भारताच्या हिमाचल प्रदेश राज्यातील एक खिंड. पीर पंजाल पर्वतश्रेणीच्या पूर्व टोकाशी सस. पासून ३,९७८ मी. उंचीवर ही खिंड स्थित आहे. रोहतांग खिंड मनाली (हिमाचल प्रेदेश) – लेह (लडाख) महामार्गावर, मनालीपासून ५१ किमी.वर आहे. या खिंडीतून जाणाऱ्या रस्त्याने हिमाचल प्रदेशातील कुलू खोरे लाहूल आणि स्पिती या खोऱ्यांशी जोडले आहे. हाच रस्ता पुढे लेहपर्यंत जातो. त्यामुळे या खिंडीला लाहूल व स्पितीबरोबरच लडाखचेही प्रवेशद्वार मानले जाते. ही खिंड ३२° २२’ १७” उ. अक्षांशावर आणि ७७° १४’ ४७” पू. रेखांशावर आहे. या खिंडीच्या दक्षिणेकडील कुलू खोऱ्यात हिंदू संस्कृतीचे, तर उत्तरेकडील लाहूल व स्पिती खोऱ्यांत बौद्ध संस्कृतीचे प्राबल्य असून हे सांस्कृतिक वेगळेपण या खिंडीमुळे निर्माण झाल्याचे मानले जाते. चिनाब आणि बिआस या दोन नदीखोऱ्यांच्या जलोत्सारकावर ही खिंड स्थित आहे. रोहतांग खिंडीच्या दक्षिण उतारावर बिआस नदीचा उगम होत असून बिआसच्या येथील उगमाकडील वरच्या खोऱ्याला ‘कुलू खोरे’ म्हणून ओळखले जाते. याउलट खिंडीच्या उत्तरेकडील लाहूल भागात चंद्रा आणि भागा या चिनाब नदीच्या शीर्षप्रवाहांचा उगम होतो. त्यांचा तंडी येथील संगमानंतरचा संयुक्त प्रवाह चिनाब या नावाने ओळखला जातो. पर्शियन किंवा फार्सी शब्द रूह+तांग म्हणजे मृत शरीरांची रास. हिमपात, भूमिपात आणि अनपेक्षित येणारी हिमवादळे यांमुळे ही खिंड ओलांडताना अनेकांचे बळी जाऊन त्यांची मृत शरीरे येथेच पडायची. त्यावरून या खिंडीला रोहतांग हे नाव पडल्याचे मानले जाते.
प्राचीन काळापासून पीर पंजाल पर्वतश्रेणीच्या दोन्ही बाजूंकडील लोकांचा व्यापार या खिंडमार्गाने चालत आहे. उन्हाळ्यातील काही महिनेच (सामान्यपणे मे ते नोव्हेंबर) कुलू खोऱ्याचा लाहूल वा स्पिती खोऱ्याशी संपर्क असतो. तेवढ्या कालावधीतच लाहूल आणि स्पिती खोऱ्यातील लोक आपली कृषी व इतर उत्पादने विक्रीसाठी कुलू खोऱ्यात आणतात आणि वर्षातील उर्वरित कालावधीसाठी लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तुंची खरेदी करतात.
लडाखच्या सरहद्दीपर्यंत जाण्यासाठी सध्या भारताला फक्त दोनच प्रमुख रस्ते उपलब्ध आहेत. त्यांपैकी झोजी ला खिंडीतून जाणारा श्रीनगर-द्रास-कारगिल-लेह हा एक आणि हिमाचल प्रदेश राज्यातील रोहतांग खिंडीतून मनालीमार्गे लेहपर्यंत जाणारा दुसरा मार्ग; परंतु हिवाळ्यात झोजी ला व रोहतांग या दोन्ही खिंडींच्या परिसरात जोरदार हिमवृष्टी होते. बर्फाच्छादनामुळे हे दोन्ही रस्ते वर्षातून कमीत कमी पाच ते सहा महिने बंद असतात. १९९९ मधील कारगिल युद्धापासून मनाली-लेह हा महामार्ग लष्करी वाहतुकीच्या दृष्टीने अधिकच महत्त्वाचा ठरला आहे. निसर्ग सुंदर परिसरामुळे रोहतांग खिंड हे एक प्रसिद्ध पर्यटन केंद्र बनले आहे. लष्करी वाहने, खाजगी मालवाहतुकीची व प्रवासी वाहने आणि पर्यटकांची वाहने इत्यादींमुळे विशेषत: उन्हाळ्यात या खिंडमार्गावरील वाहतूक खूप वाढते. त्यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होते. त्या दृष्टीने भारताने येथील नैसर्गिक अडचणींवर मात करत रोहतांग खिंडीच्या मार्गावर अटल बोगद्याची निर्मिती केली आहे. भारताचे तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी ३ जून २००२ रोजी मनाली-लेह या मार्गावरील रोहतांग खिंडीत रोहतांग बोगद्याच्या निर्मितीची घोषणा केली. सर्व तांत्रिक बाबींचा शास्त्रशुद्ध अभ्यास व नियोजन करून २८ जून २०१० रोजी या बोगद्याच्या निर्मितीच्या प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली. या वैशिष्ट्यपूर्ण व महत्त्वाकांक्षी बोगद्याचे काम दहा वर्षांत पूर्ण होऊन ३ ऑक्टोबर २०२० रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या बोगद्याचे उद्घाटन होऊन तो वाहतुकीस खुला करण्यात आला. या बोगद्याचे पूर्वीचे नाव रोहतांग बोगदा असे होते; परंतु तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्मरणार्थ या बोगद्याचे नाव ‘अटल बोगदा’ असे करण्यात आले.
हिमाचल प्रदेश राज्यातील रोहतांग खिंडीत सस.पासून ३,१०० मी. उंचीवर हा बोगदा असून तेथील रोहतांग हे ठिकाण सस.पासून ३,९७८ मी. उंचीवर आहे. अटल बोगदा हा जगातील सर्वाधिक उंचीवरील आणि सर्वांत मोठा बोगदा असून त्याची लांबी ९.०२ किमी., रुंदी १०.५ मीटर आणि उंची ५.५२ मीटर आहे. हा दुहेरी मार्ग असून त्यात दोन्ही बाजूंनी एक एक मीटर रुंदीचे आखीव मार्ग आहेत. हा बोगदा मनाली-लेह (किलाँग) रस्त्यावर असून त्यामुळे या दोन ठिकाणांमधील प्रवासाचे अंतर ४६ किमी. ने कमी झाले आहे. या मार्गामुळे पाच-सहा तासांचा प्रवास अवघ्या दोन-तीन तासांवर आला आहे. या बोगद्यात अत्याधुनिक सुविधा ठेवण्यात आल्या आहेत. उदा., दूरध्वनी सुविधा, आगप्रतिरोधक यंत्रणा, सी. सी. टी. व्ही. कॅमेरे, प्रकाशव्यवस्था, हवेचे प्रदूषण मोजण्याची आणि ते नियंत्रित करण्याची सोय इत्यादी. या बोगद्यातून दरताशी ८० किमी. वेगाने वाहने चालविता येणार आहेत. दिवसाकाठी दीड हजार ट्रक आणि तीन हजार मोटारगाड्या जातील एवढी या बोगद्याची क्षमता आहे. येथील रस्त्यावरील बर्फ हटविण्याची व्यवस्थाही तैनात करण्यात आली आहे. पूर्वी हिवाळ्यात हिमाच्छादनामुळे नोव्हेंबर ते मे या कालावधीत लाहूल व स्पिती जिल्ह्यांचा संपर्क तुटत असे. तसेच दरवर्षी उन्हाळ्यात वाहतूक सुरू करण्यापूर्वी या खिंडीतील आणि रस्त्यावरील बर्फ हटवला जात असे आणि ते फार जिकीरीचे ठरायचे; परंतु या बोगद्यामुळे आता हा रस्ता जवळजवळ बाराही महिने वाहतुकीस खुला राहणार आहे. पूर्वीसारखा तो हिवाळ्यात बंद ठेवावा लागणार नाही. पूर्वी हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २१ म्हणून ओळखला जाई. आता तो रा. महा. क्र. ३ करण्यात आला आहे.
लडाखच्या पूर्वेकडे भारत-चीन यांच्या दरम्यान तणावाची परिस्थिती असताना हा बोगदा सुरू झाला, हे अत्यंत मोलाचे आहे. लडाख सीमेलगतच्या चीनच्या दादागिरीला शह देण्याच्या दृष्टीने हा अटल बोगदा निश्चितच मत्त्वपूर्ण ठरणार आहे. भारताला आपले सैन्य, लष्करी साधनसामुग्री यांची जलद आणि बाराही महिने वाहतूक करता येणार आहे. सामरिक दृष्ट्या आणि संरक्षणाच्या दृष्टीने या बोगद्यास अनन्यसाधारण महत्त्व आहे. हिमाचल प्रदेश तसेच लडाखमधील लाहूल व स्पिती खोऱ्यांत राहणाऱ्या लोकांसाठीही हा बोगदा फार उपयुक्त ठरणार आहे. पर्यटनाच्या दृष्टीनेही या बोगद्याचे महत्त्व आहे. अटल बोगदा हा देशातील अभियांत्रिकीचा मैलाचा दगड आहे. हा बोगदा सर्वार्थाने लडाखच्या विकासाचे प्रवेशद्वार ठरणार आहे.
रोहतांग खिंडमार्गावरील वाहतूक वाढल्यामुळे या प्रदेशातील तापमानात वाढ होऊन परिसरातील हिमनद्या वितळू लागल्या आहेत. त्याचा परिणाम येथील परिसंस्थांवर आणि एकूणच येथील पारिस्थितिकीवर होत असल्याची भिती पर्यावरणवादी व्यक्त करीत आहेत. खिंडीतील वाढत्या पर्यटनामुळे येथील प्रदूषणही वाढत आहे. कोटी गावापासून (मनाली) रोहतांग खिंडीपर्यंत रज्जुमार्ग उभारण्याचा शासन विचार करीत आहे. तसे झाल्यास वाहतूक कोंडी कमी होईल आणि वाहनांमधून उत्सर्जित होणाऱ्या कार्बनचे प्रमाणही घटेल.
समीक्षक : नामदेव गाडे