महाराष्ट्रातील एक हिंदू लेणी. उस्मानाबाद (प्राचीन नाव धाराशिव) शहरालगत प्रामुख्याने दोन ठिकाणी लेणी खोदण्यात आली आहेत. यांपैकी शहराच्या पश्चिमेस असणारी लेणी ‘धाराशिव लेणी’ म्हणून ओळखली जातात, तर भोगावती नदीजवळील एका टेकडीवर खोदलेली लेणी, ‘चामर’ किंवा ‘चांभार’ लेणी म्हणून प्रसिद्ध आहेत.

जेम्स बर्जेस या एका स्कॉटिश पुरातत्त्वज्ञाने तत्कालीन धाराशिव परिसराचे सर्वप्रथम सखोल सर्वेक्षण केले (१८७५). त्यांनी लंडन येथून प्रकाशित झालेल्या द अँटिक्विटीज इन द बिदर अँड औरंगाबाद डिस्ट्रिक्ट्स या अहवालामध्ये चांभार लेणीचे सविस्तर वर्णन केले आहे (१८७८). ही लेणी उस्मानाबाद शहराच्या नैर्ऋत्येला सु. १.५ किमी. अंतरावर स्थित आहेत. बर्जेस यांच्या मते, ही लेणी हिंदू असून, सर्वसाधारणपणे इ. स. सहाव्या शतकाच्या सुरुवातीस खोदण्यात आली असावीत. चांभार लेणीसमूहात दोन स्वतंत्र लेणी खोदण्यात आली असून, ती उत्तराभिमुख आहेत. या लेण्यांसमोर काही अंतरावर भोगावती नदीकिनारी आद्य ऐतिहासिक कालखंडातील पांढरीचे एक टेकाड आहे.
लेणे क्र. १ : या लेण्याचा दर्शनी भाग सु. ३०.५० मी. रुंद आहे. हा भाग बराचसा कोसळलेला असला तरी काही खोल्या सुस्थितीत आहेत. या लेण्याच्या पश्चिमेला पूर्वाभिमुख एक खोली असून त्याच्यावर शिल्पे कोरण्यासाठी केलेली आखणी दिसते. यांपैकी उजव्या बाजूला फक्त गणेशाचे एक छोटेसे शिल्प कोरण्यात आलेले आहे. बर्जेसच्या मते, हा शिल्पपट मुळात सप्तमातृकांसाठी आखलेला असावा. येथून जवळच पूर्वेला तीन सपाट द्वारशाखांयुक्त एक खोली आहे. मुळात ती तुलनेने एका मोठ्या खोलीच्या मागे असावी, असे दिसते. या खोलीजवळ चार खंडित स्तंभ दिसतात. लेण्याच्या मध्यभागी दगडांचा खच पडला असून त्या मागे दोन खोल्या आहेत. यांपैकी एका खोलीत मध्यभागी एक ‘शिवलिंग’ कोरण्यात आले आहे. या खोल्यांच्या पूर्वेला काही खंडित स्तंभ असून शेवटी तीन सपाट शाखांयुक्त पश्चिमाभिमुख खोली आहे.
लेणे क्र. २ : लेणे क्र. १ पासून पूर्वेला थोड्याच अंतरावर उत्तराभिमुख दुसरे लेणे खोदण्यात आलेले आहे. या लेण्याची एकही भिंत सरळ व व्यवस्थितपणे कोरण्यात आलेली दिसत नाही. या लेण्याची रुंदी ७.९२ ते ९.६६ मी. तर लांबी ७.६२ ते ८.७१ मी. आहे. लेण्याच्या दर्शनी भागात दोन अष्टकोनी स्तंभ व दोन अर्धस्तंभ कोरण्यात आले आहेत. लेण्याच्या सभामंडपात दोन ओळींमध्ये प्रत्येकी चार-चार असे एकूण आठ स्तंभ आहेत. यांपैकी पहिल्या ओळीतील मधले दोन स्तंभ १६ बाजूंचे, तर दुसऱ्या ओळीतील मधले दोन स्तंभ अष्टकोनी आहेत. उर्वरित स्तंभ चौकोनाकृती आहेत. लेण्यातील सर्व स्तंभ व स्तंभशीर्षे साधारण पद्धतीची आहेत.
या लेण्यातील गर्भगृहाचे द्वार अलंकृत असून दोन्ही बाजूस सुरेख अर्धस्तंभ कोरण्यात आलेले आहेत. या अर्धस्तंभांची रचना कर्नाटकातील बादामी लेणी व घारापुरी लेणी क्र. चार येथील अर्धस्तंभांशी मिळती-जुळती आहे. या लेण्याचे गर्भगृह २.१६ x २.३७ मी. असून मधोमध एक १.३७ x ०.८५ मीटरची वेदी (उंच आसन) आहे. या वेदीच्या मध्यभागी ३०.४८ सेंमी. आकाराची चौकोनाकृती खोबणी आहे. या लेण्याचा इतर लेण्यांशी तौलनिक अभ्यास केल्यास हे दुसरे लेणे भगवान विष्णू किंवा दुर्गा अथवा महालक्ष्मी या देवतांना समर्पित असावे, असे बर्जेस यांचे मत आहे.
चांभार लेण्यांचे स्थान लयन स्थापत्य विकासाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे. ही लेणी संपूर्ण भारतात आरंभिक काळात खोदण्यात आलेल्या हिंदू लेण्यांपैकी एक समजली जाते. चांभार लेणीची नोंद राज्य संरक्षित स्मारक म्हणून केली आहे.
चांभार लेण्यांपासून जवळच भोगावती नदीच्या पात्रात तीन ठिकाणी अन्य काही लेणी खोदण्यात आल्याचे दिसते. यांपैकी ‘लाचंदर’ नावाचे लेणे एका धबधब्याच्या पायथ्याला खोदण्यात आले आहे. यात दोन ओबडधोबड खोल्या आहेत. या लेण्याच्या विरुद्ध दिशेला एकात-एक अशा तीन खोल्या असलेले दुसरे लेणे आहे. बर्जेस यांच्या मते, हे योगी साधकांच्या साधनेचे ठिकाण असावे. रघुनाथ महाराज निंबाळकर हे साधुपुरुष या लेण्यात ध्यानसाधना करत असत. येथून काही अंतरावर नागनाथ (धृतराष्ट्र नागेश्वर) या ठिकाणी एक शिवलिंग असून खडकात काही खोदकाम केल्याचे आढळून येते. या स्थानाचा उल्लेख स्कंद पुराणात सह्याद्री खंड व तुळजापूर माहात्म्यात एक पवित्र तीर्थ म्हणून आला आहे.
यांशिवाय उस्मानाबाद शहर व परिसरात हातलाई देवी टेकडी, कपालेश्वर मंदिर, पापनाश मंदिर, हिंदू व जैन शिल्पे, कुंड, मध्ययुगीन गढी किंवा कोटाचे अवशेष, मठ, वीरगळ, वाडे, ख्वाजा शमसुद्दीन दर्गा इ. स्थळे व अवशेष आढळून येतात.
संदर्भ :
- Burgess, James, Report on the Antiquities in the Bidar and Aurangabad Districts, Vol. III, London, W. H. Allen and Co., 1878.
- Maharashtra State Gazetteers, Osmanabad District, Bombay, 1972.
समीक्षक : माया पाटील-शहापूरकर
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.
