सातवाहनकालीन बौद्ध धर्मातील थेरवाद (हीनयान) पंथीय लेणी. संख्येच्या दृष्टीने हा भारतातील सर्वांत मोठा लेणी–समूह आहे. जुन्नर हे ठिकाण पुण्यापासून ९० किमी. अंतरावर कुकडी नदीकिनारी वसले असून अवतीभोवती सुमारे आठ-दहा किमी. च्या परिघात मानमोडी, शिवनेरी, मांगणी, हातकेश्वर, लेण्याद्री, दुधारे इ. टेकड्यांनी वेढलेले आहे. यांतील काही टेकड्यांत प्राचीन बौद्ध लेणी खोदली आहेत.

लेणी-समूह, जुन्नर.

जुन्नर येथील लेणी समूहांना वेळोवेळी अनेक यात्रेकरूंनी भेटी दिल्या. यांमध्ये इंग्रज वैद्य जॉन फ्रायर (सतराव्या शतकाचा उत्तरार्ध) व तत्कालीन मुंबईचे गव्हर्नर लॉर्ड एल्फिन्स्टन (१८१४) यांचा प्रामुख्याने नामनिर्देश करता येईल. या लेण्यांचा अभ्यास जॉन विल्सन (१८५१), जेम्स बर्जेस (१८७४, १८७७ व १८८०), विद्या दहेजिया (१९७२), सुरेश जाधव (१९८०, १९८२, १९८६, २०००), एस. नागराजू (१९८१), म. के. ढवळीकर (१९८४), अ. प्र. जामखेडकर (२००२), शोभना गोखले (२०१९) इ. पुरातत्त्वज्ञांनी केला. सुरेश जाधव यांनी जुन्नर परिसरातील सर्व समूहांचा स्वतंत्रपणे एकत्रित, सखोल व विस्तृत अभ्यास करून १९८० साली आपला पीएच. डी. प्रबंध सादर केला.

जुन्नर लेणींचे साधारणतः नऊ समूह पाडता येतात. यांमध्ये भीमाशंकर, अंबा-अंबिका व भूतलेणी हे मानमोडी टेकडीवर; शिवनेरी पूर्व, शिवनेरी दक्षिण व शिवनेरी पश्चिम हे शिवनेरी किल्ला असलेल्या टेकडीवर; तर गणेश लेणी व तिच्या पूर्वेकडील समूह हे दोन समूह लेण्याद्री टेकडीवर खोदले आहेत. तुळजा लेणी हा स्वतंत्र समूह शिवनेरी किल्ल्याच्या पलीकडे आहे.

जुन्नर परिसरात एकूण १८४ लेणी खोदली आहेत. यांपैकी १० चैत्यगृह असून उर्वरित विहार, मंडप व भिक्षुंसाठीच्या ध्यान-गुंफा आहेत. या सर्व लेण्यांच्या परिसरात एकूण ११५ पाण्याची टाकी (पोढी) आहेत. यांशिवाय २५ अपूर्ण लेणी ज्यांना विशिष्ट आकार नाही, परंतु खोदण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते, अशी आहेत. जुन्नर येथील काही लेणी अपूर्ण असली तरी त्यांचा विशिष्ट आकार व त्यांचे प्रयोजन याची कल्पना येते. अशाप्रकारे जुन्नर परिसरात एकूण ३२४ लेणी किंवा लयनस्थापत्याशी संबंधित खोदकाम केल्याचे आढळून येते. अलीकडच्या काळात तुळजा लेणी समूहात काही अर्धवट बुजलेली लेणी प्रकाशात आली आहेत. याशिवाय जुन्नर परिसरातील टेकड्यांत आणखी काही लेणी व पाण्याची टाकी असण्याची शक्यता आहे.

जुन्नर लेणींत एकूण ३७ शिलालेख कोरण्यात आले आहेत. ते सर्व ब्राह्मी लिपीत असून त्यांची भाषा प्राकृत आहे. या लेखांत प्रामुख्याने कोणी व कशासाठी दान दिले याचा उल्लेख आला आहे. शिलालेखांतील समाविष्ट असलेल्या गोष्टींवरून तत्कालीन सामाजिक, आर्थिक, धार्मिक जीवनाचा प्रत्यय येतो. तसेच इ. स. पहिल्या-दुसऱ्या शतकांत क्षत्रपांचा जुन्नरशी आलेला संबंध कळून येतो. कार्ले व शिवनेरी दक्षिण येथील शिलालेखांच्या आधारे ढवळीकरांनी जुन्नरचे प्राचीन नाव ‘धेनुकाकट’ असावे, असे सुचविले आहे. सुमारे दहाव्या शतकात जुन्नरचे नाव ‘जीर्णनगर’ म्हणून प्रचलित असावे, असे इ. स. ९६५ च्या एका ताम्रपटावरून लक्षात येते.

जुन्नर परिसरातील लेणी सर्वसाधारणपणे इ. स. पू. पहिल्या शतकाच्या मध्यापासून ते इ. स. च्या दुसऱ्या शतकाअखेरपर्यंत खोदण्यात आली असावीत, असे सुरेश जाधव व म. के. ढवळीकर यांचे मत आहे. तर एस. नागराजू यांच्या मते, जुन्नर परिसरातील लेणी ही इ. स. पू. दुसरे-तिसरे शतक ते इ. स. दुसऱ्या शतकांदरम्यान खोदली गेली असावीत. अ. प्र. जामखेडकर देखील एस. नागराजू यांच्या मताच्या जवळ आहेत. जुन्नर परिसरात लेणी खोदण्यास केव्हा सुरुवात झाली याविषयी पुरातत्त्वज्ञांमध्ये एकवाक्यता नसली, तरी त्यांच्या खोदण्याच्या क्रमाबाबत मात्र एकवाक्यता दिसून येते. पुरातत्त्वज्ञांनी ही क्रमवारी लयन स्थापत्याचा तौलनिक अभ्यास, शिल्पे, पुराभिलेख व चित्रांच्या आधारे निश्चित केली आहे. यानुसार तुळजा लेणी समूहातील काही लेणी सर्वप्रथम खोदण्यात आली. या लेणी पूर्वहीनयान कालखंडातील लेणी (Early Hinayana Caves) समजली जातात. या व्यतिरिक्त जुन्नर परिसरातील इतर सर्व लेणी ही उत्तर हीनयान कालखंडातील लेणी (Late Hinayana Caves) समजली जातात.

जुन्नर येथील चैत्यगृहांचे साधारणपणे चार प्रकार सांगितले जातात. त्यांमध्ये १. वर्तुळाकारमध्ये स्तूप व त्याच्या सभोवताली स्तंभ, २. गजपृष्ठाकृती छत व चापाकार तलविन्यास, दर्शनी भागावर चैत्यगवाक्ष, आत मागील बाजूस स्तूप व मागील व दोन्ही बाजूंस स्तंभांची रांग (गजपृष्ठाकृती छत अपूर्ण राहिलेल्यांत स्तंभ येत नाहीत) ३. दर्शनी स्तंभ, आतील आलेख चौरस, मध्ये स्तूप व सपाट छत, ४. यातही दर्शनी स्तंभ, आत काटकोनात मंडप किंवा सभागृह, मागील बाजूस स्तूप व सपाट छत. ढवळीकरांनी सर्वसाधारणपणे चैत्यगृहांचा क्रम, तुळजा लेणीतील लेणे क्र.३ (इ. स. पू. पहिले शतक), गणेश लेणीच्या पूर्वेकडील चैत्यगृह (इ. स. ५०-७०), भूत लेणीतील लेणे क्र. ४० (इ. स. ८०-१००), गणेश लेणीतील लेणे क्र. ६ (इ. स. ११०), अंबा-अंबिका लेणीतील लेणे क्र.२६ (इ. स. १२०), भीमाशंकर लेणीतील लेणे क्र. २ (इ. स. १४०), गणेश लेणीतील लेणे क्र. १४ (इ. स. १५०), शिवनेरी पूर्व लेणीतील लेणे क्र.२ (इ. स. १६०), शिवनेरी दक्षिण लेणीतील लेणे क्र. ५९ (इ. स. १७०) व शिवनेरी पूर्व लेणीतील लेणे क्र. ४८ (इ. स. १८०) याप्रमाणे ठरविला आहे.

इ. स. पहिल्या शतकाच्या उत्तरार्धात जुन्नर येथे खोदण्यात आलेल्या चैत्यगृहांबरोबरच चैत्यगृहस्थापत्य विकासाच्या नव्या टप्प्याचा प्रारंभ झाल्याचे मानण्यात येते. हा नव्या प्रकारचा विकास मानमोडी येथील लेणे क्र. २६ आणि गणेश लेणी येथील लेणे क्र. ६ या दोन चैत्यगृहांच्या स्वरूपात साकार झाल्याचे दिसते. चैत्यगृहाचा सभामंडप आणि मुखभाग यांवरील तपशीलवार बारीकसारीक कोरीवकाम मागे पडत जाणे आणि या टप्प्याच्या सुरुवातीला जरी गजपृष्ठाकार छत असले तरीही हळूहळू टप्प्याच्या नंतरच्या अवस्थेत पूर्णपणे नाहीसे होणे, ही या टप्प्यातील स्थापत्याची प्रमुख वैशिष्ट्ये सांगता येतात. मानमोडी येथील लेणे क्र. २ च्या मुखभागावर चैत्यगवाक्षाद्वारे छत सूचित केले असले, तरी प्रत्यक्ष छत मात्र पूर्णतः सरळ आणि सपाट आहे. हे वैशिष्ट्य पारंपरिक तंत्रज्ञान मागे पडल्याचेच द्योतक आहे, असे अ. प्र. जामखेडकर यांचे मत आहे.

जुन्नर येथील विहारांचे मुख्यतः दोन प्रकार सांगितले जातात. पहिल्यात प्रथम ओसरी, ओसरी स्तंभासह किंवा स्तंभरहित, एक प्रवेशद्वार, क्वचित त्याच्या दोन्ही बाजूंस खिडक्या, आत चौरस मंडप, मंडपाच्या मागील व बाजूंच्या भिंतींत भिक्षूंना झोपण्यासाठी खोल्या, त्यांत काहीत दगडी बाकांची व्यवस्था, काहीत खोल्यांच्या समोर तिन्ही बाजूंस दगडी बाक आणि सपाट छत. दुसरा प्रकार अगदी साधा आहे. त्यात प्रथम छोटीसी ओसरी, प्रवेशद्वाराच्या आत चौरस मंडप, सपाट छत, क्वचित मागील व बाजूंच्या भिंतींत दगडी बाक आणि सपाट छत. लेण्यांत ठिकठिकाणी रंगकाम व चित्रे रेखाटल्याचे पुरावे आढळून येतात. अनेक लेण्यांना लागून अगर जवळपास पाण्यासाठी टाकी खोदण्यात आली आहेत.

जुन्नर लेणींचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे सर्वप्रथम या ठिकाणी ‘मंडप’ नावाचा नवीन वास्तूप्रकार उदयास आला. यांचा उपयोग विशेषतः सामूहिक पूजा-विधी, बैठका इ. गोष्टींसाठी होत असावा. शिवनेरी लयनसमूहातील लेणे क्र. ६४ मधील एका शिलालेखात ‘भोजनमंडप’ उभारल्याचा उल्लेख आहे. गणेश लेणी येथील लेणे क्र. २१ व २३ चा उपयोग भोजनमंडप म्हणून केला जात असे. याशिवाय जुन्नर येथे ध्यान साधनेसाठी खोल्या, आसन, कोढी इ. वास्तूघटक खोदण्यात आले आहेत. गणेश लेणी येथील लेणे क्र. २, १०, १२, १३, १७, १८, २४, २६,२७ व २९ तसेच शिवनेरी दक्षिण समूहात लेणे क्र. ५५, ५६, ६०, ६१, ६६ व ६९ यांच्या आकारावरून यांचा उपयोग ध्यान साधनेसाठी केला असावा, असे दिसते. शिवनेरी, मानमोडी व गणेश लेण्यांत कोढी (कोनाडे) आढळून येतात.

तिसऱ्या शतकानंतर सदर लेण्यांचे खोदकाम थांबल्याचे दिसून येते. महायान पंथीयांनीही येथे विशेष रुची दाखवली नसल्याचे स्पष्ट होते. त्यानंतर बौद्ध भिक्षू व बौद्ध धर्माचा प्रभाव ओसरल्याने बराच काळ ह्या लेणी दुर्लक्षित व उपेक्षित राहिल्या. पुढे जुन्नर परिसरात हिंदू व जैन धर्मांचे प्राबल्य वाढीस लागल्याचे जुन्नर येथील शिल्पे व इतर अवशेषांवरून दिसून येते. सुमारे बाराव्या शतकात अंबा-अंबिका येथील लेणे क्र. ३० मध्ये काही जैन शिल्पे कोरण्यात आली, तर संभवतः सतराव्या-अठराव्या शतकांत शिवनेरी पूर्व, तुळजा लेणी व गणेश लेणी येथील काही लेण्यांत हिंदू देव-देवतांची स्थापना झाल्याचे दिसून येते.

संदर्भ :

  • Dehejiya, Vidya, Early Buddhist Rock Temples: A Chronological study, London, 1972.
  • Dhavalikar, M. K., Late Hinayana Caves of Western India, Pune, 1984.
  • Fergusson, J. & Burgess, J. The Cave Temples of India, London, 1880.
  • Jadhav, Suresh V. Rock-cut Cave Temples at Junnar-An Integrated Study, Ph.D. Thesis submitted to the University of Poona, 1980.
  • Nagraju, S. Buddhist Architecture of Western India, Delhi, 1981.
  • जाधव, सुरेश वसंत, जुन्नर-शिवनेरी परिसर, पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालये विभाग, महाराष्ट्र शासन, मुंबई, १९८२.
  • जामखेडकर, अ. प्र. संपा., महाराष्ट्र : इतिहास-प्राचीन काळ (खंड-१ भाग-२) स्थापत्य व कला, दर्शनिका विभाग, सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन, मुंबई, २००२.

                                                                                                                                                                           समीक्षक : मंजिरी भालेराव