मिझो युनियन : मिझोरम राज्यातील पहिला राजकीय पक्ष. १९४६ ते १९७४ हा या पक्षाचा प्रभावकाळ राहिला आहे. १९४६ साली मिझो या डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्‍या भारताच्या ईशान्य प्रांतातील लुशाई टोळयांची ‘मिझो युनियन’ या नावाने पक्षात्मक संघटना स्थापन झाली. बांगलादेश, ब्रम्हदेश यांच्या सीमा भागावर मिझो डोंगरी जिल्ह्यांचा प्रदेश आहे. लुशाई या ख्रिश्चन जमातीचा या भागावर विशेष प्रभाव आहे. त्यांनी संघटित केलेल्या या मिझो युनियनचे उद्दीष्ट आसाम, मणिपूर भागांतील आपल्या लोकांचे एकत्रीकरण करणे आणि स्वतंत्र राज्य स्थापन करणे हे होते. पछुंगा हे या पक्षाचे पहिले अध्यक्ष तर आर वनलाव्मा हे या पक्षाचे पहिले महासचिव होते. मिझो टोळयांवर परंपरावादी ‘लाला’ प्रमुखांचा पगडा आहे. प्रागतिक विचारसरणीच्या मिझो युनियनच्या नेत्यांनी १९५२ च्या निवडणुकीत लालांनी पुरस्कारिलेल्या द युनायटेड मिझो फ्रीडम ऑर्गनायझेशनचा पराभव केला. तसेच त्यांनी मिझो नॅशनल फ्रंटशीही सुरूवातीच्या काळात जोरदार टक्कर दिली. १८ जानेवारी १९६५ रोजी मिझो नॅशनल फ्रंटशीही युती करून स्वतंत्र मिझोरामची जोरदार मागणी केली. कालांतराने मिझो नॅशनल फ्रंटचा प्रभाव वाढला व मिझो युनियनचे अस्तित्व नगण्य होत गेले.

संदर्भ :

  • Bareh, H.M., Encyclopaedia of North-East India: Mizoram. New Delhi, 2007.