येशू हा जन्माने यहुदी होता. ‘धर्म’ स्थापन करण्यासाठी मी आलो आहे, असे विधान त्याने चुकूनही केले नाही. त्याच्या शिकवणुकीला ‘ख्रिस्ती’ हे नावही त्याने कधी दिले नाही. त्याने धर्मग्रंथ लिहिला नाही. स्वत:चा देश सोडून तो त्याच्या देशाबाहेर कधी गेला नाही. आशिया खंडात, तेव्हाच्या पॅलेस्टाइन भूमीमध्ये तो जन्माला आला. वस्तुस्थिती ही अशी असली, तरी आपल्या स्वर्गारोहणाच्या दिवशी आपल्या प्रेषितांना एका टेकडीवर एकत्र जमवून त्याने त्यांना सांगितले, ‘‘जगाच्या अंतापर्यंत जा आणि माझी सुवार्ता सर्वत्र घोषित करा’’ (बायबल, ‘मत्तय’ २८:१९-२०). जो स्वत: आपल्या देशाबाहेर कधी गेला नव्हता त्याने आपल्या शिष्यांना मात्र वेगवेगळ्या देशांत जाण्याचा आदेश दिला आणि घडलेदेखील नेमके तसेच. येशू स्वर्गात गेल्यानंतर त्याची शिकवण देण्यासाठी त्याचे शिष्य देशोदेशी गेले. गावोगावी निघाले. येशू म्हणाला होता, ‘मार्ग, सत्य व जीवन मीच आहे’, येशू हा ‘मार्ग’ त्यांना गवसला होता व तो ‘मार्ग’ ते जगाला दाखवत चालले होते, म्हणून त्यांच्यामागे निघालेल्या अनुयायांना उद्देशून ‘नवमार्गी’ असे साधेसुधे नाव त्यांना मिळाले. पुढे सिरियाची राजधानी अँटिओक या नगरीत ‘ख्रिस्ताचे अनुयायी’ या नात्याने त्यांना ‘ख्रिस्ती’ हे त्रोटक नाव मिळाले (बायबल, प्रेषितांची कृत्ये ११:२६). थोडक्यात, येशू ख्रिस्ताच्या शिकवणुकीचा ज्यांनी ज्यांनी अंगीकार केला, पवित्र आत्म्याठायी ज्यांनी बाप्तिस्मा स्वीकारला, तसेच ज्यांनी आपल्या अंत:करणात ख्रिस्त जपून ठेवला व आम्ही ख्रिस्ताचे आहोत, असे आपल्या ओठांनी ज्यांनी प्रकट केले, अशा मंडळींना ‘ख्रिस्ती’ असे म्हटले जाऊ लागले.
येशूने निवडलेले प्रेषित हेदेखील येशूप्रमाणे धर्माने यहुदी होते आणि त्यांचे सुरुवातीचे अनुयायीदेखील पूर्वाश्रमीचे यहुदीच होते. लवकरच ‘नव्या मार्गाने जाणारे यहुदी’ व ‘जुन्या मार्गाने वाटचाल करणारे यहुदी’ यांच्यात साहजिकच खडाजंगी व्हायला सुरुवात झाली. त्यात यहुदी लोकांबरोबरच यहुदीतर मंडळीही ख्रिस्ती धर्माचा स्वीकार करू लागली. त्यांनी बाप्तिस्मा घेऊन थेट ख्रिस्ती धर्मात पदार्पण करावे की प्रथम सुंता करून यहुदी व्हावे व मग ख्रिस्ती धर्मात यावे, याबद्दलही वाद झाले. प्रकरणे एकमेकांचे बळी घेण्यापर्यंत जाऊन पोहोचली. त्यांत प्रथम बळी गेलेल्या एका नवतरुणाचे नाव होते स्टीफन. या स्टीफनला दगडधोंड्यांनी ठेचण्यात आले. मारेकऱ्यांचा एक म्होरक्या होता तार्सूस गावचा परुशी मंडळीतील (ख्रिस्तपूर्व कर्मठ यहूदी लोकांचा वर्ग) सॉल (शौल).
हाच सॉल जेरूसलेममधील यहुदी उच्च धर्माधिकाऱ्याचा लेखी परवाना आपल्या खिशात घेऊन दुसऱ्यांना धर्मांतरापासून परावृत्त करण्यासाठी सिरियामधील दमास्कस (दिमिष्क) या नगरीत चालला होता. दमास्कस नगरीच्या टापूत प्रवेश करताच स्वर्गातून तेजस्वी प्रकाश त्याला दिसला. त्या लख्ख प्रकाशझोताने तो धाडकन जमिनीवर कोसळला. सॉलला साक्षात्कार झाला. पुनरुत्थित झालेला नाझरेथकर येशू त्याच्याशी बोलला. सतत तीन दिवस सॉलला अंधत्व आले (बायबल, प्रेषितांची कृत्ये ९:१-१०).
सॉलला बाप्तिस्मा देण्यासाठी अनानियस नावाचा एक धर्मनिष्ठ माणूस देवाने दमास्कस नगरीत पाठवला. बाप्तिस्मा स्वीकारल्यानंतर सॉलचा (Soulus) झाला पॉल (Paulus) (बायबल, प्रेषितांची कृत्ये १३:९, ७:५८, ८:१, ‘रोमकरांस’ १:१). त्याला दृष्टी प्राप्त झाली आणि ‘सॉल’ हे त्याचे यहुदी नाव मागे पडून पॉल हे त्याचे रोमन नाव अधिक प्रचारात आले. आजवर जो ख्रिस्ती लोकांचा छळ करत होता, तो स्वत: ख्रिस्ती धर्माकरिता छळ सहन करू लागला. स्वत:चा छळ होत असतानादेखील इतरांना येशूची क्षमेची शिकवण तो सर्वत्र देत गेला. ज्या दमास्कस गावी नवख्रिस्तीजनांचा छळ करण्यासाठी तो आला होता, त्याच नगरीतील लोकांना तो ख्रिस्ताची शिकवण देऊ लागला. त्याची ही शिकवण लोकांना पसंत पडली नाही, म्हणून स्वत:चा जीव वाचविण्यासाठी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत एका टोपलीत बसून त्या नगरीच्या तटबंदीवरील एका झडपेतून खाली उतरून त्याला शहराबाहेर पळ काढावा लागला.
धर्मश्रद्धेने पेटून उठलेला हा पॉल धर्मप्रचारासाठी दौऱ्यामागून दौरे काढीत काढीत गावोगावी गेला. ‘नव्या करारा’तील प्रेषितांची कृत्ये या पुस्तकात त्याच्या तीन प्रदीर्घ सफरींचा उल्लेख आहे. पायी ७,९०० मैल, जहाजाने ९,००० मैल प्रवास करीत तो खेडोपाडी व २५ शहरांत फिरला. त्याने कित्येक देश पायाखाली घातले. ज्या लोकांना आपण नवधर्माची दीक्षा दिली, त्या दीक्षेशी त्यांनी एकनिष्ठ राहावे म्हणून गाव सोडल्यानंतर पॉलने त्या गावांतील लोकांसाठी पत्रे लिहून त्या गावांना ती पाठवली. त्यांतली १३ पत्रे आजमितीस बायबलमध्ये उपलब्ध आहेत. त्याने लिहिलेली हीच पत्रे शब्दबद्ध झालेले ‘नव्या करारा’चे पहिलेवहिले पायाचे दगड. येशूच्या चार सुवार्तिकांनी येशूविषयीची ‘चार शुभवृत्ते’ लिहिण्याअगोदर पॉलने धाडलेली ही पत्रे कित्येक गावांत वाचली जात होती. त्यांवर मनन-चिंतन केले जात होते. ती ‘नव्या करारा’ची अर्धाअधिक भाग होतील.
‘माझ्या मरणानंतर तीन दिवसांनी मी पुन्हा उठणार आहे’, ही येशूची वाणी त्याच्या प्रेषितांनी स्वत: ‘ऐकली’ होती. त्या भाकितानुसार त्याच्या मृत्यूनंतर तीन दिवसांनी येशू उठला होता, हे ‘आम्ही प्रत्यक्ष आमच्या डोळ्यांनी पाहिले आहे’ ही साक्ष आपल्या हृदयांत घेऊन त्या घटनेची घोषणा करत करत ते वेगवेगळ्या देशांत गेले. त्या जगावेगळ्या घोषणेला अनेक ठिकाणी कडाक्याचा विरोध झाला. काही प्रेषितांना त्यासाठी आत्मबलिदानही करावे लागले. हीच घोषणा अन्यत्र पसरविण्याचे आदेश मरणाअगोदर त्यांनी त्यांच्या अनुयायांना दिले. अशाप्रकारे जगभर वेगवेगळ्या ठिकाणी ‘ख्रिस्ती समाज’ उदयाला आले.
ख्रिस्ती धर्म जेव्हा यूरोपमध्ये पोहोचला, तेव्हा अन्यधर्मीय लोकांकडून या नवख्रिस्ती समुदायांचा छळ सुरू झाला. पाय वर व डोके खाली अशा अवस्थेत निरो ह्या रोमच्या सम्राटाने प्रेषित पीटर ह्याला व्हॅटिकन टेकाडाच्या उतरणीवर क्रूसावर खिळले. प्रेषित पॉल ह्याचे मुंडके तलवारीने धडावेगळे केले. डायोक्लिशियन, ट्रोजन व कालिगुल या त्याच्यानंतरच्या सम्राटांनीही त्याने जे केले, तेच पुढे चालू ठेवले. इ.स.ची पहिली तीन शतके रोमच्या कोणत्याच सम्राटाला हा नवा धर्म पसंत पडला नाही. या धर्माच्या लोकांना छळण्यास व त्यांचा बळी घेण्यास त्यांनी सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात अनेक ख्रिस्ती धर्मीयांनी ख्रिस्तासाठी आपले रक्त सांडले; मात्र या रक्ताच्या जोरावर ख्रिस्ती धर्माचा महावृक्ष अधिकाधिक फोफावत गेला. म्हणून आजवरही म्हटले जाते : ‘‘ख्रिस्ती धर्माचा वृक्ष हा त्याच्या संस्थापकाच्या व रक्तसाक्षांच्या रक्तावर बहरलेला आहे’’.
रोम आणि अँटिओक या दोन नगरींत ख्रिस्ती धर्माच्या विरोधात सलग दोनशे वर्षे धगधगणाऱ्या ज्वाला अखेरीस विझल्या. ज्या उकळत्या तेलाच्या कढईत ख्रिस्ती श्रद्धावंतांना टाकले जात होते, त्या कढई चुलीवरून खाली उतरविल्या गेल्या. ‘कॉलोसेऊम’ म्हटलेल्या रोमच्या ऐतिहासिक स्मारकात जेथे भुकेलेल्या सिंहांच्या तोंडी ख्रिस्ती लोकांना दिले जात होते, मात्र ते चित्र बदलले (त्या कॉलोसेऊमच्या ऐतिहासिक भिंती २,००० वर्षांनंतरही आज उभ्या आहेत).
सुरुवातीची सलग दोन शतके ख्रिस्ती धर्माचा छळ चालू होता. शेकडो लोकांचे मुडदे पडत होते. अशाही परिस्थितीत एका रणधुमाळीत कॉन्स्टंटाइन द ग्रेट ह्या सेनानीला मॅक्झेंशिअसच्या विरोधात लढत असताना एक साक्षात्कार झाला. क्रूसाचे एक लखलखते देदीप्यमान चिन्ह त्याला आकाशात दिसले. तेच चिन्ह त्याने पुढे आपले लढाईचे प्रतिक म्हणून वापरले. सैनिकांच्या गणवेषावर, त्यांच्या ढालींवर, तलवारींवर क्रूसाचे तेच चिन्ह वापरण्यात आले. त्या लढाईत मॅक्झेंशिअसच्या विरुद्ध कॉन्स्टंटाइनचा विजय होताच रोमन साम्राज्यात ख्रिस्ती धर्माला राजाश्रय मिळाला. इ.स. ३१३ या वर्षी ‘इडिक्ट ऑफ मीलान’ या जाहीरनाम्याला संमती मिळाली. त्या जाहीरनाम्याद्वारे रोमन राज्यात ‘ख्रिस्ती धर्मीय हे बेवारस आहेत’ (Religio illicita) हा ख्रिस्ती धर्मावर मारलेला दूषणावह शिक्का कायमचा पुसला गेला. हाताने तयार केलेल्या मूर्तीसमोर केली जाणारी पूजा बंद झाली. त्या राजाश्रयाच्या बळावर ख्रिस्ती धर्म वेगवेगळ्या खंडांतील अनेक देशांत पसरत गेला. त्याच्यानंतर आलेल्या काही राजांनी या धर्माला राजाश्रय दिला व त्यांच्या जोरावरदेखील ख्रिस्ती धर्म फोफावत गेला. ह्या धर्माचा प्रसार करण्याची तळमळ ज्यांच्या अंतर्यामी होती, त्यांनी धर्मप्रसार करण्यासाठी ‘व्रतस्थांचे संघ’ स्थापन केले. धर्मप्रसार करण्याचे ध्येय-धोरण (मिशन) त्यांनी आपल्या डोळ्यांसमोर ठेवल्यामुळे त्यांना ‘धर्मप्रसारक’ (मिशनरी) म्हटले जाऊ लागले. या मिशनरींनी आपल्या जीवाची तमा न बाळगता प्रवासाच्या वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब करून जगभरातील नाना देश पायाखाली घातले. अशाप्रकारे ख्रिस्ती धर्म हा विश्वव्यापी धर्म झाला. आपल्या स्वर्गारोहणापूर्वी शिष्यांना देशोदेशी जाण्याचा जो आदेश येशूने दिला होता, तो आदेश त्याच्या शिष्यांच्या व शिष्यांच्या अनुयायांच्या माध्यमांतून पूर्णत्वास गेला. सुरुवातीच्या पहाटेच्या वेळचे चाचपडणे संपले व ख्रिस्ती धर्म लख्ख प्रकाशात जगभर वावरू लागला. आपला प्रभाव पाडू लागला.
संदर्भ :
- Stark, Rodney, The Rise of Christianity, New Jersey, 1996.
- परेरा, फ्रान्सिस, प्रेषितांची कृत्ये, मुंबई, २०११.
समीक्षक : फ्रान्सिस दिब्रेटो