मोरवेल ही बहुवर्षायू वनस्पती रॅनन्क्युलेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव क्लेमॅटिस गौरियाना आहे. क्लेमॅटिस ट्रायलोबा या नावानेही ती ओळखली जाते. क्लेमॅटिस प्रजातीत सु. ३०० जाती आहेत. मोरवेल मूळची भारतातील असून ती नेपाळ, म्यानमार, फिलिपीन्स, श्रीलंका व इंडोनेशिया या देशांमध्ये दिसून येते. भारतात हिमालयाचा पश्चिम भाग, पंजाब व सह्याद्रीच्या पर्वतरांगा या भागांमध्ये ती आढळते. महाराष्ट्रात कोल्हापूर, सातारा, पुणे, नाशिक, औरंगाबाद व बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये आणि कोकणामध्ये मोरवेल वन्य स्थितीत आढळते.
मोरवेलीचे खोड पिंगट असून त्यावर उभ्या खोल रेषा असतात. कोवळ्या भागांवर लव असते. पाने समोरासमोर एकदा, दोनदा किंवा तीनदा विभागून पिसासारखी व संयुक्त बनतात. पर्णिका ३–७, अंडाकृती व टोकाला तीक्ष्ण असून त्यांच्या कडा दंतुर असतात. देठ लांब तणाव्याप्रमाणे आधाराभोवती गुंडाळला जाऊन कठीण बनतो व त्याच्या मदतीने वेल वर चढते. या वेलीला नोव्हेंबर-फेब्रुवारी महिन्यांत अनेक फुलोरे येतात व त्यांवर १-१·५ सेंमी. व्यासाची, लहान, पांढरी किंवा हिरवट पांढरी व सुगंधी फुले येतात. फुलांना पाकळ्या नसतात; पाकळ्यांखालची निदले चार असून ती पाकळ्यांसारखी दिसतात. पुंकेसर अनेक व सुटे असून रोमहीन असतात. अनेक लहान स्वतंत्र कृत्स्न फळांचे मिळून घोसफळ बनते. कृत्स्न फळ ३x१ मिमी. आकाराचे, केसाळ व अंडाकार असते. प्रत्येक फळावर कुक्षिवृंतांची केसाळ शेपटी असते. फळात एकच बी असते.
मोरवेल ही विषारी वनस्पती आहे. तिच्यामध्ये ॲनिमोनीन नावाचे अल्कलॉइड असते. मात्र, तिच्यात काही औषधी गुणधर्मही आहेत. तिच्या पानांपासून तयार केलेला लेप खरूज बरी होण्यासाठी वापरतात. त्वचेच्या विकारावरील औषधांमध्ये मोरवेल वनस्पतीचा वापर केला जातो.