विविध स्फोटशकली पदार्थांना एकत्रित आणण्याचे काम जेव्हा त्यांच्यातील उष्णतेमुळे वितळलेले कण, ज्वालामुखीय काच पदार्थ तसेच लाव्हारसाचे अंश करतात तेव्हा त्याला संधित खडक (Welded rock) म्हणतात. जोधपूर (राजस्थान) जिल्ह्यातील प्रसिद्ध अशा डोंगरी जोधपूर किल्ल्याच्या आसपास भूवैज्ञानिकीय राष्ट्रीय शिला स्मारक प्रकारातील संधित टफ हे अपक्षित मलानी ज्वालामुखीय (Weathered Malani Volcanics) घटकांमध्ये वेदिका स्वरूपात आढळतात. ज्वालामुखीय विस्फोटामध्ये बाहेर पडलेल्या विविध प्रकारच्या घनपदार्थांच्या प्रसर्जनातून (Emanations) दूरवर हवेतून वाहून नेलेल्या पदार्थांचे अधिगमन (Settling) झाल्यानंतर त्यांचे संधित टफ झाले आहेत. काच, क्वॉर्ट्झ आणि फेल्स्पार (Glass, Quartz and Felspar) घटकांपासून हे तयार झाले असून थंड होण्याच्या प्रक्रियेवेळी यांच्यात स्तंभीय संधी (Columnar Joint) निर्माण झाल्यामुळे स्तंभी आणि वेदिका संरचना (Columnar and Terrace Structure) झालेल्या आहेत.
मलानी ज्वालामुखीतून मुख्यतः पर अल्कलीय अधिसिलिक (Per alkalic acidic) प्रकारातील विविध रंगाचे (गुलाबी, मरून, तपकिरी, जांभळा, राखाडी आणि हिरवा) र्हायोलाइट (Rhyolite) खडक निर्माण झाले असून त्यांच्यातूनच टफ, संधित टफ आणि स्फोटशकली खडकांचे (Tuff, Welded tuff, Pyroclastic) प्रकार वेगळे झालेले आहेत. ह्या लाव्हाच्या थंड होण्याच्या त्या वेळच्या अनुकूल परिस्थितीमुळे चांगल्या तऱ्हेने तयार झालेल्या आयताकृती ते षट्कोनी आकारातील स्तंभीय संधींमुळे जवळपास ३० मी. (क्वचित ठिकाणी त्याहीपेक्षा जास्त) उंचीचे स्तंभ येथे पाहावयास मिळतात. ह्या खडकांच्या थरावरती गडद जांभळ्या रंगाच्या गुरुस्फटी र्हायोलाइट (Porphyritic Rhyolite) खडकांचे आच्छादन (Overlain) आहे. यांच्यातील स्फोटशकलींमध्ये लाव्हाचे घटक आढळत असल्याने ज्वालामुखी उद्रेकाच्या शेवटच्या टप्प्यातील हे प्रसर्जन असल्याचे अनुमान काढता येते. भारतीय उपखंडाच्या भूशास्त्रीय कालखंडात कँब्रियन पूर्व काळाची (Pre Cambrian Era) समाप्ती होत असताना, मुख्यतः गिरिजनन व्यतिरिक्त इतर विवर्तनीकी प्रक्रियेतून (Anorogenic tectonic movements) ह्या मोठ्या प्रमाणातील विस्तारित (साधारण ३०,००० चौ.कि.मी.) मलानी ज्वालामुखीय खडक गटाची साधारण ७४० द.ल. वर्षांपूर्वी निर्मिती झालेली आहे.
राजस्थानची राजधानी असलेल्या जयपूर शहराच्या नैऋत्येला जोधपूर शहर हे प्रसिद्ध पर्यटन स्थळ असून ते राज्य रस्ते आणि हवाई मार्गाने जोडलेले आहे. उत्तर रेल्वेच्या प्रमुख मार्गावर जोधपूर स्टेशन आहे. जोधपूर शहरातून मेहरानगड किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर किल्ल्याच्या १०० मी. अलीकडे रस्त्याच्या उजव्या बाजूला हे संधित टफ पाहावयास मिळतात.
संदर्भ :
- https://www.gsi.gov.in/webcenter/portal/OCBIS/pageGeoInfo/pageGEOTOURISM?_adf.ctrl tate=dvd210a27_5&_afrLoop=29220469476959168#!
समीक्षक : पी. एस. कुलकर्णी