मुसलमानांशी धार्मिक, व्यापारी व राजकीय संघर्ष वाढल्यामुळे भारत या उपखंडाला जोडणारा मध्य आशियातील खुष्कीचा मार्ग मध्ययुगाच्या काळात पाश्चिमात्यांना बंद झाला. पौर्वात्य व पाश्चिमात्य राष्ट्रांना जोडणारे मार्ग अरब मुसलमानांच्या आधिपत्याखाली होते. त्यामुळे पश्चिमेकडून माल घेऊन लाल समुद्र व पर्शियन आखात या मार्गाने पूर्वेकडच्या देशांना विकताना यूरोपियन व्यापाऱ्यांना नाक्या-नाक्यांवर फार मोठी जकात भरावी लागे. शिवाय मूर लोकांची समुद्रातील चाचेगिरीही मोठ्या प्रमाणात चालू होती. त्यामुळे पूर्व-पश्चिम राष्ट्रांना जोडणारा जलमार्ग शोधून काढावायासाठी यूरोपियन राष्ट्रांमध्ये स्पर्धा सुरू झाली. त्यातून अनेक दर्यावर्दी उदयाला आले.
नव्याने शोधून काढलेल्या देशांत ख्रिस्ती धर्म प्रस्थापित करण्याच्या बाबतीत अग्रेसर असलेले पोर्तुगालचे आणि स्पेनचे राजे जेव्हा धर्मप्रसाराच्या कक्षेविषयी त्यांचा प्रश्न घेऊन पोप सहावे अलेक्झांडर यांच्याकडे आले, तेव्हा त्यांनी ५ जून १४९४ रोजी एक आज्ञापत्र जाहीर करून स्पेनला अमेरिकेच्या बाजूच्या सर्व देशांची व बेटांची जबाबदारी दिली; तर पोर्तुगाल या देशावर भारतीय उपखंडाची जबाबदारी सोपविली. ‘तोरदेन्सिअुस’ या ठिकाणी त्या काळच्या दोन्ही प्रभावी राष्ट्रांनी आपापले विभाग वाटून घेतले.
मसाल्याच्या पदार्थांसाठी प्रसिद्ध असलेल्या भारत देशाचा शोध घेत असताना कोलंबस या दर्यावर्दीला १४९२ मध्ये अमेरिकेचा शोध लागला. त्यानंतर पोर्तुगालचा राजा पहिला मॅन्यूएल याच्या आश्रयाखाली वास्को द गामा हा दर्यावर्दी ८ जुलै १४९७ रोजी तीन गलबते घेऊन लिस्बन बंदरातून निघाला. त्याच्यासोबत शंभर खलाशी व त्यांच्या आध्यात्मिक गरजा भागविण्यासाठी फा. रॉद्रिगो आणि पेद्रो काव्हीलाम हे दोन धर्मगुरू होते. २० मे १४९८ रोजी ‘साव गॅब्रिएल’ या जहाजाचा कप्तान भारताच्या कालिकत बंदरात उतरला.
भारतभूमीत येताच त्याने भारतातील परिस्थितीचा अभ्यास केला आणि १० जुलै १४९९ रोजी तो लिस्बन नगरीत परतला. मायदेशी परतल्यानंतर त्याने राजाला भारताच्या वैभवाचा व समृद्धीचा अहवाल सादर केला. या अहवालात व्यापाराबरोबरच धर्मप्रसाराच्या शक्यतेविषयी सकारात्मक बाजू मांडली. या अहवालाने भारावून जाऊन पोर्तुगालच्या राजाने आपला विश्वासू सरदार पेद्रो आल्व्हारिश काब्राल ह्याच्या नेतृत्वाखाली तेरा जहाजांचा एक काफिला देऊन १९ मार्च १५०० रोजी त्याला भारताकडे रवाना केले. या काफिल्यात १२०० सैनिक व १६ धर्मगुरू होते. काब्राल ३० ऑगस्ट १५०० रोजी भारतातील कालिकत बंदरात उतरला.
कालिकत हे त्या वेळी हिंदुस्थानातील भरभराटीचे बंदर असून बरेच अरब येथे व्यापाराकरिता येत. कालिकतचे राज्य हिंदू असून तेथील राजास झामोरिन म्हणत. पोर्तुगीजांच्या आगमनाने आपल्या व्यापारावर संकट येणार म्हणून अरब व्यापाऱ्यांनी झामोरिनचे कान भरविले. शिवाय व्यापाऱ्यांच्या कडव्या विरोधामुळे कालिकत येथे पोर्तुगीजांना व्यापारात त्यांच्या मनाजोगे यश मिळाले नाही. काळाची पावले ओळखून पोर्तुगीजांनी कोचीन येथे प्रयाण केले. त्या वेळेस कोचीन येथे कालिकतच्या झामोरिन राजाचा मांडलिक राजा राज्य करीत होता. पोर्तुगीज लोकांबरोबर व्यापार वाढविल्यास झामोरिन राजाची मर्जी सांभाळता येईल हा हेतू मनात ठेवून त्याने पोर्तुगीज सरदार काब्राल याला पूर्ण मोकळीक दिली. परंतु व्यापार वाढविण्यासाठी व धर्मप्रसार करण्यासाठी कोचीन येथील परिस्थिती अवघड वाटल्यामुळे काब्राल याने आपला मोर्चा गोव्याकडे वळविला.
इ.स. १५१० मध्ये विजापूरच्या आदिलशाहाने गोव्यावर चढाई करून तो भाग आपल्या ताब्यात घेतला होता. त्याविरुद्ध आदिलशाहाच्या तावडीतून गोवा सोडवून घेण्यासाठी विजयनगरच्या राजाचा आरमार प्रमुख तिम्मय्या (तिमोजा) याने पोर्तुगीजांची मदत घेतली. चालून आलेल्या संधीचा फायदा घेऊन अफांसो द अल्बुकर्क याने २५ नोव्हेंबर १५१० रोजी गोवा जिंकले. तो दिवस अलेक्झांड्रियाची संत कॅथरिन हिच्या सणाचा होता म्हणून त्या दिवसाचे औचित्य साधून त्याने गोव्यात एक लहानसे चर्च बांधले. तीच या किनारपट्टीवरील ख्रिस्ती धर्माची मुहूर्तमेढ.
ह्या धार्मिक लाटेच्या वेळी पोप यांनी पोर्तुगीजांनी उजेडात आणलेल्या नवनवीन देशांसाठी Pro Excellenti Praeemientia या जाहीरनाम्याद्वारे पोर्तुगालच्या आधिपत्याखालील मदेरा बेटाजवळील फूंचल या नगरीच्या नावाच्या झेंड्याखाली इ.स. १५१४ मध्ये एक विशाल ख्रिस्ती धर्मप्रांत निर्माण केला व त्याच्या धार्मिक आधिपत्याखाली भारतासहित चीनपर्यंतचे सर्व देश व बेटे यांचा समावेश करण्यात आला. ‘दूदूमप्रो पार्ते’ या जाहीरनाम्यानुसार पोप महोदयांनी इ.स. १५१६ मध्ये पोर्तुगालच्या राजाला पूर्वेकडील देशांत काही सवलती व अधिकार दिले. ते अधिकार ‘प्रॉपगॅंडा’ या नावाने सर्वसंमत झाले. ‘प्रॉपगॅंडा’ म्हणजे धर्मप्रचाराचा अधिकार. त्या विभागातील नव्या बिशपांच्या निवडीसाठी उमेदवार सुचविण्यापर्यंत त्या अधिकाराची कक्षा गेली.
Acquum Repulamees या आज्ञापत्राद्वारे (Bull) पोप तिसरे पॉल यांनी ३ नोव्हेंबर १५३४ रोजी गोवा धर्मप्रांताची स्थापना केली व महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील सर्व ख्रिस्ती समाजसमूह त्या धर्मप्रांताच्या पाळकीय आधिपत्याखाली आले. धर्मप्रांताची कक्षा आफ्रिकेच्या दक्षिण टोकापासून चीनच्या किनाऱ्यापर्यंत विस्तीर्ण अशा भूप्रदेशावर पसरली होती.
राजकीय सत्ता व व्यापार या कार्यक्रमांबरोबरच पोर्तुगीज लोकांनी धर्मप्रसार करण्यास सुरुवात केली. त्यांत फ्रान्सिस्कन धर्मगुरू अंतोनिओ दोपोर्तो व जेज्वीट धर्मगुरू फ्रान्सिस झेव्हिअर यांचे मिशनरी कार्य अत्यंत उल्लेखनीय असे मानले जाते. आपल्या किनारपट्टीवर असलेली वर्णव्यवस्था, असमानतेची समाजरचना व विधवांची तसेच अनाथांची झालेली हलाखीची परिस्थिती आणि वरचेवर पडणारे भीषण दुष्काळ यांचा उपयोग करून त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी आपले पाय रोवण्यास सुरुवात केली. त्याला प्रतिसाद म्हणून पोर्तुगीज राजाने धर्माधिकाऱ्यांच्या संमतीने या विभागांत अधिकाधिक मिशनरी धर्मगुरू पाठविण्याची व्यवस्था केली. अहमदनगरच्या सुलतानाची परवानगी घेऊन इ.स. १५१६ मध्ये त्यांनी चौल (रेवदंडा) बंदरात पाय ठेवले. १५२१ मध्ये त्यांनी चौल येथे एक भक्कम भुईकोट तर बांधलाच; पण यथावकाश तिथे आठ ख्रिस्त मंदिरे उभी केली. इ.स. १५३० आणि १५३१ मध्ये त्यांनी वसई जिंकण्याचा प्रयत्न केला. तो अयशस्वी ठरला. २१ जानेवारी १५३३ रोजी वसईच्या गढीचा किल्लेदार मलिक तोकन (तुघान) याच्यावर वरचढ होऊन त्यांनी ती गढी काबीज केली. तो दिवस संत सबॅस्टिअन याच्या सणाचा असल्यामुळे त्यांनी १५३६ मध्ये बांधलेला वसई किल्ला हा संत सबॅस्टियनच्या आश्रयाखाली प्रसिद्धीस आला.
याच सुमारास गुजरातच्या बहादूरशाहाचे दिल्लीचा सम्राट हुमायून याच्याशी बिनसले. दिल्ली सम्राटाशी लढा देण्यासाठी बहादूरशाहाने पोर्तुगीजांची मदत घेतली. त्या मदतीच्या बदल्यात त्याने साष्टी, ठाणे, मुंबईलगतची सात बेटे, एलिफंटा बेट, करंजा (उरण) व वसई परिसर हा विभाग पोर्तुगीजांना दिला.
पोर्तुगीजांच्या आगमनाबरोबर कोकण किनारपट्टीत जे धर्मांतर झाले, त्याला विविध बाबी कारणीभूत आहेत. पोर्तुगीजांचा एक प्रकारचा हुकमी स्वभाव, ‘ख्रिस्ती धर्मातूनच तारण होऊ शकते; अन्यथा नाही’, ही त्यांची धार्मिक समजूत. ह्याच्या जोरावर फ्रान्सिस्कन, जेज्वीट, डॉमिनिकन व आगुस्तिनीयन या चार संघांच्या धर्मगुरूंनी नेटाने धर्मप्रचार सुरू केला. धर्मप्रचाराच्या संदर्भात १५६७ साली गोव्याचे आर्चबिशप गस्पार परेरा याच्या अध्यक्षतेखाली गोवा येथे भरलेल्या ‘फर्स्ट कौन्सिल ऑफ गोवा’ ‘‘ही प्रादेशिक परिषद आरंभी असे मंजूर करते की, जबरदस्ती वा जुलूम यांच्या जोरावर कोणालाही ख्रिस्ती धर्म विश्वासाकडे किंवा बाप्तिस्माकडे आणणे उचित नाही. प्रत्यक्ष स्वर्गीय पित्याने त्या व्यक्तीला जर ख्रिस्ती धर्माकडे आकर्षित केले नसेल व त्या व्यक्तीला कृपेचे वरदान जर प्राप्त झाले नसेल, तर कोणतीच व्यक्ती ख्रिस्ताकडे येऊ शकत नाही, म्हणून जबरदस्ती करणे योग्य नाही’’ हा त्यांचा निर्णय होता.
या धर्मसभेनंतर १५७५, १५८५, १५९२ व १६०६ साली धर्मपरिषदा भरवल्या गेल्या. या धर्मपरिषदांत धार्मिक बाबतींत सर्वसमावेशक असे निर्णय घेतले गेले. त्याची अंमलबजावणी करताना अतिउत्साही कॅथलिक धर्म प्रसारकांकडून जुलूम-जबरदस्ती, आमिष दाखवून घडवून आणलेले धर्मांतर आदी बाबींचा वापर केला गेला नसेलच, असे खात्रीलायक सांगता येत नाही.
सोळाव्या शतकाच्या मध्यावर व त्याच्या उत्तरार्धात भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर अशाप्रकारे मोठ्या प्रमाणात ख्रिस्ती समाज निर्माण झाला. या काळात महाराष्ट्राच्या किनाऱ्यावर अनेक भव्य ख्रिस्त मंदिरे उभी राहिली. वसई त्यांची उपराजधानी झाली. या विभागात काही प्रमाणात एका विशिष्ट प्रकारची संस्कृती निर्माण झाली. हे साधारण २०५ वर्षांपर्यंत चालू होते. ह्याच त्यांच्या काळात वसई बंदराला उर्जितावस्था आली. तिचा ते ‘डॉमबसाय’ असा उल्लेख करीत.
पोर्तुगाल हा देश जवळ जवळ १२ हजार मैल दूर असल्यामुळे लिस्बन राजधानीकडून भारतातीलच नव्हे, तर अन्य देशांतील वसाहतींवर बारकाईने लक्ष पुरविणे अवघड होते. तेथे यूरोपमध्ये पोर्तुगाल या छोट्याशा देशावर महाकाय असा स्पेन कुरघोडी करत होता. त्यात पोर्तुगीजांनी १५६० मध्ये गोव्याला धर्मन्यायालय (Inquisition) चालू केले व पेशव्यांच्या स्थानिक सरदारांना दुखावले. त्यामुळे पोर्तुगीजांविषयी पेशवे दरबारी तक्रारी वाढत गेल्या. त्यावर उपाय म्हणून १७२२ मध्ये पेशव्यांनी वसईवर पहिल्यांदा स्वारी केली. मात्र त्यात त्यांना यश आले नाही.
संदर्भ :
- Correa Luis de Assis, Goa : Through the Mists of History from 10000BC-AD1950, Grafica (Goa) Dourada, 2006.
- Da Cunha, J. G. Notes on the History & Antiguities of Chaul & Bassein, Mumbai, 1993.
- Meersman, Achilles, The Franciscans in Bombay, Bangalore, 1957.
- Schurhammer, S. J. Francis Xavier : His Life, His Times, Vols. 2, 1980.
- कोरिया, फ्रान्सिस, सामवेदी ख्रिस्ती समाज, मुंबई. १९९७.
समीक्षक : फ्रान्सिस दिब्रिटो