लसूण ही बहुवर्षायू वनस्पती ॲमारिलिडेसी कुलाच्या ॲलिऑयडी उपकुलातील असून तिचे शास्त्रीय नाव ॲलियम सटायव्हम आहे. कांदा, खोरट व चिनी कांदा या वनस्पतीही ॲलियम प्रजातीतील आहेत. लसूण मूळची मध्य आशियातील असावी. इ.स.पू. ५०००–३५०० या काळात ईजिप्तमध्ये त्याचा वापर आहारामध्ये आणि औषधांमध्ये केल्याचा उल्लेख आहे. ॲलियम सटायव्हम या जातीच्या ॲलियम सटायव्हम सटायव्हम आणि ॲलियम सटायव्हम ऑफिओस्कोरोडॉन या दोन उपजाती असून त्यांमध्ये दहा गट आणि शंभरापेक्षा अधिक वाण आहेत.
लसूण वर्षायू वनस्पतीप्रमाणे वाढवितात. तिचे खोड भूमिगत असून ते कांद्यापेक्षा लहान असते. खोडाचा मांसल भाग पानांच्या बगलेतील कळ्यांचा असतो. त्यांना पाकळ्या किंवा कुड्या म्हणतात. सामान्यपणे लसूण म्हणून जे खाल्ले जाते ते भूमिगत खोड असून त्याला कंद किंवा गड्डा असेही म्हणतात. या कंदावर पातळ, पांढरी किंवा जांभळी छटा असलेले आवरण असते. जमिनीवर वाढलेली पाने मूलज म्हणजे मुळांपासून आली आहेत असे भासतात. ती हिरवी, साधी, रेषाकृती, सपाट व गवतासारखी टोकदार असून त्यांना विशिष्ट गंध असतो. फुले पांढरी असून देठ असलेल्या व गोलसर चवरीसारख्या फुलोऱ्यात (चामरकल्प पुष्पविन्यासात) लांब छदाच्या दांड्यावर येतात. त्यांना उग्र वास असतो. फुले द्विलिंगी व त्रिभागी असून त्यात परिदलपुंजांची व पुंकेसरांची दोन-दोन मंडले असतात. फळात (बोंडात) अनेक व सपुष्क म्हणजे गर्भाबाहेर अन्नांश असलेल्या काळ्या बिया असतात.
लसणाची पाकळी कुसकरली असता ॲलिसीन नावाचे सल्फरयुक्त संयुग निर्माण होऊन पाकळीला वास येतो. तसेच लसणाची पाकळी खाल्ली असता शरीरात ॲलिल मिथिल सल्फाइड नावाचे संयुग तयार होते. त्याचा वास दीर्घकाळ शरीरात राहत असल्यामुळे लसूण खाल्ल्यानंतरही बराच वेळ तोंडाला वास येत राहतो. भारतात आहारामध्ये तसेच औषधांमध्ये लसूण उपयुक्त मानला जातो. स्वयंपाकात भाजीला चव आणण्यासाठी लसूण तसेच त्याचे वाटण वापरतात. लसूण उष्ण व उत्तेजक असून ताप, कफ आणि इतर व्याधींवर त्याचा वापर केला जातो. श्वासनलिकादाह, दमा, न्यूमोनिया इत्यादी आजारांत तो गुणकारी असतो. लसणाच्या नियमित सेवनाने प्राणी आणि मनुष्य यांच्या रक्तवाहिन्यांत जमा झालेले कोलेस्टेरॉलाचे प्रमाण कमी होते, असे प्राथमिक संशोधनातून दिसून आले आहे. लसणाची लागवड जगात सर्वत्र केली जाते. जागतिक स्तरावर चीन, भारत, दक्षिण कोरिया, ईजिप्त आणि रशिया हे देश लसणाच्या उत्पादनात आघाडीवर आहेत.