(कॅन्स्कोरा). शंखपुष्पी ही वनस्पती जन्शनेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव कॅन्स्कोरा डिकरेन्स किंवा कॅन्स्कोरा डेक्युसाटा किंवा कॅन्स्कोरा अलाटा आहे. ती मूळची भारत आणि म्यानमार येथील असावी, असा अंदाज आहे. भारतात सर्वत्र व हिमालयात सु. १,८०० मी. उंचीपर्यंत वाढलेली आढळते. पावसाळ्यानंतर दक्षिण कोकण व गुजरात राज्यांत ती सामान्यपणे उगवलेली दिसते. आयुर्वेदात कॉन्हॉल्व्ह्युलस प्ल्युरीकॉलीस जातीच्या वनस्पतींना सुद्धा शंखपुष्पी म्हणतात.
शंखपुष्पीचे बहुवर्षायू झुडूप २५—४० सेंमी. उंच आणि ताठ उभे वाढते. पाने साधी, समोरासमोर, बाणासारखी ४–५ सेंमी. लांब असतात. ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात या वनस्पतीला फुले येतात. फुले पांढरी, पानांच्या बगलेत किंवा फांद्यांच्या अग्रभागी येतात. फुलांचा आकार घंटेसारखा असून निदलपुंज आणि दलपुंज संयुक्त असतात. फळ बोंड प्रकारचे, लहान, लांबट आणि स्फुटनशील असते. फळात अनेक लहान व काळसर बिया असतात.
आयुर्वेदात शंखपुष्पीचा वापर करतात. ती स्मृतिवर्धक मानली जाते. तिच्यापासून तयार केलेले औषध चयापचय क्रिया सुधारण्यासाठी आणि चेतासंस्थेच्या विकारांवर वापरतात. तसेच रेचक म्हणून तिचा उपयोग केला जातो.