समुद्राच्या किनाऱ्यापासून आत शिरलेला चिंचोळा फाटा वा भाग म्हणजे खाडी होय. किनाऱ्यावरील सखल भाग खचून किंवा समुद्राच्या पाण्याची पातळी वाढल्यामुळे खाडी निर्माण होते. भरतीचे पाणी खाडीत शिरते आणि त्या पाण्याबरोबर लहानमोठ्या नौका खाडीत येऊ शकतात. यामुळे खाडीच्या खोल भागाचा नौकांना आसरा म्हणून उपयोग होतो. तसेच प्रवासी व माल यांची चढउतार करण्यासाठी बंदर म्हणून त्यांचा उपयोग होतो. यूरोप, अमेरिका इत्यादींच्या दंतुर किनाऱ्यांवर अशा अनेक खाड्या आढळतात. समुद्राच्या भरतीचे पाणी नदीच्या मुखातून जेथपर्यंत आत येऊ शकते तेथपर्यंतचा नदीच्या मुखाकडील भागही खाडी म्हणून ओळखला जातो. नदी व समुद्र यांच्यामुळे होणाऱ्या झिजेमुळे खाडीचे मुख रुंद होऊन खाडी नसराळ्यासारख्या आकाराची होते. खाडीचा असा आकार नदीमुखाजवळची जमीन खचल्यानेही निर्माण होऊ शकतो. इंग्लंडमधील टेम्स, दक्षिण अमेरिकेतील प्लेट यांसारख्या नद्यांच्या मुखांजवळ विस्तीर्ण खाड्या तयार होऊन तेथे लंडनपासून ३५ किमी. वरील टूरॉक बंदर आणि अर्जेंटिनामधील ब्वेनस एअरीझ अशा मोठ्या उलाढालीची बंदरे विकास पावली आहेत. काही खाड्यांमध्ये भरपूर गाळ साचतो, तर भरतीच्या प्रवाहांमुळे काही खाड्या मोकळ्या राहतात. गुजरातमधील भंडोच बंदर नर्मदा नदीच्या मुखाजवळ आहे. एके काळी मोठी उलाढाल असलेले हे बंदर गाळाने भरून गेल्यामुळे ते आधुनिक जहाजांसाठी उपयोगी राहिले नाही. दाभोळ, मुरूड, जयगड, बाणकोट ही महाराष्ट्रातील कोकणच्या किनाऱ्यावरील बंदरे खाड्यांवरच वसलेली आहेत. अशाप्रकारे या खाड्यांचा जलमार्ग म्हणून पूर्वीपासून उपयोग होत आहे.
खाडीजवळचा प्रदेश डोंगराळ असल्यास चाचे लोक व चोरटा व्यापार करणारी मंडळी यांना या प्रदेशामुळे संरक्षण व आसरा मिळतो. कधी कधी दोन मोठे सागरी विभाग जोडणाऱ्या आणि सामुद्रधुनीपेक्षा रुंद व विस्तीर्ण असलेल्या समुद्राच्या विशिष्ट भागालाही खाडी म्हणतात. उत्तर समुद्र व अटलांटिक महासागर यांना डोव्हर सामुद्रधुनीद्वारे जोडणारी इंग्लिश खाडी, तसेच अंदमान निकोबार बेटांदरम्यान असलेली १०° खाडी ही अशा खाडीची उदाहरणे आहेत.
अनेक नद्यांच्या पाण्यात गाळ व मातीचे सूक्ष्मकण तरंगत जात असतात. असे पाणी समुद्राच्या पाण्यात मिसळते तेव्हा समुद्राच्या पाण्यातील लवणांमुळे नदीच्या पाण्यातील तरंग कण एकत्रित येतात व घट्ट होतात. असे घट्ट कण खाली जाऊन साचत राहतात. यामुळे खाडीत साचलेल्या गाळात मातीचे थर अधूनमधून आढळतात. समुद्रात शिरलेल्या नदीच्या पाण्यातील सूक्ष्मकणांची माती समुद्रप्रवाहाबरोबर निघून जाते; मात्र खाडीत तिला आडोसा मिळाल्याने ती तेथे टिकून राहते.
इंग्रजीतील चॅनेल, क्रीक, एस्च्युअरी, फर्थ यांच्यासाठी मराठीमध्ये खाडी हीच एक संज्ञा वापरली जाते. हिंदी भाषेत पुष्कळ वेळा गल्फ (आखात), बे (उपसागर) या अर्थानेही खाडी हा शब्द वापरला जातो. फ्योर्ड हा समुद्राचा लांब व चिंचोळा भाग असून तो खाडीपेक्षा वेगळा ओळखला जातो.
समीक्षक : वसंत चौधरी