्यांचे निश्चित मूल्य ठरविणे कठीण असते. त्यासाठी नेहमीच्या पद्धतीऐवजी छाया मूल्य (शाडो प्रायसिंग) ही पद्धत वापरली पाहिजे. नकारात्मक पर्यावरणीय बाह्यतः (निगेटिव्ह इन्व्हायर्न्मेंटल एक्स्टर्नॅलिटिज) मोजण्याचे योग्य माध्यम अर्थशास्त्राजवळ नाही; मात्र पर्यावरणहानीसाठी जे जबाबदार असतील त्यांनी त्याची भरपाई करावी. हे जगमान्य तत्त्व भारतासारख्या देशात लागू करणे कठीण आहे; कारण उदरनिर्वाहासाठी गरिबांना निसर्गावर अवलंबून राहावे लागते, असे मूलगामी स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.

माल्कम यांचा पर्यावरण घटकांचा अभ्यास करण्यासाठी मार्गदर्शक ठरू शकतील अशा सर्वेक्षण व माहिती संकलन या पद्धतींवर भर होता. लोकसंख्या, जमिनीची धूप, मासे, जंगले, प्रदूषण, इंधनऊर्जा, आरोग्य, शहरीकरण व सामाजिक परिस्थिती अशा विविध घटकांच्या माहितीद्वारे विकासाचा रोख लक्षात घेऊन धोरणे आखण्याची त्यांची सूचना होती. एखाद्या विकास प्रकल्पाचा संपूर्ण दूरगामी परिणाम व त्यातून मिळणारा अंतिम लाभ अशा सर्वांगीण दृष्टिकोनातून चिरंतन विकासाचा मार्ग स्वीकारला पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले. खर्च-लाभ विश्लेषणात पर्यावरणीय परिणामांचे मूल्यमापन (इन्व्हायर्नमेंटल इम्पॅक्ट असेस्मेंट) हा आज अत्यंत महत्त्वपूर्ण असलेला पैलू त्यांनीच सर्वप्रथम विचारात घेतला होता. भारताचा विकासमार्ग पर्यावरणाला मारक आहे. चिरंतन विकासासाठी आवश्यक असणारा खर्च देशातील सर्व नागरीकांनी उचललाच पाहिजे, हे स्पष्ट करताना श्रीमंतांनी कर भरून, तर गरिबांनी आपल्या राहणीमानात बदल करून (सुधारून) पर्यावरणहानीचा भार उचलावा असे त्यांनी सुचविले. अन्नधान्य उत्पादन वाढीचा विचार केला जातो; मात्र हे वाढलेले उत्पादन गरिबांपर्यंत कसे पोचेल आणि इतके उत्पादन करण्यासाठी पर्यावरणावर काय परिणाम होतील याचा विचार धोरणकर्ते किंवा विचारवंत करत नाहीत. वृद्धीचे भविष्यातील परिणाम दुर्लक्षिले जातात, ही त्यांची खंत होती. त्यांनी आपल्या अभ्यास व विचारांतून देशाचा आर्थिक विकास आणि पर्यावरण यांची सांगड घालण्याचे मूलभूत कार्य केले आहे.

भारतीय अर्थव्यवस्थेच्या अनेकांगी अभ्यासातून माल्कम यांनी बेकारी, भाववाढ नियंत्रण, गरिबी, विविध राज्यांची अर्थव्यवस्था, नियोजन, शेती अशा अनेक घटकांचे अतिशय परखड आणि मुलभूत विचार मांडले आहेत. संरचनात्मक बदल करताना शेती, उद्योग आणि व्यापार या तिन्ही क्षेत्रांचा समन्वय साधला गेला पाहिजे, अशी त्यांची सूचना होती. नव्याने येऊ घातलेले जागतिकीकरण आणि नव्या आर्थिक धोरणांचे आव्हान त्यांनी लक्षात घेतले होते.

माल्कम यांना त्यांच्या अतुलनीय कार्यासाठी अनेक मानसन्मान लाभले असून १९७६ मध्ये भारत सरकारचा पद्मभूषण हा मानाचा सन्मान त्यांना देण्यात आला. त्याचबरोबर त्यांच्या नावाने आज अनेक देश-विदेशांतील संस्थांकडून पुरस्कार दिले जातात. त्यामध्ये साक्षरतेच्या लढाईत उत्कृष्ट कार्य बाजावून उल्लेखनीय गुणवत्ता आणि प्रभावी परिणाम मिळविणाऱ्या युनेस्कोच्या सदस्य राष्ट्रांतील संस्थांना युनेस्कोद्वारे १९९८ पासून माल्कम आदिशेशय्या आंतरराष्ट्रीय साक्षरता पुरस्कार दिला जातो. तसेच चेन्नई येथील अनेक शैक्षणिक संस्थांकडून अंतिम वर्षातील इतिहास, रसायनशास्त्र, इंग्रजी इत्यादी विषयांमध्ये प्राविण्य मिळविणाऱ्या सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्यांस माल्कम आदिशेशय्या पुरस्कार दिला जातो. तमिळनाडू राज्य सरकारकडूनही विवध क्षेत्रांतून त्यांच्या नावेने पुरस्कार दिला जातो.

माल्कम यांनी स्वत: व सहलेखक म्हणून अनेक ग्रंथांचे लेखन केले आहेत. लेट माय कंट्री अवेक (१९७०); इट इज टाईम टू बिगीन (१९७२); हायर एज्युकेशन अँड दी न्यू इंटरनॅशनल ऑर्डर (१९८२); मीड-इयर रिव्ह्यू ऑफ दी इंडियन इकॉनॉमी, १९८६-८७ टू १९९०-९१; एट्थ प्लॅन पर्स्पेक्टिव्ह्ज (१९८९); सस्टेनेबल डेव्हलपमेंट्स (१९९०); इकॉनॉमी, सोसायटी अँड डेव्हलपमेंट (१९९१); डिसेंट्रलाइज्ड प्लॅनिंग अँड पंचायती राज (१९९४) इत्यादी.

संदर्भ :

  • Das, Debendra Kumar, Great Indian Economists – Their Creative Vision for Socio-Economic Development, Vol. 8, New Delhi, 2004.
  • Dutt, Bhabatosh, Indian Economic Thought – 20th century Perspective 1900-1950, New Delhi, 1978.
  • Ganguli, B. N., Indian Economic Thought, New Delhi, 1977.
  • Musmade, Manjusha, Magova Arthavicharancha, Junnar (Pune), 2013.

 

समीक्षक : श्रीनिवास खांदेवाले