रायगड जिल्ह्यातील बौद्ध (थेरवाद) लेणी-समूह. या लेणी ‘नाडसूर लेणी’ या नावानेही ओळखल्या जातात. वास्तविक पाहता ही लेणी ठाणाळे गावाच्या हद्दीत असून ती येथून जवळही आहेत. परंतु सुरुवातीच्या काळात संशोधक नाडसूरमार्गे तेथे पोहोचल्यामुळे ‘नाडसूर’ हे नामाभिधान रूढ केले होते. ही लेणी पाली-सुधागडपासून वायव्येस सुमारे २७ किमी. अंतरावर आहेत. पालीहून ‘पेडली’ १० किमी. व तेथून ठाणाळ्यापर्यंत ७ किमी. अंतर पार करून आल्यानंतर पुढे पायवाटेने डोंगरात सुमारे ५ किमी. वर घनदाट जंगलात ही लेणी खोदली आहेत. येथे पोहोचण्यासाठी खोपोली-पाली हा मार्गही सोईस्कर आहे.
ठाणाळे लेणी सर्वप्रथम जे. ॲबट यांनी १८९० साली पाहिली. त्यानंतर कझिन्स यांनी या लेणींना भेट देऊन १८९१ मध्ये द केव्स ॲट नाडसूर अँड खडसांबला ही पुस्तिका प्रसिद्ध केली. यानंतर ग. ह. खरे (१९४५), ल्यूडर (१९१२), मो. ग. दीक्षित (१९४२), विद्या दहेजिया (१९७२), म. न. देशपांडे (१९८१), म. के. ढवळीकर (१९८४) इ. संशोधकांनी या लेणींवर कमी-अधिक प्रकाश टाकला.
म. न. देशपांडे यांनी, नाशिकच्या पांडू लेणीतील एका शिलालेखात उल्लेखिलेला ‘सिरिटन’ पर्वत म्हणजेच आजचे ठाणाळे असावे, असा तर्क लावला आहे. यासाठी त्यांनी ठाणाळे लेणीत असणाऱ्या ‘श्री’ म्हणजे लक्ष्मीच्या चार शिल्पांचा दाखला दिला आहे. या परिसरात ‘खडसांबले’ व ‘गोमाशी’ या नावाची इतर लेणीही आहेत.
ठाणाळे येथे एकूण २३ लेणी पश्चिमाभिमुख असून त्यांत एक चैत्यगृह व एक स्मारक स्तूप-समूह (Memorial stupa complex) आहे. उर्वरित २१ लेणी भिक्षूंच्या निवासासाठी होती. कझिन्सने मात्र येथील एकूण लेणींची संख्या १८ सांगितली आहे. येथील प्रस्तरामध्ये एक लाल रंगाचा ठिसूळ पट्टा (bole) आल्याने लेण्यांत आवश्यक फेरफार केल्याचे दिसून येते. या लेणींचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे इ. स. पाचव्या शतकानंतर ही लेणी बौद्ध भिक्षूंनी सोडून दिली व तेव्हापासून ती कोणीही उपयोगात आणली नाहीत. या लेण्यांत म. न. देशपांडे यांना इ. स. पू. दुसऱ्या शतकापासून ते इ. स. पाचव्या शतकापर्यंत उपयोगात आलेल्या काही वस्तू तशाच धुळी-मातीत गाडल्या गेलेल्या आढळून आल्या.
ठाणाळे लेणी क्र. ३ मध्ये एकानंतर एक कोरलेले सहा एकाश्म स्मारक-स्तूप, कोनाड्यातील दोन व पाच दगड-मातीचे बांधीव असे एकूण तेरा स्तूप नोंदविले गेले आहेत. या लेण्यात चांदीची सात आहत नाणी, मातीचे भांडे व मातीचा प्रतीकात्मक स्तूपही आढळून आला होता. या लेण्यातील स्तूपांचा बदलत जाणारा आकार, शैली, अलंकरण व स्तूपांच्या सहज प्रत्ययास येणाऱ्या क्रमांकांवरून साधारणपणे पाच वेळा येथे फेरबदल झाल्याचे मत म. न. देशपांडे यांनी मांडले आहे. त्यांनी या स्मारकस्तूपांचा काळ सुमारे इ. स. पू. दुसरे-तिसरे शतक ते इ. स. पहिले-दुसरे शतक असा सर्वसाधारणपणे ठरविला आहे. या लेण्यात सुरुवातीस एक प्रतीकात्मक अलंकरणविहीन स्तूप व त्यामागे एक भिक्षुगृह कोरले गेले. त्यानंतर थोड्याच कालावधीत दक्षिणेच्या बाजूस लेणी वाढवून पहिल्या स्तूपाच्या जोडीला दुसरा एकाश्म स्तूप खोदला गेला. या बौद्ध विहारातील आणखी काही भिक्षू मरण पावल्यावर त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आणखी दोन स्तूप निर्माण केले गेले. यासाठी ही लेणी उत्तरेकडे रुंद करण्यात आली. यानंतरच्या काळात स्तूप क्र. १ च्या मागे असलेले भिक्षुगृह काढून टाकून त्याच्या थोडे दक्षिणेस एकानंतर एक असे अलंकरण केलेले दोन स्तूप खोदले गेले. चौथ्या अवस्थेत भिक्षुगृहाजवळील दक्षिणेकडील भिंतीवर एक वेदिका, चैत्यगवाक्ष आदींनी अलंकृत असा कोनाडा करून त्यात स्तूप कोरला गेला. याचा दर्शनी भाग अजिंठ्याच्या क्र. ९ च्या चैत्यगृहाच्या दर्शनी भागाशी मिळताजुळता आहे. यानंतर असाच एक, पण नक्षीविरहित अर्धगोलाकृती कोनाडा दक्षिणेकडील भिंतीत कोरला गेला. त्यामधील स्तूप अपूर्ण आहे. यानंतर जागा शिल्लक नसल्याने आवश्यकतेनुसार दगडमातीचे बांधीव स्तूप उभारण्यात आले होते. स्मृतिस्तूप खोदण्याची व उभारण्याची अशी परंपरा पितळखोरा, भाजा व कान्हेरी येथेही दिसून येते.
लेणे क्र. ७ हे लेणी-समूहाच्या साधारण मध्यभागी खोदले असून चैत्यगृहास जोडून आहे. हा एक विहार असून समूहातील सर्वांत विस्तीर्ण असा आहे. याच्या रचनेवरून मूळचा लहान विहार नंतरच्या काळात मोठा केल्याचे दिसून येते. मुळात या लेण्यात स्तंभविरहित मंडप होता व त्याच्या दोन्ही बाजूंस दोन भिक्षुगृहे होती. त्यानंतर या मंडपात ७ नवी भिक्षुगृहे खोदण्यात आली. उंचावर व पुढे ओटा असलेल्या या भिक्षुगृहांत प्रवेश करण्यासाठी तीन छोटे सोपान कोरले गेले. उत्तरेकडील भिंतीत चैत्यकमान (Chaitya arch) असलेल्या कोनाड्याच्या वर एका बाजूला इ. स. पू. सु. पहिल्या शतकातील ब्राह्मी लेख आहे. जवळच भिक्षुगृहाच्या दरवाजाच्या वर चैत्यगवाक्षामध्ये एक शिल्पपट आहे. त्यात मध्यभागी वेदिकापट्ट, हर्मिकायुक्त अर्धोत्कीर्ण स्तूप असून त्यास एका बाजूस पुरुष व दुसऱ्या बाजूस स्त्री हातात फुले घेऊन पूजा करीत असल्याचे दाखविले आहे. भिक्षुगृहांमध्ये शयन ओटा असून दरवाजाच्या उजव्या बाजूस वरच्या भागात जाळीदार खिडकी आहे. पूर्वेच्या भिंतीत असलेल्या चार भिक्षुगृहांत एक चैत्यकमान असलेला चौकोनी कोनाडा, त्यानंतर भिक्षुगृहाचे द्वार, अशा तऱ्हेने चार कोनाडे व चार द्वारे, प्रत्येक भिक्षुगृहात शयन ओटा व जाळीदार खिडकी व द्वारशीर्षावर अंतरा-अंतराने चैत्याकृती गवाक्ष व काही ठिकाणी शिल्पपट अशी योजना दिसते. या लेण्यातील शिल्पांमध्ये पंचफणायुक्त नागाची दोन शिल्पे, समोरासमोर उभे दोन बैल, सोंडेत कमळ पकडलेला हत्ती, समोरा-समोरील वशिंड व शिंगयुक्त बैल, कमळ उचलणारा हत्ती, गजलक्ष्मीची दोन शिल्पे, दंपतीचे पट, सिंहीण व तिचा छावा इ. शिल्पे कोरली आहेत. या लेण्यामध्ये जागोजागी रंगकामाचे अवशेषही दिसून येतात. मूळच्या विहारातील छतावर एक उत्कीर्ण व रंगीत छत्र आहे. या छत्रावर कमळाची सुंदर नक्षी आहे. या विहाराचा दर्शनी भाग बहुधा लाकडी प्रवेशद्वारे व वातायने आदींनी युक्त असावा, असे दिसते.
लेणे क्र. ८ हा चैत्यगृह (७.३३ x ४.८१ मी. व ४.५८ मी. उंच) स्तंभ-विरहित व गजपृष्ठाकृती असून त्याचा दर्शनीभाग मुळात खुला होता व त्याला पूर्वी प्रवेशद्वार असल्याचे दिसून येते. चैत्यगृहातील दक्षिणेकडील भिंतीच्या वरच्याभागी एक दानलेख कोरला आहे. या चैत्यगृहातील अर्धगोलाकृती अंतर्भागात मध्यभागी वेदिका-अलंकरण विरहित स्तूप असून अधिष्ठानावर एक खाच आहे. ज्या खाचेवर अंड कोरले आहे. अंडाच्या वर हर्मिकेसाठी खाच असून त्याच्या खाली धातू ठेवण्यासाठी खड्डा आहे. या स्तूपावर जाड गिलावा होता व नंतरच्या काळात स्तूपाच्या समोर एक बांधीव ओटाही केला होता आणि या ओट्यासह स्तूपावर दुसऱ्या रंगीत गिलाव्याचा लेप होता. या चैत्यगृहाचा काळ इ. स. पू. तिसरे व दुसरे शतक असावा, असे म. न. देशपांडे यांचे मत आहे. परंतु ढवळीकरांच्या मते, या लेण्याचे विधान व स्तंभविरहीत लेणे पाहता हा स्तूप इ. स. पहिल्या शतकाच्या उत्तरार्धात कोरला असावा.
ठाणाळे लेणी-समूहातील इतर सर्व भिक्षुगृहे सामान्यतः ‘द्विगर्भ’ किंवा ‘त्रिगर्भ’ म्हणजेच दोन किंवा तीन भिक्षूंसाठी कोरली होती आणि हीच भिक्षुगृहे पाचव्या शतकात महायान भिक्षूंनी वापरली असता त्यांनी तेथे बुद्ध-बोधिसत्त्व शिल्पे न कोरता भिंतीवर गिलावा लाऊन त्यावर चित्रे रंगविली. अशीच महायान काळातील चित्रे भाजा, पितळखोरे आणि अजिंठा येथील क्र. ९ व १० येथील चैत्यगृहांत दिसतात.
लेणे क्र. १५ उंचावर खोदलेले लेणे थोडे अपूर्ण असले तरी महत्त्वाचे आहे. यामध्ये पाठीमागील भिंतीत दोन भिक्षुगृहे आहेत व दर्शनी भागी भिंतीवर दोन्ही भिक्षुद्वारांच्या मध्ये एक उत्कीर्ण स्तूप कोरला आहे. तसेच लेण्यात प्रवेश करताना व्हरांड्याच्या समोर असलेल्या व आता पडझड झालेल्या तिसऱ्या भिक्षुगृहाच्या दारावर गजलक्ष्मी कोरली आहे. विहारामध्ये असलेले स्तूपाचे शिल्प ही विहारातील एक वैशिष्ट्यपूर्ण प्रगती दर्शविते. अशाच तऱ्हेची स्तूप स्थापना नाशिक येथील विहारात दिसते व ही इ. स. पहिल्या-दुसऱ्या शतकात केली असावी. येथे माशावर आरूढ दांपत्याचे शिल्पही कोरलेले आहे. क्र. १६ व १७ या लेण्यांमधील पाण्याच्या टाकीवर ती दान दिल्याचा उल्लेख असणारा ब्राह्मी लेख कोरला आहे.
म. न. देशपांडे यांच्या मते, ठाणाळे लेणी भाजा लेणीच्याही पूर्वी खोदली गेली असावीत. तसेच या लेण्यांत कमीतकमी पाच वेळा परिवर्धन, बदल, उत्खनन व रंगलेपन केले असावे. पाचव्या शतकानंतर ‘चौल’ बंदराचे महत्त्व काहीसे कमी झाले असावे व मावळात जाणारा मार्ग बदलला गेल्याने ही लेणी विस्मृतीत गेली असावीत.
संदर्भ :
- Cousens, H. ‘An account of the Caves at Nadsur and Kharsambla’, ASWI (Vol.XII), Bombay, 1891.
- देशपांडे, म. न. ‘ठाणाला बौद्ध लेणी: स्थापत्य व कला’, विदर्भ संशोधन मंडळ वार्षिक, नागपूर, १९८१.
समीक्षक : मंजिरी भालेराव