चमत्कार म्हणजे अद्‌भुत घटना. निसर्गाचे नियम किंवा कार्यकारणभाव ज्या घटनांना लागू पडत नाहीत, अशा घटनांना ‘अद्‌भुत’ म्हणजे आश्चर्यकारक म्हणतात. म्हणजे वैज्ञानिक दृष्टीकोन, बुद्धिवाद वा विवेकवाद यांच्या द्वारे ज्या घटनांची उपपत्ती लागत नाही, अशा घटनांना अद्‌भूत म्हणतात. अशाच प्रकारचे येशूने केलेल्या चमत्कारांचे तपशील बायबलच्या ‘नव्या करारा’त आढळतात.

येशूचे चमत्कार : पारंपरिक चित्रे.

अ) चार शुभवर्तमाने : ३६ चमत्कार. बायबलच्या ‘नव्या करारा’तील मत्तय, मार्क, लूक व योहान ह्या चारही शुभवर्तमानकारांनी प्रभू येशू ख्रिस्ताचे एकूण ३६ चमत्कार सादर केलेले आहेत. त्यांची वर्गवारी पुढीलप्रमाणे : १) एकूण १२ चमत्कार मत्तय, मार्क व लूक ह्या तिन्ही शुभवर्तमानांत वाचायला मिळतात. त्यांपैकी पाच हजारांना भोजन हा चमत्कार योहानलिखित शुभवर्तमानात देण्यात आलेला आहे. २) ५ चमत्कार मत्तय व मार्क ह्या दोनच शुभवर्तमानात नमूद करण्यात आलेले आहेत (त्यात येशू गनेसरेत येथील रोग्यांना बरे करतो, कनानी/सुरफुनीकी स्त्रीच्या भूतग्रस्त मुलीला मुक्त करतो, चार हजार लोकांना तृप्त करतो, अंजिराच्या झाडाला शाप देतो आणि पाण्यावरून चालतो ह्या पाच चमत्कारांचा समावेश होतो). त्यांपैकी येशूचे पाण्यावरून चालणे, हा चमत्कार योहानलिखित शुभवर्तमानातदेखील देण्यात आलेला आहे. ३) येशू शताधिपतीच्या चाकराला बरे करतो. हा चमत्कार फक्त मत्तय व लूकमध्येच वाचायला मिळतो. योहानच्या शुभवर्तमानात शताधिपतीच्या चाकराऐवजी राजाच्या अंमलदाराच्या मुलाचा उल्लेख करण्यात आलेला आहे. ४) येशू कफर्णहूम येथील सभास्थानात अशुद्ध आत्म्याने पछाडलेल्या एका माणसाला बरे करतो आणि यरिहो येथील बार्तीमय नावाच्या आंधळ्या भिकाऱ्याला दृष्टिदान देतो, हे दोन चमत्कार फक्त मार्क व लूक ह्या दोन शुभवर्तमानकारांनी नमूद केलेले आहेत. ५) येशू पुष्कळ रोग्यांना बरे करतो आणि येशू बहिऱ्या-तोतऱ्या माणसाला बंधमुक्त करतो, हे दोन चमत्कार फक्त मार्कलिखित शुभवर्तमानात आपल्याला वाचायला मिळतात. ६) येशूचे चार चमत्कार फक्त मत्तयनेच आपल्या शुभवर्तमानात नमूद केलेले आहेत : येशू गालील प्रांतातील व आसपासच्या पुष्कळ रोग्यांना बरे करतो, तो दोन आंधळ्यांना दृष्टिदान देतो, एका मुक्या भूतग्रस्ताला बरे करतो व एका आंधळ्या व मुक्या असलेल्या भूतग्रस्ताला बरे करतो. ७) येशूचे चार चमत्कार फक्त लूकच्याच शुभवर्तमानात आपल्याला वाचायला मिळतात. येशू विधवेच्या मुलाला मरणातून जिवंत करतो, अठरा वर्षे कुबडी असलेल्या एका स्त्रीला बरे करतो, जलोदर झालेल्या माणसाला रोगमुक्त करतो व दहा कुष्ठरोग्यांना शुद्ध करतो. ८) येशूने केलेले पाच चमत्कार आपल्याला केवळ योहानलिखित शुभवर्तमानात वाचायला मिळतात : काना येथे येशू पाण्याचा द्राक्षारस करतो, राजाच्या अंमलदाराच्या मुलाला बरे करतो, बेथसैदा येथील पंगू माणसाला बरे करतो, जन्मांधाला दृष्टी देतो आणि मृत लाझरसला जिवंत करतो. ९) येशूच्या सांगण्यावरून प्रेषित समुद्रात जाळी सोडतात आणि माशांचा मोठा घोळका त्यांना लागतो, हा चमत्कार फक्त लूक ५:१–११ व योहान २१:४–८ मध्येच देण्यात आलेला आहे.

प्रत्येक शुभवर्तमानाचा जर स्वतंत्रपणे विचार केला, तर मत्तयच्या शुभवर्ममानात २२, मार्कच्या शुभवर्तमानात २१, लूकच्या शुभवर्तमानात २०, तर योहानच्या शुभवर्तमानात ७ चमत्कारांचे वर्णन करण्यात आलेले आहे.

ब) चमत्कारांचा कळस : प्रभू येशूचे पुनरुत्थान हा सर्व चमत्कारांचा कळस मानला जातो. त्याचा वृत्तान्त सर्व चारही शुभवर्तमानकारांनी दिलेला आहे. याशिवाय पुनरुत्थित ख्रिस्ताने आपल्या प्रेषितांना व शिष्यांना दिलेल्या दर्शनांचे एकूण ११ वृत्तान्त आपल्याला चार शुभवर्तमानांत वाचायला मिळतात.

क) चमत्कारांमागचा हेतू : येशूने केलेले चमत्कार हे केवळ जादुई नव्हते किंवा तो कुठल्याही प्रकारे हातचलाखीचा प्रकार नव्हता. तशा प्रकारचा संशय तत्कालीन शास्त्री-परुशांनी व्यक्त केला, तेव्हा येशूने चमत्कारामागचा हेतू स्पष्ट केला, ‘‘मी जर देवाच्या आत्म्याने भुते काढीत असेन, तर देवाचे राज्य तुमच्यावर आले आहे’’ (बायबल, मत्तय १२:२८).

हे विविध प्रकारचे चमत्कार करून आपण या जगाचा मुक्तिदाता आहोत हे प्रकट करण्याचा प्रयत्न येशूने केला. आपले दोन शिष्य त्याच्याकडे पाठवून योहान बाप्तिस्ता ह्याने त्याला असे विचारले की, ‘‘जे येणार आहेत, ते आपणच की आम्ही दुसऱ्याची वाट पाहावी?’’ तेव्हा येशूने त्यांना उत्तर दिले, ‘‘जे तुम्ही पाहता व ऐकता ते योहानाला जाऊन सांगा. आंधळे पाहतात, पांगळे चालतात, कुष्ठरोगी शुद्ध होतात, बहिरे ऐकतात, मेलेले उठविले जातात…’’ (बायबल, मत्तय ११:३–५). मसिहा जेव्हा येईल, तेव्हा अनेक चमत्कार घडतील असे भाकीत यशया नावाच्या संदेष्ट्याने केलेले होते (बायबल, यशया ३५:५-६; ६१:१) ते येशू ठायी पूर्णत्वास जात असल्याची बाह्य खूण म्हणजे त्याचे चमत्कार.

संत योहानच्या शुभवर्तमानात चमत्काराऐवजी ‘चिन्ह’ हा शब्द वापरलेला आहे. आपल्या शुभवर्तमानाच्या शेवटी संत योहान म्हणतो, ‘‘या पुस्तकात लिहिली नाहीत अशी दुसरीही पुष्कळ चिन्हे येशूने आपल्या शिष्यांदेखत केली. येशू हा देवाचा पुत्र ख्रिस्त आहे असा तुम्ही विश्वास ठेवावा, आणि विश्वास ठेवून तुम्हाला त्याच्या नावाने जीवन प्राप्त व्हावे, म्हणूनही लिहिली आहेत.

ड) विश्वास : चमत्कारांचा पाया–‘चमत्कार हा विश्वासाचा पाया नसून विश्वास हा चमत्कारांचा पाया आहे’ हे सूत्र येशूच्या सर्व चमत्कारांना लागू पडते. चमत्कार आणि विश्वास ह्यांच्यामधील नाते इतके गहिरे आहे की, येशू त्या संदर्भात विविध महत्त्वपूर्ण विधाने करतो. १) समुद्रात वादळ सुरू झाले, तेव्हा पट्टीचे पोहणारे मच्छीमार बांधव असलेले येशूचे शिष्य भीतीने ओरडू लागले, ‘‘प्रभुजी, वाचवा, आम्ही बुडालो’’. तेव्हा येशू त्यांना म्हणतो, ‘‘अहो अल्प विश्वासू, तुम्ही इतके भित्रे कसे? तुमचा विश्वास कोठे आहे?’’ त्यानंतर येशू ते वादळ शांत करतो (मार्क ४:३५–४१). २) याईर नावाच्या सभास्थानाच्या अधिकाऱ्याची मुलगी मरायला टेकली होती. येशू त्याच्या घरी पोहोचण्याआधीच त्या अधिकाऱ्याच्या घराकडून काही माणसे येऊन त्याला म्हणाली, ‘‘मुलगी मरण पावली. आता गुरूजींना त्रास कशाला देता?’’ परंतु येशू त्यांच्या बोलण्याकडे लक्ष न देता सभास्थानाच्या अधिकाऱ्याला म्हणतो, ‘‘भिऊ नकोस, विश्वास मात्र धर’’. नंतर येशू त्याच्या घरी जाऊन त्याच्या मृत मुलीला जिवंत करतो (बायबल, मार्क ५:२१–४३). ३) बारा वर्षे रक्तस्रावाने आजारी असलेली एक स्त्री मोठ्या विश्वासाने येशूच्या वस्त्राच्या गोंड्याला शिवते आणि तत्काळ बरी होते. येशू तिला म्हणतो, ‘‘मुली, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे’’ (बायबल, मार्क ५:३४). ४) शताधिपतीचा चाकर आजारी होता. तो येशूकडे विनंती करतो; मात्र येशूने आपल्या छपराखाली यावे एवढी आपली पात्रता नसल्याचे कबूल करतानाच येशूच्या एका शब्दाने आपला चाकर बरा होईल, असा विश्वास तो शताधिपती प्रकट करतो. येशू त्याच्या विश्वासाचे कौतुक करीत म्हणतो, ‘‘असा विश्वास मला साऱ्या इझ्राएलातही आढळला नाही… जा, तू विश्वास ठेवल्याप्रमाणे तुला प्राप्त होवो’’, त्याच घटकेस तो चाकर बरा झाला (बायबल, मत्तय ८:५–१३). ५) दोन आंधळ्यांनी येशूकडे दृष्टिदानाची विनंती केली, तेव्हा येशू त्यांना म्हणाला, ‘‘हे करावयास मी समर्थ आहे, असा विश्वास तुम्ही धरिता काय?’’ त्यांनी ‘होय’ म्हणताच येशू त्यांच्या डोळ्यांना स्पर्श करून म्हणतो, ‘‘तुमच्या विश्वासाप्रमाणे तुम्हांस प्राप्त होवो’’ (बायबल, मत्तय ९:२७–३१). ६) अंजिराच्या निष्फळ झाडाला येशूने शाप दिल्यानंतर ते वाळून गेले. हे पाहताच शिष्य आश्चर्यचकित झाले. येशू त्यांना म्हणतो, ‘‘देवावर विश्वास ठेवा. तुमच्या ठायी मोहरीच्या दाण्याएवढा जरी विश्वास असला आणि तुम्ही या डोंगरालाही, ‘तू उपटून समुद्रात टाकला जा’ असे म्हणाल तर तसे होईल’’ (बायबल, मत्तय २१:१८–२२; मार्क ११:२०–२३).

थोडक्यात, येशू केवळ चमत्कारावर नव्हे, तर याचकाच्या विश्वासावर व परमेश्वराच्या सामर्थ्यावर अधिक भर देतो. शेवटी चमत्कार म्हणजे माणसाला अशक्य असलेले शक्य करून दाखविणाऱ्या परमेश्वराच्या सामर्थ्याचे दृश्यचिन्हच, नाही का?

इ) येशूच्या चमत्कारांचे पाच प्रकार : शुभवर्तमानकारांनी नमूद केलेल्या येशूच्या एकूण ३६ चमत्कारांची वर्गवारी पाच प्रकारांमध्ये करता येते. त्याद्वारे येशूच्या सामर्थ्याचे विविध पैलू उलगडून दाखविता येतात.

  • १) निसर्गाशी संबंधित असलेले चमत्कार : येशूचे एकूण सात चमत्कार निसर्गाशी संबंधित आहेत. त्यामध्ये येशू वादळ शांत करतो, तो पाच हजार लोकांना भोजन देतो, येशू पाण्यावरून चालतो, तो चार हजार लोकांना भोजन देतो, काना येथे लग्नसमयी तो पाण्याचा द्राक्षारस करतो, तो अंजिराच्या झाडाला शाप देतो आणि येशूच्या सांगण्यावरून समुद्रात जाळे टाकणाऱ्या प्रेषितांना माशांचा मोठा घोळका लागतो या चमत्कारांचा समावेश होतो. त्याद्वारे आपण ह्या विश्वाचे सम्राट असून ह्या निसर्गावर, नैसर्गिक घडामोडींवर आपला ताबा आहे, हे येशू दर्शवितो.
  • २) मानवी आजारांशी संबंधित असलेले चमत्कार : येशूने केलेल्या ३६ चमत्कारांपैकी जवळजवळ एकतृतियांश चमत्कार म्हणजे ११ चमत्कार मानवी आजारांशी संबंधित आहेत. नाना रोगांनी पीडलेले, दुखणेकरी, पेत्राची सासू (ताप), पक्षाघाती मनुष्य, कुष्ठरोगी, जलोदर झालेला माणूस, रक्तस्त्रावी स्त्री, आजारी चाकर अशा सर्वांना येशूने आपल्या स्पर्शाने किंवा केवळ शब्दाने बरे केले. लोकांच्या झुंडीच्या झुंडी येशूभोवती गर्दी करीत व त्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न करीत. जितके त्याला स्पर्श करीत तितके बरे होत; कारण रोग बरे करण्याचे सामर्थ्य त्याच्या ठायी होते. ‘त्याने स्वत: आमचे विकार घेतले आणि आमचे रोग वाहिले’ हे यशया संदेष्ट्याचे भाकीत त्याच्या ठायी पूर्णत्वास गेले. येशू हा वैद्यांचा वैद्य आहे. त्याच्यावरील श्रद्धा आपल्याला परिपूर्ण आरोग्य देऊ शकते, हा संदेश ह्या चमत्कारांद्वारे देण्यात आलेला आहे.
  • ३) मानवी व्यंगांशी (दिव्यांगांशी) संबंधित असलेले चमत्कार : हात वाळलेला माणूस, कुबडी स्त्री, जन्मांध, आंधळे, बहिरे, पांगळे, मुके, तोतरे अशा दिव्यांगांना प्रभू येशूने बरे केले. त्याद्वारे प्रत्येक व्यक्तीठायी कुठली ना कुठली शारीरिक, मानसिक वा सामाजिक उणीव असू शकते; मात्र परमेश्वरच आपल्याला परिपूर्ण जीवनाचे दान मिळवून देऊ शकतो, हे शुभवर्तमानकारांनी दर्शविण्याचा प्रयत्न केलेला आहे. असे मानवी व्यंगांशी संबंधित असलेले येशूचे एकूण १० चमत्कार शुभवर्तमानात देण्यात आलेले आहेत.
  • ४) भूत-पिशाच्चाशी संबंधित असलेले चमत्कार : अशुद्ध आत्मा, दुष्टात्मा, भूत, सैतान, बालजबूल अशी विविध नावे वापरून ह्या जगात अस्तित्वात जन्मलेल्या दुष्टशक्तीच्या कचाट्यात सापडलेल्या व्यक्तींना येशूने आपल्या दैवी शक्तीने कसे मुक्त केले, ते सांगणारे पाच चमत्कार शुभवर्तमानकारांनी वर्णन केलेले आहेत. त्यात कफर्णहूमच्या सभास्थानातील अशुद्ध आत्मा लागलेला माणूस, गरसेकरांच्या/गदरेकरांच्या प्रदेशातील भूतग्रस्त, कनानी/सुरफुनीकी स्त्रीची भूतग्रस्त मुलगी, फेफरेकरी, भूतग्रस्त मुलगा आणि मुका भूतग्रस्त ह्यांना येशूने मुक्त केल्याचे वृत्तान्त शुभवर्तमानात देण्यात आलेले आहेत. त्याद्वारे जगात दुष्ट, वाईट शक्ती कितीही मोठ्या प्रमाणात असली, तरी त्यापेक्षा परमेश्वराचे सामर्थ्य कितीतरी पट मोठे असते, हे दर्शविण्यात आलेले आहे.
  • ५) मृत्यूशी संबंधित असलेले चमत्कार : याईराच्या कन्येला, नाइनच्या विधवेच्या मुलाला आणि बेथानी येथील लाझरसला मरणातून जिवंत करून येशूने पुनरुत्थान व जीवन आपणच आहोत, हे सिद्ध केलेले आहे. हे तीन चमत्कार येशूच्या पुनरुत्थानाकडे अंगुलीनिर्देश करतात. फरक एवढाच की, ही तिन्ही माणसे पुन्हा मरण पावली. पुनरुत्थित झालेला येशू पुन्हा मरण पावला नाही. त्याच्यावर मरणाची सत्ता चालत नाही.

सारांश, पृथ्वीवरील आपल्या तीन वर्षांच्या सेवाकार्यात येशूने असंख्य व विविध प्रकारचे चमत्कार करून आपले सामर्थ्य प्रकट केले. आपण जगाचा मुक्तिदाता आहोत, हे सिद्ध केले आणि अनेकांना नवजीवन मिळवून दिले.

संदर्भ :

  • Brown, Raymond and Others, The New Jerome Biblical Commentary, Bangalore, 1997.
  • Farmer, William R. The International Bible Commentary, Banglore, 1998.
  • Fitzmyer, Joseph A. A Christological Catechism : New Testament Answers, New York, 1982.
  • Meier, John P. A Marginal Jew : Rethinking the Historical Jesus, Vol. II, New York, 1994.
  • Pereira, Francis, Jesus : The Human and Humane Face of God, Mumbai, 2000.

समीक्षक : फ्रान्सिस कोरिया