संधिपाद संघातील कवचधारी क्रस्टेशिया (Crustacea) वर्गातील मॅलॅकोस्ट्रॅका (Malacostraca) उपवर्गातील (मऊ कवच असणारे कवचधारी प्राणी) डेकॅपोडा गणातील (Decapoda; दशपाद असलेल्या प्राण्यांचा गण) पिनिडी (Penaeidae) कुलात सागरी कोळंबीचा समावेश होतो. हीचे शास्त्रीय नाव फेन्नेरोपिनियस इंडिकस (Fenneropenaeus indicus) असून ती सामान्यपणे पांढरी कोळंबी (Indian white prawns) म्हणून ओळखली जाते. पूर्वी तिचे नाव पिनियस इंडिकस (Penaeus indicus) असे होते. कोळंबीला इंग्रजीमध्ये श्रिम्प (Shrimp) किंवा प्रॉन्स (Prawns) असे म्हटले जाते. सागरी कोळंबीकरिता श्रिम्प हा शब्द मुख्यत्वे अमेरिकेत वापरला जातो आणि भारतात त्यांना प्रॉन्स असे म्हणतात. फेन्नेरोपिनियस इंडिकस या कोळंबीचा संचार इंडो-वेस्टर्न पॅसिफिक महासागर, पूर्व व दक्षिण तसेच आग्नेय आफ्रिकेपासून ते दक्षिण चीन, पापुआ न्यू गिनी आणि उत्तर ऑस्ट्रेलिया यांच्या किनाऱ्याने असतो. भारतीय किनाऱ्याने देखील ही प्रजाती मोठ्या प्रमाणावर आढळते.
शरीररचना : सागरी कोळंबीच्या नराची जास्तीत जास्त लांबी १८.४ सेंमी., तर मादीची जास्तीत जास्त लांबी २३ सेंमी. एवढी असते. १७ सेंमी. लांबीची कोळंबी प्रौढावस्थेत पोहोचलेली असते. यांचे डोळे बहुभिंगी असून ते छोट्याशा दांड्यावर उभे असतात. डोळे स्थिर ठेवून सुद्धा उजेडाचे व जवळ आलेल्या भक्ष्याचे ज्ञान होते. शरीर अर्धपारदर्शक असून त्यावर हिरवट, राखाडी तसेच निळ्या रंगाचे ठिपके असतात. शरीराचे शिरोवक्ष (डोके आणि छाती यांच्या एकीकरणाने बनलेला शरीराचा भाग) आणि उदर असे दोन भाग असतात. शिरोवक्षाच्या शीर्ष भागावर लांब स्पृशा/शृंगिका (Antennae) आणि लहान स्पृशा/लघुशृंगिका यांची प्रत्येकी एक जोडी असते. स्पृशा निळसर रंगाच्या असून त्यावर लालसर छटा असते. यांचा उपयोग गंध व स्पर्शज्ञान यांसाठी होतो. सर्वच क्रस्टेशियामध्ये ध्वनिज्ञान होते की नाही यावर पुरेसे संशोधन झालेले नाही.
शिरोवक्षाच्या मानाने उदर बरेच लांब व खंडयुक्त असते. उदर खंडयुक्त असून त्याच्या सहा खंडांतून अन्ननलिका जाते. ही अन्ननलिका दोऱ्याप्रमाणे दिसते. डोक्याच्या भागावर पुढे आलेला काट्यासारखा भाग असतो, त्यास तुंड (Rostrum) असे म्हणतात. शरीरावर असणारे मऊ बाह्य कवच (पृष्ठवर्म; Carapace) ठराविक कालांतराने कात टाकल्याप्रमाणे बदलले जाते. त्यामुळे बाह्य कवचाची वाढ होत असते. वक्ष भागावर पायांच्या (Pereiopods) पाच जोड्या असतात. यांचा उपयोग चालण्यासाठी किंवा अन्न पकडण्यासाठी होतो. उदराच्या खालच्या बाजूला असणाऱ्या परांसारख्या अवयवांना प्लवपाद (Pleopod) म्हणतात. प्लवपादांच्या पाच जोड्या असून यांचा वापर पोहण्यासाठी होतो. प्लवपादांची सहावी जोडी मोठी असून ती उदराच्या पश्च (मागील) टोकाशी असते, तिला पुच्छपाद (Cercopod/Uropod) म्हणतात. उदराच्या शेवटच्या खंडास पुच्छ खंड (Telson) असे म्हणतात. पुच्छखंड आणि पुच्छपाद मिळून एक मोठे प्लवांग तयार होते, त्यास पुच्छपक्ष (Caudal fin) असे म्हणतात. धोका जाणवल्यास कोळंबी पुच्छपक्षाच्या साहाय्याने वेगाने मागच्या बाजूस जाते.
सागरी कोळंब्या समुद्रात २ मी.पासून ते ९० मी.पर्यंतच्या खोलीपर्यंत आढळतात. परंतु, शक्यतो तळातल्या गाळात किंवा वाळूत शिरून राहणे त्या पसंत करतात. ३० मी.पेक्षा कमी खोल अशा उथळ पाण्यात त्या सर्वांत जास्त प्रमाणात सापडतात.
जीवनचक्र : सागरी कोळंबीचे जीवनचक्र वैशिष्ट्यपूर्ण असते. प्रौढ कोळंबीचा वावर खोल समुद्रामध्ये असतो. परिपक्व झाल्यावर प्रजननासाठी त्या पुन्हा किनाऱ्यानजीक येतात. खाजण जागा (खाऱ्या खाडीच्या पात्रातील चिखलाची जागा) आणि कांदळवनांमध्ये (True mangrove; दलदलीच्या भागांतील वने) त्या अंडी घालतात. त्यांच्यापासून निर्माण होणारी पिले तलस्थ पद्धतीचे (Benthic; पाण्याच्या तळाशी राहणारे) जीवन जगतात. त्यांची प्रौढ होण्याची वेळ जसजशी जवळ येत जाते तसतश्या त्या पुन्हा खोल समुद्रामध्ये जातात.
नुकतीच कात टाकलेली मादी आणि कडक कवचाचा लहान आकाराचा नर यांच्यात समागम होतो. मादी कोळंबी २,१२,८०० ते १२,५४,२०० इतक्या मोठ्या संख्येने अंडी घालते. ही अंडी पंधरा तासात डिंभकात रूपांतरित होतात. कोळंबीचा आकार जसा वाढत जातो तशी त्याची अंडी घालण्याची क्षमता देखील वाढत जाते. अंड्यापासून निर्माण होणारे डिंभक हे ६ नॉप्लिअस (Nauplius), ३ झोइया (Zoae) आणि ३ मायसिस (Mysis) अशा बारा अवस्थांतून अवस्थांतर करीत मोठी होते. त्यानंतर त्या किनाऱ्यानजिक येतात आणि खाडी तसेच कांदळवनातील खाजण जागांमध्ये त्या वाढतात आणि प्रौढावस्थेत त्या पुन्हा समुद्राकडे प्रवास करू लागतात. सागरी कोळंबीचा पूर्ण जीवनकाल हा साधारणपणे दोन वर्षांचा असतो.
सागरी कोळंबी ५—५० PPT (‰ – Parts per Thousand; हजारातील एक भाग) इतक्या क्षारतेच्या पाण्याच्या विविध पातळ्यांत आणि १८०—३४.५० सें. इतक्या तापमानामध्ये सुखनैव संचार करू शकते. कोळंबीची छोटी पिले १०—१५ PPT क्षारतेत उत्तम वाढतात. थोडक्यात किनाऱ्यानजीकच्या कमी क्षारतेच्या पाण्यात तसेच खोल समुद्रातील पाण्यात त्यांना सहजपणे जगता येते.
कोळंबी ही अतिशय आवडती खाद्य-प्रजाती असल्यामुळे तिला चांगले व्यापारी मूल्य मिळते. त्यामुळे मत्स्यउद्योगात कोळंबी अतिशय महत्त्वाची मानली जाते. कोळंबीची परदेशी निर्यात करण्यात भारताचा प्रथम क्रमांक आहे. आशियाई देशात आणि भारताच्या पूर्व व पश्चिम किनाऱ्यावर काही ठिकाणी कोळंबीची मत्स्यशेती देखील मोठ्या प्रमाणावर केली जाते. कोळंबीला मिळणारा बाजारभाव पाहता असे प्रकल्प राबवणे हे आर्थिक हिताचे आहे.
पहा : क्रस्टेशिया, गोड्या पाण्यातील कोळंबी, चिंगाटी (कुमार विश्वकोश), झिंगा (कुमार विश्वकोश), टायगर कोळंबी.
संदर्भ :
- Fenneropenaeus indicus, (Indian white shrimp) CABI www.cabi.orgisc datasheet FAO Fisheries and Aquaculture – species Fact Sheets – Penaeus… www.fao.org Fao Home Fisheries and Aquaculture.
- https://en.wikipedia.org/wiki/Indian_prawn
समीक्षक : किशोर कुलकर्णी