(सांबर डिअर). स्तनी वर्गाच्या आर्टिओडॅक्टिला (समखुरी) गणाच्या मृग (सर्व्हिडी) कुलात सांबराचा समावेश केला जातो. त्याचे शास्त्रीय नाव रुसा युनिकलर असून मृगाच्या सर्व जातींमध्ये तो आकारमानाने मोठा असतो. त्याची मृगशिंगे (अँटलर) डौलदार व आकर्षक असतात. रुसा युनिकलर जातीच्या सात उपजाती आहेत. सांबरे भारत, श्रीलंका, म्यानमार, बांगला देश, फिलिपीन्स या देशांत आढळतात. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड व अमेरिका या देशांतही सांबरे आढळून येतात. सांबर ही इंग्लिश संज्ञा फिलिपीन्समधील फिलिपीन्स सांबर (रुसा मारिआना), तसेच जावा बेटातील सुंदा सांबर (रुसा टिमोरेन्सिस) यांच्यासाठीही वापरतात.

सांबर (रुसा युनिकलर) : नर आणि मादी.

सांबराचे आकारमान व रूप यांत प्रदेशानुसार बदल दिसून येतात. त्यांची खांद्यापर्यंतची उंची १०२–१६० सेंमी. आणि वजन १००–३५० किग्रॅ. असते. शरीराचा रंग पिवळसर तपकिरी ते राखाडी असतो. त्यांच्या काही उपजातींमध्ये पोटाकडील भागात आणि पार्श्वभागावर तांबूस-पिंगट खुणा असतात. त्वचा खरबरीत असून त्वचेवरील केस लांब व राठ असतात. उन्हाळ्यात त्यांचे केस गळून पडतात. शेपटी २२–३५ सेंमी. लांब असून तिचे टोक काळे असते. नराची आयाळ आखूड पण दाट असते. शिंगे फक्त नरालाच असतात आणि सु. ११० सेंमी. लांब असतात. नर मादीपेक्षा आकारमानाने मोठा असतो. वाढत्या वयानुसार नराच्या त्वचेचा रंग गडद होत जाऊन काळा होतो. मादीचा रंग नराच्या तुलनेत फिकट असतो.

सांबराची शिंगे हाडांपासून बनलेली असून भरीव व जाड असतात. पूर्ण वाढ झालेली शिंगे उन्हाळ्याच्या आधी गळून पडतात. ती गळून पडण्यासाठी नर त्यांची शिंगे झाडाला घासतात. शिंगे २-३ आठवड्यांत गळून जातात. शिंगे गळून पडल्यावर नर सुरक्षिततेसाठी लपून वावरतात. उन्हाळा संपतासंपता शिंगे पुन्हा फुटू लागतात. सुरुवातीला शिंगांवर मखमली आवरण असते. शिंगांची वाढ पूर्ण झाली की मखमली आवरण निघून जाते. रुसा प्रजातीतील सांबराची शिंगे वैशिष्ट्यपूर्ण असतात. शिंगांना सुरुवातीला दोन सारख्या लांबीच्या शाखा असतात. पूर्ण वाढ होईपर्यंत त्यांपैकी एका शाखेला दोन शाखा फुटतात. म्हणून सांबरांच्या शिंगाना तीन टोके दिसून येतात.

सांबर सामान्यपणे डोंगराळ भागातील दाट झाडीत राहतात. त्यांना कडक ऊन सहन होत नसल्याने ते संध्याकाळी अन्नासाठी बाहेर पडतात. गवत, झाडपाला, रानटी फळे, जलवनस्पती इ. त्यांचे अन्न आहे. रात्रभर ते चरतात आणि पहाट होण्याच्या सुमारास पुन्हा दाट निवासस्थानाकडे परततात. त्यांचे नाक व कान तीक्ष्ण असतात. धोक्याची जाणीव झाल्यावर ते वेगाने दाट झाडीकडे पळ काढतात. संकटकाळी ते ‘पूखSS’, ‘पूखSS’ असा आवाज काढतात. वाघ, सिंह, रानकुत्री, बिबटे, सुसर हे त्यांचे भक्षक आहेत. सांबर पाणवठ्याजवळ एकत्र वावरतात. पाणी उथळ असल्यास ते भक्षकावर प्रतिहल्ला करतात. ते उत्तम पोहू शकतात. पाण्यात असताना त्यांचे पूर्ण शरीर पाण्यात असते, तर शिंगे व डोके पाण्यावर दिसते.

सांबरांचे प्रजनन वर्षभर चालू असते. आपल्या सोईच्या व भरपूर अन्न असलेल्या प्रदेशावर हक्क मिळविण्यासाठी नरांमध्ये लढाया होतात. लढाईत विजयी झालेल्या नराला जसा त्या प्रदेशाचा ताबा मिळतो, तसेच तेथील माद्यांवरही ताबा मिळतो. नर माजावर आले की, ते मादीशी जोडी जमवितात. नर व मादी यांची जोडी जमली की, त्यांचे मीलन घडून येते. या काळात नर कळपात राहतात; परंतु माज संपल्यानंतर नर कळप सोडून एकेकटे राहतात. गर्भावधी साधारणपणे ८ महिन्यांचा असतो. मादी एका वेळेस एका पिलाला जन्म देते. माद्या व पिले कळप करून राहतात. एका कळपात सु. १६ सांबरे असून प्रौढ मादी नेतृत्व करते.

वन्य स्थितीत सांबरे सु. १२ वर्षे जगतात, तर बंदिस्त ठिकाणी सु. २८ वर्षापर्यंत जगू शकतात. त्यांच्या शिंगांचा औषधी वापर तसेच मांस यांसाठी त्यांची शिकार मोठ्या प्रमाणावर होते. सांबरांना संरक्षण मिळण्यासाठी भारत सरकारने त्यांच्या शिकारीवर कायद्याने बंदी घातली आहे.