भारतातील आसाम राज्याचे शास्त्रीय नृत्य. १५ नोव्हेंबर २००० रोजी संगीत नाटक अकादमीने सत्रिया नृत्याला भारतीय शास्त्रीय नृत्य म्हणून मान्यता दिली.

आसाममधील श्रेष्ठ संतकवी व ‘महापुरुषिया’ या वैष्णव पंथाचे संस्थापक शंकरदेव यांनी वैष्णव धर्माच्या प्रसारासाठी एक शक्तिशाली माध्यम म्हणून पंधराव्या शतकामध्ये सत्रिया नृत्याची सुरुवात केली. आसाममधील तत्कालीन लोकांमध्ये समाज परिवर्तनासाठी त्यांनी तेथील मूलत: कृष्णकेंद्रित वैष्णव मठामध्ये असलेली ही नृत्य, नाटक आणि संगीत यांची रचना प्रसिद्ध करून कला आणि भक्ती यांचा मिलाफ साधला. यासाठी आसामी लोकांच्या दैनंदिन जीवनातील मैथिली, आसामी, हिंदी आणि ब्रज या भाषांमध्ये आसामी नाटकांची रचना केली. आसाममध्ये वैष्णव मठांना सत्र ही संज्ञा आहे. त्यावरून या नृत्यास सत्रिया नृत्य असे संबोधले जाते. आसामी नृत्य आणि नाटक यांचा खजिना अनेक वर्षांपासून सत्रांमधून विकसित आणि संरक्षित केला गेलेला होता. कालांतराने हे नृत्य एका विशिष्ट शैलीच्या रूपात विकसित व विस्तारित झाले.

एक नृत्यछटा

सत्रिया नृत्यातील एकांकिकांना अंकिया नाट असे म्हटले जाते. ज्यामध्ये सौंदर्य आणि धार्मिकता एकत्रित करून नृत्य, नृत्त आणि नाट्य याचे सादरीकरण केले जाते. हे नृत्य सामान्यत: मठ, मंदिर, समुदायाच्या सभागृहांमध्ये सादर केले जाते. यामध्ये सादर केल्या जाणाऱ्या कथांमध्ये मुख्यतः भगवान कृष्ण, विष्णू अवतार, राम-सीता हे विषय आणि रामायण, महाभारत यांसारख्या महाकाव्यांचा संदर्भ असतो.

संतकवी शंकरदेव, त्यांचे शिष्य माधवदेव आणि अन्य अनुयायी यांनी नाटकांचा एक अनिवार्य भाग म्हणून सत्रिया नृत्याचा समावेश केला. यामध्ये प्रामुख्याने गायन व नृत्य यांवर भर असून यामध्ये कथन आणि संवाद याचे प्रमाण अत्यल्प असते. यात उपयोगात आणल्या जाणाऱ्या नाटकांमध्ये प्रामुख्याने शंकरदेवांच्या कालिया दमन, केली गोपाल, रुक्मिणीहरण, पारिजातहरण, रामविजय तर माधवदेवांच्या अर्जुन भंजन, चोरधरा, पिंपरागुचवा, भूमी लुतिवा, रस झुमुरा, भूसानाहरण आणि कोटोरा खेलोवा या नाटकांचा समावेश होतो.

मणिपुरी नृत्यात साकारलेली काही मूलभूत तत्त्वे आणि वैशिष्ट्ये या नृत्याशी जुळतात. भारतातील इतर शास्त्रीय नृत्य शैली प्रमाणेच सत्रिया नृत्य हे प्राकृतिक शोध, प्रबंध, ग्रंथ यावर आधारित आहे. भरतमुनी यांच्या नाट्यशास्त्र, नंदिकेश्वर यांच्या अभिनयदर्पण, शुभंकर यांच्या हस्तमुक्तावली या ग्रंथांमधील वर्णित नियम यांचे पालन सत्रिया नृत्यामध्येही केले जाते. पारंपरिक हस्तमुद्रा, विविध नृत्यकला, पदकार्य, आहार्य संगीत तसेच विविध प्रकारचे मुखवटे या सर्वांमध्ये सिद्धान्तानुसार सत्रिया नृत्य पारंपरिकरीत्या संचलित झालेले आहे. पारंपरिकरीत्या सत्रिया नृत्य फक्त दैनंदिन विधीचा भाग म्हणून मठांमध्ये भोगोट (पुरुष भिक्षुक) द्वारे केले जात असे. आज या प्रथेव्यतिरिक्त पुरुष आणि स्त्रिया देखील सत्रिया नृत्य रंगमंचावर सादर करतात. सत्रिया नृत्याचे मुख्य दोन प्रकार आहेत. पहिल्या गायन बायनार नृत्य ते सूत्रधारी नृत्य या प्रकारामध्ये अभिनयाद्वारे रंगपटलावर सादरीकरण होते.  तर दुसऱ्या प्रकारामध्ये स्वतंत्र नृत्ये सादर केली जातात. ज्यामध्ये कृष्ण भंगी, नादु भंगी, झुमुरा नृत्य, अप्सरा नृत्य, बेहार नृत्य, छलीनृत्य, दशावतार नृत्य, दरबारी नृत्य, मंचोकनृत्य, सत्रिया ओजा पल्ली, अंकिया भाओना, नातोनृत्य इत्यादींचा समावेश होतो.

एक नृत्यछटा

सत्रिया नृत्याच्या सर्व शैली या तांडव आणि लास्य यांवर आधारित आहेत. पुरुष शैली या तांडव, ओजस्वी, निडर आणि तेजस्वी तर स्त्री शैली या लास्य, कोमल, गीतात्मक आणि लालित्यपूर्ण आहेत. चाली, झुमुरा आणि रास नृत्य ह्या शैली लास्य नृत्य आहेत. सत्रिया नृत्यामध्ये वापरली जाणारी अभिनय ही संज्ञा याचा व्यापक अर्थ म्हणजे अभिव्यक्ती. यासाठी अंगिका, शरीर आणि शरीराचे भाग, वाचिका, गीत आणि व्याख्या, आहार्य, वेशभूषा, रस आणि भाव यांनी अभिव्यक्त केले जातात. सत्रिया नृत्यातील आंगिक अभिनय हा विशिष्ट हस्तमुद्रा (हाताच्या हालचाली), सिरहकरमा (डोक्याच्या हालचाली), दृष्टी (डोळ्यांच्या हालचाली), ग्रीवकरमा (मानेच्या हालचाली), गती, चारी (पायाच्या हालचाली), करण (विविध मुद्रा) यांद्वारे सादर केला जातो.

सत्रिया नृत्यामध्ये प्रामुख्याने अंकीया नाटाचे चरित्र हे अत्यंत प्रभावशाली आणि बलशाली वाचिक अभिनयातून प्रदर्शित केले जाते. सूत्रधार हा नृत्याच्या प्रस्तुतीवेळी पूर्ण वेळ उपस्थित राहून सादरकर्ता आणि श्रोत्यांमध्ये समन्वय ठेवून भक्तीरसातील गुण, विशेषता श्रोत्यांना सांगतो. त्याचबरोबर गायन, नृत्य आणि अभिनयाद्वारे विविध व्याख्यात्मक हस्तमुद्रा सादर करतो. यामध्ये आहार्य अभिनय हा समृद्ध आणि विशिष्ट शैली व स्वरूपातून सादर केला जातो. वेशभूषा, वस्त्र, अलंकार, मुख सज्जा, मुखवटा, प्रतिमा यांचा विशिष्टप्रकारे उपयोग सत्रिया नृत्यामध्ये केला जातो.

सत्रिया नृत्य शैलीतील विशेष :

माटी अखर – सत्रिया नृत्य शैलीसाठी प्रारंभिक स्वरूपात केल्या जाणाऱ्या विविध हस्तमुद्रांची एक विस्तृत प्रणाली म्हणजे माटी अखर होय. सत्रिया नृत्याचे विद्वान आणि विशेषतज्ञ यांनी ६४ माटी अखर प्रमाणित केलेल्या आहेत.

खोसोका – सत्रिया नृत्यातील प्रारंभिक व्यायाम खोसोकापासून सुरू केले जातात.

ओरा – ही एक प्रधान मुद्रा आहे. यामध्ये पुरुष ओरा आणि स्त्रियांसाठी प्रकृती ओरा हे दोन प्रकार आहेत.

नादू भंगी – प्रामुख्याने श्रीकृष्णाच्या कालियामर्दन या प्रसंगावर आधारित पौराणिक कथा सादरीकरणाचा हा प्राथमिक नृत्यप्रकार आहे.

झुमुरा नृत्य – या नृत्य प्रकाराचे श्रेय माधवदेव यांना दिले जाते. यामध्ये पुरुष आणि स्त्री एकत्रितपणे नृत्य सादर करतात. यामध्ये केवळ नृत्तहस्त यांचा उपयोग केला जातो. अभिनयाचा प्रयोग केला जात नाही.

बेहार नृत्य – या नृत्यामध्ये प्रामुख्याने वृंदावनातील कृष्णाच्या लीला, खेळ आणि दृश्यांचे सादरीकरण केले जाते.

चाली नृत्य हे नृत्य सत्रिया नृत्यातील सर्वाधिक सुंदर व मनमोहक सादरीकरणापैकी एक आहे. पिसारा फुलवून नाचणाऱ्या मोराचे मनोहर नृत्य यातून सादर केले जाते.

दरबारी चाली नृत्य – हा प्रकार मुख्यतः राजदरबारामध्ये प्रस्तुती करण्यासाठी तयार करण्यात आला होता.

सत्रिया ओजा पल्ली – हे आसामच्या प्रदर्शनीय नृत्यशैली आणि समूह गायनाच्या प्राचीन पारंपरिक रचनांमधून निर्मित झालेले आहे. यामध्ये ओजा हा नर्तक नृत्यासोबतच गायन प्रस्तुत करतो. तसेच आपल्या कथेचे वर्णन करतो. त्याच्यासोबत पल्ली म्हणजेच १० – १५ सदस्यांचा समूह ओजाच्या पाठीमागे अर्धवर्तुळाकार रूपात जमिनीवर बसून झांज व इतर वाद्ये वाजवून ताल व लय कायम ठेवतात.

अंकिया भाओना – हा एक आसामी भाषेतला शब्द असून याचा अर्थ एकल अभिनय नाट्यरचना, जी वैष्णव धर्म सिद्धांतांना प्रदर्शित करते. याचा उपयोग धार्मिकतेचा प्रचार-प्रसार यांच्यासोबतच समाजातील लोकांचे मनोरंजन करण्यासाठीचा एक महत्त्वाचा स्रोत म्हणून केला जातो.

प्राथमिक धेमाली – धेमाली ही आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी, सादरीकरणाचे ठिकाण शुद्ध करण्यासाठी, अपवित्रता दूर करण्यासाठी करण्यात येणारी प्रार्थना आहे. याचा उद्देश परमेश्वराच्या प्रेरणेने सादरीकरणाचे वातावरण पवित्र करणे हा असतो.

सूत्र प्रवेश – धेमाली प्रार्थनेनंतर अंकिया भाओनाचे सादरीकरण करण्यासाठी प्रधान चरित्र सूत्रधार पांढर्‍या पडद्याच्या पाठीमागून श्रोत्यांसमोर प्रस्तुत होतो.

कृष्ण भंगी नृत्य – कृष्ण आणि राम यांचे नाटकीय चरित्र निरूपण सर्वाधिक महत्त्वपूर्ण आहे. केवळ सत्रिया नृत्यामध्येच पहावयास मिळणाऱ्या विशिष्ट कृष्ण हस्तमुद्रेचा येथे अधिक प्रयोग केला जातो.

गोपी भंगी नृत्य – याच्या नावानुसारच यामध्ये प्रामुख्याने वृंदावनामधील गोप-गोपिका, यशोदा आणि अन्य स्त्रियांच्या नृत्यांचे सादरीकरण केले जाते.

युद्ध नृत्य – यामध्ये प्रामुख्याने विविध चरित्रात्मक युद्धाचे प्रसंग सादर केले जातात. नृत्यामध्ये धनुष्य, गदा यांचाही उपयोग केला जातो.

रास नृत्य – भारतातील अन्य राज्यातील प्रचलित असणाऱ्या कृष्णलीला आणि अख्यायिका यांच्याशी निगडित असणारे रासलीला नृत्य आसाममध्येही आपल्या विशिष्ट शैलीततून सादर केले जाते.

राग आधारित प्रस्तुती – कल्याण राग आणि खरमान ताल यांवर आधारित गीत हे सत्रिया नृत्याचे अंतिम चरण असते. राग व ताल आधारित हे गीत द्रुतलयीत सादर केले जाते. शेवटी सूत्रधार पूर्ण कथा समजावून सांगतो व श्लोकाने सांगता करतात. सर्वांत शेवटी “मुक्ति मंगल भातिया” ही प्रार्थना प्रेक्षक, अभिनेता आणि संगीतकारांच्या कल्याणासाठी सादर केली जाते.

पारंपरिक आसामी दागिन्यांचा उपयोग सत्रिया नृत्यामध्ये केला जातो. नृत्यामध्ये वापरले जाणारे अलंकार पुरुष आणि स्त्री यांच्यासाठी वेगवेगळे असतात. पुरुषांच्या वेशभूषेत साधारण धोतर, चादर आणि पागुरी (पगडी) आणि स्त्री वेशभूषेत घुरी, चादर आणि कांची (कमर कापड) यांचा समावेश आहे. पारंपरिकरीत्या कपडे पांढर्‍या किंवा कच्च्या रेशमी रंगाचे असतात. विशिष्ट नृत्यासाठी लाल, निळे आणि पिवळे रंग वापरतात. पूर्वीच्या काळात मखमली आणि रेशमी सामग्री बहुतेक वेशभूषांसाठी वापरली जात असे. स्थानिक कारागिरांनी बनवलेल्या सुंदर सजावटीच्या पगडी आणि मुकुट अंकीया नाटमध्ये वापरले जातात. सूत्रधाराच्या डोक्यावर पगडी असते. तो पांढऱ्या रंगाचा पोशाख परिधान करतो. त्यामध्ये कोट आणि गुडघ्यापर्यंत असणाऱ्या घागऱ्याचा समावेश असतो. करधनी आणि गळ्यात पांढरा हार घातलेला असतो. कृष्णाच्या वेशभूषेसाठी पिवळ्या रंगाचे धोतर, निळ्या किंवा काळ्या रंगाचा कोट – बुकुचोला, मोरपंखाचा मुकुट, फुलांचा हार, पायात घुंगरांच्या माळा यांचाही वापर केला जातो.

चेहरा रंगवण्यासाठी सत्रिया नर्तक आणि अभिनेता चार प्राथमिक रंग वापरतात. यामध्ये पांढरा, निळा, पिवळा आणि लाल याचा उपयोग केला जातो. याबरोबरच कुंकू, हळद, गेरू माती, काजळ, अभ्रक चूर्ण यांचाही रंगासाठी वापर केला जातो.

सत्रिया नृत्यासाठी मुखवटा किंवा प्रतिमा तयार करणे हा ही एक महत्त्वाचा घटक आहे. ही कला सत्रिया संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे आणि त्याची उत्पत्ती आसामच्या सत्रामध्ये झाली आहे. पशुपक्षी आणि निर्जीव वस्तू प्रस्तुतीकरणांमध्ये प्रामुख्याने रथ, सिंहासन, पर्वत, वृक्ष, धनुष्यबाण, तलवार, भाला, बरची, गदा, त्रिशूल अशा विविध वस्तू, मानवी चरित्र सादरीकरणासाठी देवदेवतांचे, राक्षस, पशुपक्षी इत्यादींचे मुखवटे व प्रतिमांचा उपयोग केला जातो. मुखवटे किंवा प्रतिमा मुख्यतः माती, लाकूड, बांबू, कापडापासून तयार केल्या जातात. मुखवटे रंगवण्यासाठी पारंपरिक साधनांचा उपयोग केला जातो. यामध्ये कुंकू, हळद, गेरू माती, काजळ, अभ्रकाची माती वापरतात.

सत्रिया नृत्याच्या सादरीकरणातील महत्त्वाचे वाद्य म्हणजे बोटांनी वाजवले जाणारे खोल. याबरोबरच मृदंग, बरताल, पाटीताल, खुटिताल, मंजिरी (टाळ), नगारा, बासरी, शंख, सारींदा (एक तार वाद्य) याचबरोबर नृत्य अधिक श्रवणीय होण्यासाठी तानपुरा, हार्मोनियम, व्हायोलिन यांचाही वापर अलीकडच्या काळात केला जातो.

सत्रिया नृत्याची राग व ताल प्रणाली –

शास्त्रीय रागांवर आधारित बरगीत (शंकरदेव आणि माधवदेव यांनी निर्मिलेले भक्तिगीत) संगीताच्या सादरीकरणसह नृत्य केले जाते. सत्रिया संगीतामध्ये राग आणि तालाची एक विशिष्ट प्रणाली वापरली जाते. जी हिंदुस्तानी ख्याल गायकी व कर्नाटकी शास्त्रीय संगीत प्रणालीपेक्षा वेगळी आहे. सत्रिया संगीतामध्ये ४२ पेक्षा अधिक ताल लोकप्रिय आहेत. त्यांपैकी १८ ताल उपयोगात आणले जातात. नृत्यामध्ये वापरला जाणारा ताल हा प्रामुख्याने भाव, संबंधित चरित्र, परिस्थिती व रस यानुसार निवडला जातो.

बापूराम बरबायान अतैई, जीबेश्वर गोस्वामी, ललितचंद्रानाथ ओझा, गोपीराम बरगयन, मनिराम डटा मुक्तियार, इंदिरा पी. पी. बोरा, प्रदीप चलीहा, माणिक बरबायान, गुणकँता बरबायान इत्यादींनी सत्रिया नृत्याचा प्रचार व प्रसार करून या नृत्यास देशात व परदेशांतही मान्यता मिळवून दिलेली आहे.

संदर्भ :

  • Kothari, Sunil, Sattriya-Classical Dance of Assam, Mumbai, 2013.
  • Narayan, Shovana, The Sterling Book of Indian Classical Dance, 2007.
  • सत्रिया नृत्य, बुकलेट, प्रकाशन सांस्कृतिक स्त्रोत एवम् प्रशिक्षण केंद्र, नवी दिल्ली.