अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील मिसिसिपी नदीची एक उपनदी, तसेच उत्तर आणि मध्य इलिनॉय राज्यातील वाहतूकयोग्य मार्ग. ग्रुंडी परगण्यामधील देस्प्लेंझ नदी आणि कँककी नदी यांच्या संयुक्त प्रवाहापासून या नदीची निर्मिती झाली आहे. सर्वसाधारणपणे इलिनॉय नदी इलिनॉय राज्यातून पश्चिमेकडे वाहते; परंतु हेनपनच्या उत्तरेस ही नदी अचानक दक्षिणेकडे वळून नैर्ऋत्येस व दक्षिणेस सुमारे ४४० किमी.चा प्रवास करून ग्रॅफ्टन येथे मिसिसिपी नदीस मिळते. इलिनॉय नदीचे एकूण पाणलोट क्षेत्र ७५,००० चौ. किमी. असून तिचा प्रवाह अधूनमधून रुंद होतो आणि पिओरिआसारखी सरोवरे तिच्या पात्रात तयार होतात.
शिकागो आणि इलिनॉय या दोन नद्यांना जोडणारा, साधारण १६० किमी. लांबीचा इलिनॉय व मिशिगन कालवा इ. स. १८४८ साली बांधला गेला. इलिनॉय नदीला हा कालवा ला साल येथे जोडला आहे. या कालव्यामुळे शिकागो व इलिनॉय या नद्यांदरम्यानची, तसेच पंचमहासरोवरे आणि मेक्सिकोचे आखात यांच्यादरम्यानची जलवाहतूक सुकर झाली; परंतु इ. स. १९३३ साली शिकागो नदी, शिकागो सॅनिटरी, शिप कालवा, तसेच देस्प्लेंझ आणि इलिनॉय नदी यांना जोडणारा नवीन इलिनॉय जलमार्ग वाहतुकीस खुला करण्यात येऊन पूर्वीच्या इलिनॉय आणि मिशिगन कालव्याचा वापर बंद झाला. त्यामुळे इ. स. १९८४ साली या कालव्यास आणि कालव्यालगतच्या भागास अमेरिकन काँग्रेसने देशातील पहिला ‘राष्ट्रीय वारसा जलमार्ग’ म्हणून घोषित केला. सध्या या कालव्याचा वापर मनोरंजनासाठी केला जातो.
इलिनॉय नदीच्या काठावर वसलेल्या शहरांमध्ये मॉरस, ओटावा, ला साल, पेरू, पिओरिआ, पीकिन, हव्हॅना आणि बिअर्ड्झटाउन यांचा समावेश होतो. इलिनॉय नदीच्या उपनद्यांमध्ये देस्प्लेंझ आणि कँककी या नद्यांबरोबरच स्पून, सँगमन, फॉक्स, व्हर्मिल्यन, मॅकनॉ आणि लमॉन यांचा देखील समावेश होतो. इलिनॉय नदीकाठावर निर्माण केलेल्या राज्य उद्यानांमध्ये ओटावाजवळील स्टार्व्हड्रॉक, बफालो रॉक आणि इलिनी, तसेच मिसिसिपी नदीच्या संगमाजवळील पेरे मार्केट यांचा समावेश होतो.
पूर्वी इलिनॉय नदीस दरवर्षी मोठ्या प्रमाणावर पूर येत असे. त्यामुळे तिच्या खोऱ्यात १,६०,००० हेक्टर इतके विस्तृत पूरमैदान तयार झाले आहे. या संपूर्ण प्रदेशात समृद्ध वन्य जीवन आढळते; परंतु विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात पूरतट बांधनी आणि पंपाने पाणी बाहेर काढण्याच्या व्यवस्थेच्या साहाय्याने पूरनियंत्रण करण्यात यश मिळाले. त्यामुळे जवळजवळ अर्धे पूरमैदान, एका संपूर्ण सरोवरासह लागवडीखाली आणण्यात आले. इ. स. १९०० साली शिकागो नदीचा प्रवाह माघारी वळविण्यात आल्याने मोठ्या प्रमाणात प्रदूषण झाले; परंतु वरच्या टप्प्यात जलसंस्करणाच्या उपाययोजना केल्यामुळे पाण्याचे प्रदूषण कमी झाले. इलिनॉय राज्यात झेब्रा शिंपल्यांसारख्या अनेक आक्रमक प्रजातींचा प्रादुर्भाव झाला. वाळू उपसा आणि अरुंदीकरण केल्याने नदीचा वापर धान्य, कोळसा आणि खनिज तेल अशा अवजड वस्तूंच्या वाहतुकीसाठी केला जातो. इलिनॉय नदीतील परिसंस्था या पुनर्वसनयोग्य असणाऱ्या अमेरिकेतील काही दुर्मिळ नदी परिसंस्थांपैकी एक असल्याचे लक्षात येताच या नदीच्या काही भागांमध्ये पुनर्वसनाचे प्रयत्न सुरू करण्यात आले. या प्रयत्नांच्या सुरुवातीच्या यशामुळे काही स्थानिक प्रजाती पुन्हा दिसू लागल्या. तसेच नदीत आणि सरोवरात वास्तव्य करणाऱ्या जलपक्ष्यांची संख्यादेखील वाढू लागली; परंतु मिसिसिपी नदी प्रवाहाद्वारे इलिनॉय नदीत प्रवेशित झालेल्या ‘एशियन कार्प’ या गोड्या पाण्यातील माशांमुळे इलिनॉय नदीतील जलचरांस धोका उत्पन्न झाला आहे.
समीक्षक : वसंत चौधरी