(जेरूसलेम थॉर्न). तण म्हणून परिचित असलेली एक वनस्पती. वेडी बाभूळ ही बहुवर्षायू सपुष्प वनस्पती फॅबेसी कुलातील असून तिचे शास्रीय नाव पार्किंसोनिया ॲक्युलियाटा आहे. इंग्रज वनस्पतिशास्त्रज्ञ जॉन पार्किंसन (१५६७–१६५०) यांच्या गौरवार्थ या प्रजातीला पार्किंसोनिया हे नाव दिले असून ॲक्युलियाटा याचा अर्थ काटेरी खोड असा आहे. संकेश्वर, गजगा (सागरगोटा) या वनस्पतीही फॅबेसी कुलातील असून त्यांची अनेक लक्षणे वेडी बाभूळ वनस्पतीसारखी आहेत. तिचे मूलस्थान दक्षिण-पश्चिम अमेरिकेतील मेक्सिको, टेक्सास तसेच गालॅपागस बेटे येथील आहे. भारतात कमीअधिक प्रमाणात ती सर्वत्र आढळते. दुष्काळात ही वनस्पती तग धरून राहते.
वेडी बाभूळ ही वनस्पती २—८ मी. उंच वाढते. या वनस्पतीला एक किंवा अनेक खोडे असतात. फांद्या अनेक असून पाने लोंबती असतात. खोड व पाने रोमहीन असतात. पाने संयुक्त, एकाआड एक, १५–२० सेंमी. लांब आणि पिच्छाकार असतात. पर्णवृंत चपटा असून त्याच्या दोन्ही कडांना २५ ते ३० लहान अंडाकार पर्णिका असतात. कोरड्या हवामानामध्ये पर्णिका गळून पडतात आणि मागे राहिलेले पर्णवृंत प्रकाशसंश्लेषणाचे कार्य करतात. जेथे पानांच्या कक्षा असतात तेथे दोन किंवा तीन अणकुचीदार काटे असतात. फुले पिवळी-नारिंगी, सुवासिक, २० मिमी. व्यासाची आणि एकेकटी किंवा आठ ते दहाच्या गुच्छात येतात. फुलांमध्ये निदले ५ आणि दले (पाकळ्या) ५ असतात. ५ पाकळ्यांपैकी ४ पाकळ्या अंडाकार असून पाचवी पाकळी उभी व पिवळी असते आणि तिच्या तळाशी जांभळा ठिपका असतो. शेंगा करड्या, सु. ६ सेंमी. लांब असून त्यात तपकिरी रंगाच्या ४—७ बिया असतात. कुंपणाकरिता व शोभेकरिता ही झाडे लावतात. परागण मधमाश्यांमार्फत होते.
वेडी बाभूळ या वनस्पतीचे सर्व भाग ज्वरनाशक आणि स्वेदकारी (घाम आणणारी) आहेत. बिया खाद्य असून त्यात अल्ब्युमीन व ग्लुटेलीन ही प्रथिने असतात. बियांमध्ये बुळबुळीत द्रव असतो. लाकूड कठीण व जड असून पांढरे व जांभळट तपकिरी असते. ते इंधन म्हणून वापरतात. सालीपासून पांढरा, आखूड परंतु ठिसूळ धागा मिळतो. तो कागद करण्यासाठी वापरतात.
ऑस्ट्रेलियात १९०० मध्ये शोभेसाठी वेडी बाभूळ या वनस्पतीची लागवड करण्यात आली. मात्र तिचा ज्या प्रकारे प्रसार झाला त्यामुळे आता तिला तण मानले जाते. तिचे वाढलेले जाळे घट्ट असते. त्यामुळे प्राणी आणि पाण्याचे प्रवाह यांना अडथळा निर्माण होतो. तिच्या वाढीला अटकाव करण्यासाठी पश्चिम ऑस्ट्रेलियाच्या ज्या भागात तिचा त्रास होतो त्या भागात मुद्दाम विशिष्ट जातीचे भुंगेरे वाढविण्यात आले. हे भुंगेरे या वनस्पतीच्या बिया खातात. त्यामुळे वेडी बाभळीच्या प्रसाराला काही प्रमाणात आळा बसला आहे.