महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध डोंगरी किल्ला. तो नाशिक जिल्ह्यात सटाणा तालुक्यातील डोलाबारी डोंगररांगेवर समुद्रसपाटीपासून १५६७ मी. म्हणजेच ५१४१ फूट उंचीवर आहे. या किल्ल्याला कळसुबाईच्या (१६४६ मी.) खालोखाल उंची असलेले दुसऱ्या क्रमांकाचे शिखर आहे. साल्हेरवर जाण्यासाठी नाशिकहून सटाणा-ताहराबाद मार्गे वाघांबे किंवा सटाणा मार्गे साल्हेरवाडी या दोन गावांतून मार्ग आहे. एक मार्ग पायथ्याशी असलेल्या साल्हेरवाडी गावातून साल्हेरच्या नैर्ऋत्येकडून वर जातो, तर दूसरा मार्ग वाघांबे गावातून म्हणजेच उत्तरेकडून साल्हेर आणि सालोटा किल्ल्याच्या खिंडीतून माथ्यावर जातो. साल्हेरवाडीतून गडावर जाणारा रस्ता साल्हेरच्या पश्चिमेकडील माचीवर पोहोचतो.

साल्हेर किल्ला, नाशिक.

माचीवर प्रवेश करण्यासाठी एकूण तीन दरवाजे असून ही माची तटबंदीने बंदिस्त आहे. माचीमधून पायवाटेने उत्तरेकडे वाटेत खडकात खोदलेले पाण्याचे टाके आहे. गडाच्या माथ्यावर जाणारी वाट चार दरवाजे ओलांडून गडावर पोहोचते. तर वाघांबे गावांकडून जाणारी वाटसुद्धा चार दरवाजे ओलांडात माथ्यावर पोचते. गडाचा पूर्व-पश्चिम असणारा माथा विस्तीर्ण असून गडावर असणारे सर्व अवशेष किल्ल्याच्या उत्तरेकडील उतारयुक्त सपाटीवर आहेत. तर किल्ल्याच्या दक्षिणेकडील सर्वोच्च माथ्यावर परशुराम मंदिर आहे.

बालेकिल्ल्यावरील दरवाजा, साल्हेर किल्ला, नाशिक.

किल्ल्याला चहूबाजूंनी तुटलेले कडे असल्यामुळे पश्चिमेकडील बाजूस जरूरीपुरती तटबंदी बांधलेली आहे. दोन्ही बाजूंकडून किल्ल्यावर येणाऱ्या वाटांवर दरवाजांच्या संरक्षणासाठी तटबंदी आहे. किल्ल्यावर असणाऱ्या अवशेषांत भैरव, रेणुका माता, गणपती व मारुती यांची मंदिरे, पाण्याची अनेक टाकी, विस्तीर्ण तलाव, शेजारी असणारे परशुरामांचे यज्ञकुंड, तर माथ्यावरील परशुराम पादुका व माथ्यावरील मंदिराकडे जाताना खडकात खोदलेली लेणी आहेत. साल्हेर गावातून वर येताना पहिल्या दरवाजावर एक गुजराती भाषेतील शिलालेख आहे. या शिवाय वाघांबे गावाकडून येणाऱ्या वाटेवर एक फार्सी शिलालेख दृष्टीस पडतो. किल्ल्यावर गंगा जमुना आणि गंगासागर नावाची टाकी असून यांतील गंगासागर तलावात मध्यभागी दीपस्तंभ किंवा जलमापन असा दुहेरी योजना असणारा स्तंभ आहे.

माचीवरील दरवाजा, साल्हेर किल्ला, नाशिक.

साल्हेर किल्ला नेमका कधी आणि कोणी बांधला, याबद्दल इतिहासात पुरावे सापडत नाहीत. परंतु या किल्ल्याला परशुरामाची तपोभूमी म्हणून ओळखले जाते. पर्णालपर्वतग्रहणाख्यान  ग्रंथात साल्हेरचा उल्लेख सह्याद्रीचे मस्तक म्हणून केलेला आढळतो. इ. स. चौथ्या शतकात येथे गवळी राजांची सत्ता होती. कदाचित याच राज्यकर्त्यांनी हा किल्ला बांधला असावा, असे सांगितले जाते. चौदाव्या शतकापासून सतराव्या शतकाच्या मध्यापर्यंत या किल्ल्यावर बागूल घराणे, फारूखी घराणे, गुजरातचे सुलतान, दिल्लीचे सुलतान आणि मोगलांनी राज्य केले. किल्ल्याचे उल्लेख तारिख-इ-फिरोझशाही (तारीख-इ-फिरुजशाही) आणि आईन-इ-अकबरी (ऐन-इ-अकबरी) या ऐतिहासिक साधनांत सापडतात. १६३८ मधे औरंगजेबाचा सरदार सईद अब्दुल वाहाब खानदेशी याने हा किल्ला जिंकून मोगल साम्राज्यात आणला. सूरत लुटीच्या वेळी छ. शिवाजी महाराज साल्हेर जवळून गेल्याचे भीमसेन सक्सेना याने आपल्या तारीख-ए-दिलकुशा  या ग्रंथात म्हटले आहे.

रेणुका माता मंदिर, साल्हेर किल्ला, नाशिक.

छ. शिवाजी महाराजांच्या बागलाण मोहिमेत किल्ला स्वराज्यात दाखल झाला (५ जानेवारी १६७१). या हल्ल्यात येथील किल्लेदार फतेह-उल्ला-खान मारला गेला. पुढे फेब्रुवारी १६७२ मध्ये मोगलांनी हा किल्ला जिंकून घेण्याचा असफल प्रयत्न केला. या लढाईत छ. शिवाजी महाराजांचे शूर सेनानी सूर्यराव काकडे मरण पावले. यानंतर छ. संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत हा किल्ला कधीतरी मोगलांच्या ताब्यात गेला. तेव्हा औरंगजेबाने या किल्ल्याचे नाव बदलून ‘सुलतानगड’ ठेवले. १७५२ मधील भाल्कीच्या तहात हा किल्ला परत मराठ्यांकडे आला. १७६८ मधे हा किल्ला व किल्ल्याखालील ६८ लाख रुपये उत्पन्नाचा मुलूख पेशव्यांनी बडोद्याच्या गोविंद गायकवाडांच्या पत्नी गहिनाबाई गायकवाड यांना चोळी बांगडीसाठी दिला. पुढे १८१८ च्या जुलै महिन्यात हा किल्ला इंग्रजांनी जिंकून घेतला.

खडकात खोदलेले पाण्याचे टाके, साल्हेर किल्ला, नाशिक.

साल्हेर किल्‍ल्याच्‍या माथ्यावरून परिसरातील मोरा-मुल्हेर, नाव्ही उर्फ रतनगड, हरगड, पिंपळा यांसारखे अनेक किल्ले दिसतात. तर जैन धर्मीयांचे तीर्थक्षेत्र असलेले मांगी-तुंगी सुळके येथून दिसतात.

 

 

 

 

संदर्भ  :

  • Gazetteer of Bombay Presidency (District Nasik), Government Central Press, Bombay, Nasik, 1883.
  • पाळंदे, आनंद, दुर्गवास्तू, प्रफुल्लता प्रकाशन, पुणे, २०१४.
  • बोरोले, अमित, दुर्गभ्रमंती नाशिकची, स्नेहल प्रकाशन, पुणे, १९१२.

                                                                                                                                                                                            समीक्षक : सचिन जोशी