विशाल हरयाणा पार्टी : १ नोव्हेंबर १९६६ रोजी पंजाब राज्याची पंजाब आणि हरयाणा अशी दोन स्वतंत्र राज्यांत विभागणी झाली. त्यानंतर हरयाणा विधानसभेच्या ११ सभासदांनी आपल्या विविध मागण्यांकरिता १ मार्च १९६७ रोजी नवीन हरयाणा पक्ष काढण्याची घोषणा केली. त्यांच्या मागण्या पुढीलप्रमाणे होत्या : हरयाणाकरिता स्वतंत्र उच्च न्यायालय, स्वतंत्र लोकसेवा आयोग आणि चंदीगढ शहरावर हक्क. आपल्या मागण्या अधिक तीव्र करण्यासाठी आणि हरयाणातील जनतेचा पूर्ण पाठिंबा मिळविण्यासाठी २२ ऑक्टोबर १९६७ रोजी नवी दिल्ली येथे भरविलेल्या प्रचंड मेळाव्यात विशाल हरयाणा पक्षाची स्थापना करण्यात आली. हरयाणाचे भूतपूर्व संयुक्त दलाचे मुख्यमंत्री राव विरेन्द्र सिंग पक्षाचे प्रमुख बनले. विशाल हरयाणा प्रांत अस्तित्वात आल्यानंतर पक्ष विसर्जित करावा असेही ठरले. मुख्यतः राव विरेन्द्र सिंग व देवीलाल या दोन काँग्रेस नेत्यांच्या संघर्षातून जुलै १९६७ मध्ये मुख्यमंत्री राव विरेन्द्र सिंग मंत्रिमंडळातून बाहेर पडले आणि आपल्या २९ अनुयायी आमदारांसह त्यांनी हा पक्ष स्थापन केला.१९७१ च्या निवडणुकीत या पक्षाला केवळ ३ जागा मिळाल्या पण १९७७ च्या निवडणुकीत त्यांना ५ जागा मिळाल्या आणि १९८० च्या निवडणुकीत पक्ष काँग्रेसमध्ये सामील झाला.

संदर्भ :

  • Zaidi, M. A. (Edi.), The Annual Register of Indian Political Parties, 2 Vols, New Delhi, 1973-1974.