वामदेव : एक वैदिक ऋषी. ‘ वामदेव गोतम ’ वा ‘ वामदेव गौतम ’ ह्या नावांनीही तो ओळखला जातो. त्याच्या वडिलांचे नाव गोतम व आईचे नाव ममता. त्यास नोधा नावाचा एक भाऊ व मूर्धन्वा, बृहद्दिव व बृहदुक्थ हे तीन पुत्र होते. विश्वामित्राच्या काही सूक्तांचा याने प्रचार केला. ऋग्वेदाच्या चौथ्या मंडलातील ४२ – ४४ ही सूक्ते सोडून बाकी सर्व सूक्तांचा वामदेव हा द्रष्टा होय. मातेच्या गर्भात असतानाच त्यास आत्मज्ञान प्राप्त झाले. इतरांप्रमाणे नैसर्गिक मार्गाने जन्मास न येता त्याने आपल्या योगसामर्थ्याने श्येनरूप (ससाण्याचे रूप) घेतले व तो मातेचे पोट फाडून बाहेर आला. ऐतरेय उपनिषदातही वामदेवाची कथा आहे. त्याचा जन्म होण्यापूर्वी त्याला अनेक कारागृहांत डांबण्याचा प्रयत्न झाला पण तो यशस्वी होऊ न देता वामदेव श्येन पक्ष्यासारखी झेप घेऊन पृथ्वीवर आला. ह्या सर्व कथा रूपकात्मक वाटतात. मातेच्या गर्भगृहालाच येथे कारागृह म्हटले गेले असावे.
ऋग्वेदाच्या चौथ्या मंडलातील बऱ्याच सूक्तांमध्ये आलेल्या सुदास, दिवोदास इत्यादींच्या उल्लेखांवरून वामदेवाचा त्यांच्याशी संबंध दिसून येतो. बृहद्देवता ह्या ग्रंथात इंद्र व वामदेव यांच्यासंबंधी आख्यायिका आढळतात; परंतु त्यांचा निश्चित अर्थबोध होत नाही. वामदेवाने इंद्रास विकावयास काढल्याचा उल्लेखही एका कथेमध्ये आढळतो.
वामदेव हा महान तत्त्ववेत्ता होता. त्याने पुनर्जन्मासंबंधी सांगितलेले तत्त्वज्ञान ‘जन्मत्रयी’ या नावाने प्रसिद्ध आहे. त्यानुसार प्रत्येक मनुष्याचे तीन जन्म असतात : (१) पित्याचे शुक्रजंतू मातेच्या शोणितद्रव्याशी संयोगित होतात, तो. (२) मातेच्या उदरातून मूल जन्माला येते, तो. (३) मृत्यूनंतर मिळतो, तो नवा जन्म. वामदेवाला तत्त्वज्ञानामुळे आत्मानुभव प्राप्त झाला होता. परमात्म्याची शक्ती ती आपलीच शक्ती व परमात्म्याची कृत्ये ती आपलीच कृत्ये, असे तो मानीत असे. त्याला संगीतही प्रिय होते.
अन्य काही वामदेवही आहेत. उदा., (१) अकरा रुद्रांपैकी एक. (२) शंकराच्या ‘ गुहावासिन् ’ ह्या अवताराचा शिष्य. (३) मनूला शतरूपेपासून झालेल्या सात पुत्रांपैकी एक. (४) अंगिरस व स्वराट् ह्यांचा पुत्र. (५) हिरण्यरेतसाचा एक पुत्र. (६) दशरथपुत्र श्रीरामाच्या सभेतील एक. (७)अर्जुनाने राजसूय यज्ञाच्या वेळी ज्याला पराभूत केले, तो मोदापूरचा राजा.
संदर्भ :
- Anna Dallapiccola, Dictionary of Hindu Lore and Legend.
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.