मार्शल, ॲल्फ्रेड : (२६ जुलै १८४२–२३ जुलै १९२४). जगप्रसिद्ध ब्रिटिश अर्थशास्त्रज्ज्ञ. अर्थशास्त्रामधील नवसनातनवादाचा महत्त्वाचा पुरस्कर्ता. त्यांचा जन्म विल्यम मार्शल आणि रिबेका ऑलिव्हर या दांपत्यापोटी लंडनच्या क्लॅपम या उपनगरात झाला. त्यांचे वडील बँक ऑफ इंग्लंडमध्ये रोखपाल होते. ॲल्फ्रेड हे वयाच्या नवव्या वर्षी मर्चंट टेलर्स स्कूलमध्ये दाखल झाले. ते गणित विषयात फार हुशार होते. आवडत्या विषयाचा अधिक अभ्यास करायला मिळावा म्हणून इ. स. १८६१ मध्ये त्यांनी केंब्रिजच्या सेंट जोन्स महाविद्यालयात प्रवेश मिळविला. गणितात उच्च प्रावीण्य संपादून ते पदवीधर झाले. ट्रॉय पास परीक्षेतील ते दुसरे रँग्लर होते. प्रारंभी क्लिफ्टन येथे व त्यानंतर केंब्रिजमध्ये त्यांनी गणितविषयाचे अध्यापन केले. तेथे प्रख्यात तत्त्ववेत्ता हेन्री सिज्विक यांच्याशी त्यांचा संबंध आला आणि मुख्यत: त्यांच्या आग्रहामुळे ते कांट आणि हेगेल यांच्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास करू लागले. स्पेन्सर, मिल, टॉयन्बी, कूर्नो, बेंथॅम यांच्या ग्रंथांच्या वाचनाचा व त्यांच्या विचारसरणीचा मार्शल यांच्यावर खोल परिणाम झाला. गणित विषयासोबतच अर्थशास्त्र या विषयात त्यांना रुची निर्माण झाली; मात्र अर्थशास्त्राची ओळख त्यांना तत्त्वज्ञान आणि नीतिशास्त्र या विषयांद्वारे झाल्यामुळे त्यांच्या अर्थशास्त्रविषयक दृष्टिकोणावर त्या विषयांचा प्रभाव पडलेला दिसून येतो.

मार्शल यांना केंब्रिजमध्ये अधिछात्रवृत्ती मिळत होती. त्यातच इ. स. १८७७ मध्ये आपली विद्यार्थिनी मेरी पॅले हिच्याशी त्यांनी विवाह केला. त्यामुळे केवळ अविवाहितांसाठी असलेली ही अधिछात्रवृत्ती त्यांना विवाहानंतर सोडून द्यावी लागली. त्यानंतर ब्रिस्टल येथील युनिव्हर्सिटी कॉलेजचा पहिला प्राचार्य म्हणून त्यांनी इ. स. १८८१ पर्यंत काम पाहिले. प्रशासकीय कामाच्या ताणाचा त्यांच्या प्रकृतीवर परिणाम होऊ लागल्याने त्यांनी या पदाचा राजीनामा दिला आणि विश्रांतीसाठी काही काळ ते इटलीत जाऊन राहिले. त्यानंतर इ. स. १८८३ ते इ. स. १८८५ या काळात ते ऑक्सफर्डच्या बॅल्यल महाविद्यालयात राजकीय अर्थशास्त्र या विषयाचा प्राध्यापक व व्याख्याता म्हणून रुजू झाले. इ. स. १८८५ मध्ये ते पुन्हा केंब्रिजला आले आणि केंब्रिज विद्यापीठात निवृत्तीपर्यंत (इ. स. १९०८ पर्यंत) राजकीय अर्थशास्त्राचा प्राध्यापक म्हणून काम केले. त्यानंतर त्यांनी स्वत:ला लेखनास समर्पित केले. इ. स. १८९१ ते इ. स. १८९४ या काळात ते ‘रॉयल कमिशन ऑन लेबरʼ या संस्थेचे सदस्य होते. मार्शल यांनी अर्थशास्त्रामधील केंब्रिज संप्रदायाची प्रस्थापना केली. इ. स. १९०२ पासून रॉयल इकॉनॉमिक सोसायटी (पूर्वीचे ब्रिटीश इकॉनॉमिक्स असोसिएशन, स्था. इ. स. १८९०) ही संस्था आणि इकॉनॉमिक्स जर्नल हे मासिक या दोहोंची स्थापना त्यांच्या पुढाकारामुळेच झाली.

मार्शल हे तत्कालीन सामाजिक परिस्थिती आणि सभोवतालचे दारिद्र्य पाहून व्यथित होत असे. दारिद्र्य हे अनेक सामाजिक दुरावस्थांच्या मुळाशी आहे, याची त्यांना जाणीव झाली. दारिद्र्याच्या कारणांचा शोध म्हणजे मानवजातीच्या अध:पतनाचे विश्लेषणच होय, असे त्यांनी ठामपणे म्हटले आहे. मार्शल यांनी याच जाणिवेमुळे अर्थशास्त्राच्या अभ्यासात विशेष रस घेतला. अर्थशास्त्राची व्याख्या करताना एका बाजूला अर्थशास्त्र संपत्तीचा अभ्यास करते, तर दुसऱ्या बाजूला मानव आणि त्यांचे कल्याण अर्थशास्त्राला महत्त्वाचे वाटते असे ते म्हणतात; तेव्हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वामधील मानवहितवाद प्रकर्षाने लक्षात येतो.

मार्शल यांनी अर्थशास्त्र विषयाला दिलेले योगदान फार मोठे आहे. त्यांचा उदय होण्यापूर्वी अर्थशास्त्र हे राज्यशास्त्राची एक शाखा समजली जात. सनातनवादी अर्थशास्त्राला ‘पोलिटिकल इकॉनॉमी’ म्हणत. मार्शल यांनी आपल्या प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स या ग्रंथात अर्थशास्त्राचे वाढते महत्त्व ओळखून त्या शास्त्राला स्वतंत्र स्थान दिले आणि ‘इकॉनॉमिक्स’ हा शब्द प्रथमच योजिला. अर्थशास्त्राचा मानवी स्वभावातील तरल व सतत बदलत्या प्रवृत्तींशी संबंध आहे; आपले भौतिक कल्याण साधण्यासाठी मनुष्यप्राणी समाजाचा एक भाग म्हणून जी धडपड करतो, त्या धडपडीचा अर्थशास्त्र अभ्यास करते, असे विचार मार्शल यांनी मांडले. ज्या मानवी व्यवहारांचे पैशाच्या फूटपट्टीने मोजमाप करता येते, त्याच व्यवहारांत अर्थशास्त्राच्या अभ्यासकांना स्वारस्य असते, असे मार्शल म्हणतात. अर्थशास्त्र हे शास्त्र आहे; पण ते केवळ सैद्धांतिक शास्त्र म्हणून राहता कामा नये. दैनंदिन जीवनाशी त्याची सांगड घातली गेली पाहिजे, यावर त्यांनी भर दिले. म्हणजेच, अर्थशास्त्र हे प्रत्यक्षानुसारी तसेच आदर्शानुसारी शास्त्र आहे, असे मार्शल यांचे मत होते.

मार्शल यांनी आपल्या प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स या ग्रंथामध्ये अर्थशास्त्रामधील अनेक विषयांवर विस्ताराने लिहिले आहे. त्यांनी उपभोगाला अर्थशास्त्रात महत्त्वाचे स्थान दिले. मानवी गरजा या सर्व आर्थिक व्यवहारांच्या मुळाशी आहेत. उपभोग हा आर्थिक व्यवहारांचा प्रारंभ तसाच अंतही आहे, हे त्यांनी प्रथमच ठामपणे सांगितले. मानवी गरजा, त्यांची वैशिष्ट्ये आणि त्यांची विभागणी यांचा त्यांनी विस्तृत परामर्श घेतला आहे. उपभोक्त्याचे संतोषाधिक्य ही नवी कल्पना त्यांनी मांडली. एखादी वस्तू खरेदी करताना त्या वस्तूसाठी उपभोक्ता अधिक पैसे खर्च करायला तयार असेल आणि त्याला ती वस्तू कमी किमतीत मिळत असेल, तर त्या दोन्हींमधील फरक म्हणजे उपभोक्त्याला मिळणारे अतिरिक्त समाधान म्हणजेच उपभोक्त्याचे संतोषाधिक्य होय. एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता यांवर आधारलेली ही संकल्पना फारशी व्यवहारोपयोगी नसली, तरी उपभोगविषयक अनेक समस्यांना चालना देणारी म्हणूनच उपयुक्त ठरते; तथापि उपभोग आणि मागणी यांचा विचार करताना मार्शल यांनी मांडलेली ‘लवचीकतेची कल्पना’ अर्थशास्त्रात अतिशय महत्त्वाची मानली जाते. वस्तूच्या किमतीत होणाऱ्या बदलाचा मागणीवर होणारा परिणाम ‘लवचिकते’च्या साहाय्याने मोजता येतो. काही वस्तूंच्या बाबतीत किमतींत होणारा थोडासा बदल मागणीत मोठा बदल घडवून आणण्यास कारणीभूत ठरतो, तर काही वस्तूंच्या किमतीत मोठे बदल घडून आले, तरी त्यांचा मागणीवर ठळक परिणाम दिसून येत नाही. केन्स यांनी मार्शलच्या लवचीकतेची कल्पना याबाबत आपले मत व्यक्त करताना म्हणतात की, ‘कल्पना लवचीकतेची कल्पना अर्थशास्त्रात इतकी अर्थपूर्ण मानली जाते की, वस्तूंचे व उत्पादक घटकांचे मूल्यविषयक सिद्धांत लवचीकतेच्या कल्पनेशिवाय मांडताच येणार नाहीत. लवचिकतेच्या कल्पनेचा शोध लावून मार्शल यांनी संशोधनाचे मोठे क्षेत्र उघडून देऊन अर्थशास्त्रज्ञांची मोठीच सेवा केली आहे’.

मार्शल यांच्या मते, भूमी आणि श्रम हे उत्पादनाचे दोन महत्त्वाचे घटक होत. संघटन हे श्रमाचा एक भाग असून भांडवल म्हणजे भौतिक वस्तूंच्या उत्पादनासाठी साठा करून ठेवलेली तरतूद आहे, असे म्हणता येईल. उत्पादनकार्यात निसर्ग महत्त्वाची कामगिरी बजावतो; श्रमिकाची शारीरिक व बौद्धिक वाढसुद्धा भोवतालच्या परिस्थितीवर अवलंबून असते. त्यांनी उत्पादनक्षेत्रात श्रमविभाजनाचे महत्त्व जाणले होते. श्रमविभाजन व यंत्राचा वापर परस्परावलंबी असून श्रमिकांचे कौशल्य आणि यंत्रसामग्री यांचा जास्तीत जास्त उपयोग करून घेण्यासाठी श्रमविभाजनाचा अवलंब करणे हितावह ठरते; मात्र वस्तूंना असलेली मागणी आणि बाजाराची व्याप्ती वाढल्याशिवाय श्रमविभाजन फायदेशीर ठरणार नाही, हे मार्शल यांनी स्पष्ट केले आहे.

उत्पादनक्षेत्रातील मूलभूत सिद्धांत ‘घटत्या उत्पादनफलाचा नियम’ रिकार्डोने मार्शल यांच्यापूर्वीच उल्लेखिला असला, तरी त्या नियमाला मार्शल यांनी तपशीलवार स्वरूप दिले. कृषिव्यवसायात सुधारणा झालेली नसताना जर भांडवल व श्रम यांचे प्रमाण भूमी कसताना वाढविण्यात आले, तर मिळणारे उत्पादन सर्वसाधारणपणे घटत्या प्रमाणात वाढत राहते, अशी व्याख्या मार्शल यांनी केली. लागवडीच्या पद्धतीत सुधारणा झाली, तर उत्पादनाचे प्रमाण वाढते राहील हे खरे; परंतु ही वाढ तात्पुरत्या स्वरूपाची असते, असे मार्शल म्हणतात. हा सिद्धांत मच्छीमारी व खाणकाम यांनाही लागू आहे. मार्शल यांनी हा सिद्धांत कृषिव्यवसायाशी निगडित मांडला असला, तरी तो उत्पादनाच्या अन्य क्षेत्रांसही लागू होतो, असे आज सिद्ध झाले आहे.

मार्शल यांनी अर्थशास्त्रात ‘प्रातिनिधिक उत्पादन संस्था’ ही कल्पना सर्वप्रथम उपयोगात आणली. बहिर्गत आणि अंतर्गत बचतींचा फायदा घेणारी, दीर्घकाळ अस्तित्वात असणारी, उत्पादनक्षेत्रात सर्वसाधारण यश मिळविणारी आदर्श उत्पादनसंस्था म्हणजे प्रातिनिधिक उत्पादन संस्था होय.

मार्शल यांनी मूल्यनिर्धारणक्षेत्रात केलेले योगदान फार महत्त्वाचे आहे. किंबहुना अर्थव्यवस्थेमधील अनेक भागांच्या परस्परसंबंधांचा शोध घेताना मागणी, पुरवठा व मूल्यनिर्धारण यांचे त्यांनी मोठ्या उत्साहाने विवरण केल्याचे आढळून येते. मागणीचा विचार करताना त्यांनी उपयोगिता, सीमांत उपयोगिता, घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत या प्रस्थापित संकल्पनांचा वापर केला आणि पुरवठ्याचे पृथक्करण करताना उत्पादनफलांचे नियम, श्रमविभाजन, उत्पादनक्षेत्रातील संघटनकौशल्य यांचा उपयोग केला. प्रस्थापित संकल्पनांच्या आधाराने त्यांनी मागणी व पुरवठा यांमधील आपला संतुलनसिद्धांत मांडला. मार्शलपूर्वीच्या अर्थशास्त्रज्ञांनी वस्तूचे मूल्य निश्चित करताना मागणी व पुरवठा या दोहोंचे महत्त्व ओळखले असले, तरी ऑस्ट्रियन संप्रदायाच्या विल्यम स्टॅन्ली जेव्हन्झ, कार्ल मेंगर, मेरी-एस्प्रित लेआँ व्हालरा आणि जॉन बेट्‌स क्लार्क या अर्थशास्त्रज्ञांनी कोणत्याही वस्तूचे मूल्य तिच्या सीमांत उपयोगितेमुळेच निश्चित होते, असे मत मांडून मूल्यनिर्धारणात मागणीला अधिक महत्त्व दिले. याउलट, जॉन स्ट्यूअर्ट मिल, ॲडम स्मिथ, डेव्हिड रिकार्डो या सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांनी वस्तूच्या पुरवठ्यावर अधिक भर दिला आणि वस्तूचे मूल्य उत्पादन परिव्ययाइतके असते, असे प्रतिपादन केले. मार्शल यांनी वस्तूचे मूल्य निश्चित करताना वस्तूची सीमांत उपयोगिता व उत्पादन परिव्यय यांची सांगड घातली; मागणी आणि पुरवठा या दोन्ही बाजूंना सारखेच महत्त्व दिले. मागणी व पुरवठा ही कात्रीच्या दोन पात्यांप्रमाणे असतात; दोन्ही पात्यांचा उपयोग केला, तरच कागद वा कापड कापता येते. मागणी व पुरवठा यांपैकी कोणते पाते अधिक प्रभावी असते, ते कालावधीवर ठरते. मूल्यनिर्धारणात मार्शल यांनी कालावधीला महत्त्वाचे स्थान दिले. अतिअल्पकाळ, अल्पकाळ, दीर्घकाळ आणि अतिदीर्घकाळ अशी कालविभागणी करून अल्पकाळात वस्तूच्या मूल्यावर मागणीचा विशेष प्रभाव पडतो, तर दीर्घकाळात मूल्यावर वस्तूच्या पुरवठ्याचा अधिक परिणाम होत असतो, असे निष्कर्ष त्यांनी काढले. दीर्घकाळात वस्तूच्या मूल्याची प्रवृत्ती उत्पादन व्ययाबरोबर होण्याची असते. अतिअल्पकाळात निर्धारित होणाऱ्या मूल्यास मार्शल हे ‘विपणी किंमत’ (मार्केट प्राइस) म्हणतात व दीर्घकाळातील किमतीस ‘सामान्य किंमत’ असे नाव देतात.

मार्शल यांची आभास खंड : खंडनिभ, प्रतिरूप खंड. ही संकल्पना आता सर्वमान्य झाली आहे. रिकार्डो यांनी खंड ही कल्पना भूमीशी निगडित केली. भूमीच्या उपजत व टिकाऊ स्वरूपाच्या गुणांच्या वापराबद्दल भूमीमालकाला खंड द्यावा लागतो आणि खंड हा जमिनीपासून मिळणाऱ्या उत्पादनाचाच एक भाग असतो, असे रिकार्डो यांनी खंडसिद्धांत मांडताना म्हटले आहे. राष्ट्रीय उत्पन्नाचे चार उत्पादनघटकांत वितरण करताना भूमी हा घटक श्रमिक, भांडवल व संयोजक यांहून निराळा आहे. भूमी ह्या निसर्गनिर्मित घटकाचा पुरवठा अल्प व दीर्घ अशा दोन्ही काळांत मर्यादित असतो. त्यामुळे भूमीच्या मोबदल्याचा विचार करताना वेगळा दृष्टिकोण आवश्यक आहे, असे त्यांचे मत होते.

मार्शल यांनी संपत्तीची अर्थशास्त्रावरील पकड कमी करून ते मानवी कल्याणाभिमुख बनविले. त्यांच्यातील हा मानवतावाद त्यांनी कामगाराची कार्यक्षमता आणि सवड यांची जी सांगड घातली आहे, त्यामध्ये प्रकर्षाने दिसून येतो. कामगारांना भरपूर विश्रांती मिळाली म्हणजे शिक्षण, क्रीडा व अन्य क्षेत्रांत प्रावीण्य मिळविणे त्यांना शक्य होईल आणि त्यांच्यामधील उपजत गुणांचा विकास होण्यास संधी प्राप्त होईल. यासाठी कामगारांचे कामाचे तास कमी करावेत; परिणामी राष्ट्रीय उत्पन्नाचा आकार कमी झाला तरी चालेल, असे त्यांनी ठामपणे म्हटले आहे. कामगार संघटनांचे कामगारांच्या वेतनांवर जे अनुकूल परिणाम होतात, त्यांचीही मार्शल यांनी दखल घेतल्याचे दिसून येते.

मार्शल यांनी अर्थशास्त्रात कोणतीही नवीन तत्त्वे न सांगता अर्थशास्त्राची निव्वळ पुनर्रचना करून त्याला सुसंबद्ध रूप दिले, असे काही टीकाकारांनी म्हटले आहे. अर्थशास्त्राच्या सुसंबद्ध मांडणीचे श्रेय त्यांच्याकडे जातेच; पण त्यांनी अर्थशास्त्रात अनेक नव्या संकल्पनांची भर घातली, हे सर्वज्ञात आहे. लवचीकता, उपभोक्त्याचे संतोषाधिक्य, मूल्यनिर्धारणात कालावधीचे महत्त्व, प्रतिरूप खंड यांसारख्या त्यांच्या संकल्पना अर्थशास्त्रातील सैद्धांतिक विकासाला कारणीभूत ठरल्या. सीमांत उपयोगितेची कल्पना त्यांनी तपशीलवार मांडली. पैशाचे मूल्य अन्य वस्तूंप्रमाणे मागणी व पुरवठा यांवर ठरते आणि पैशाची मागणी प्रामुख्याने मूल्यसंचयासाठी केली जाते, हा ‘द्रव्यराशी सिद्धांता’चा ‘रोकड शिल्लक दृष्टिकोण’ मार्शल यांनी व अन्य केंब्रिज अर्थशास्त्रज्ञांनी मांडला. तो वादग्रस्त ठरला असला, तरी त्याचे चलननीतिविषयक मूलगामी विचार त्याच्या चिकित्सक दृष्टीचा प्रत्यय आणून देतात. त्यांच्या विचारांचा पगडा तत्कालीन अर्थशास्त्रज्ञांवर होताच; परंतु तो पुढील पिढीतील यूरोपीय आणि अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांवरही त्यांचा प्रभाव पडलेला जाणवतो. आर्थर सेसिल पिगू , जॉन मेनार्ड केन्स, सिडनी जॉन चॅपमन, सर जॉन रिचर्ड हिक्स यांसारख्या प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञांची शिष्यपरंपरा त्यांनी निर्माण केली. त्यांनी अर्थशास्त्रातील नवसनातनवाद प्रस्थापित केला. स्वत: गणितात पारंगत असूनही अर्थशास्त्रात गणिताचा उपयोग त्यांनी अभावानेच केला. प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स या ग्रंथामध्ये सिद्धांतांना गणितीय रूप देताना मार्शल यांनी तळटीपा आणि परिशिष्टे यांचा आश्रय घेतलेला आहे. असे असले, तरी योझेफ आलोईस शुंपेटर या अर्थशास्त्रज्ञाने आधुनिक अर्थमितीच्या उगमास मार्शल यांनी मोठा हातभार लावला आहे, असे गौरवाने म्हटले आहे. केन्स आपल्या गुरूला ‘आधुनिक आकृतिबद्ध अर्थशास्त्राचा प्रणेता’ हे अभिधान देतो. एवढेच नवे, तर  ‘केन्सप्रणीत क्रांती’ मार्शल यांची परंपरा बाजूस सारत नाही, त्या परंपरेचे ते विस्तारित रूप आहे, असे मत आधुनिक विचारवंतांनी व्यक्त केले आहे.

मार्शल यांनी स्वत: आणि सहकाऱ्यांसह लिहिलेले ग्रंथ पुढीलप्रमाणे : दि प्रोव्हर्ब्स ऑफ ॲल्फ्रेड (सहलेखक–१८७२), दि प्यूअर थिअरी ऑफ फॉरेन ट्रेड (१८७९), इकॉनॉमिक्स ऑफ इंडस्ट्री (सहलेखक–१८७९), ऑफिशिअल पेपर (१८८०), प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स (१८९०), एलिमेंट्स ऑफ इकॉनॉमिक्स ऑफ इंडस्ट्री (१८९२), दि न्यू केंब्रिज करिक्युलम इन इकॉनॉमिक्स ॲण्ड असोसिएटेड ब्रँचेस ऑफ पॉलिटिकल सायन्स (१९०३), दि फिस्कल पॉलिसी ऑफ इंटरनॅशनल ट्रेड (१९०८), इंडस्ट्री अँड ट्रेड (१९१९), मनी, क्रेडिट अँड कॉमर्स (१९२३) इत्यादी.

संदर्भ :

  • Keynes, John Maynard, Essays In Biography, London, 1963.
  • Pigou, A. C. Alfred Marshall and Current Thought, London, 1953.
  • Roll, Eric, A History of Economic Thought, London, 1953.
  • Schumpeter, S. A., Ten Great Economists, London, 1956.

समीक्षक : संतोष ग्या. गेडाम


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.