(वाइल्ड लाइफ काँझर्व्हेशन). वन्य प्राणी व वनस्पती यांच्या जाती आणि त्यांचे अधिवास यांचे संरक्षण करण्यासाठी केलेले योग्य नियोजन व व्यवस्थापन म्हणजे ‘वन्य जीव संधारण’. वनस्पती आणि प्राणी यांच्या काही जाती नैसर्गिक कारणांमुळे विलुप्त होतात. आधुनिक काळात लोकसंख्या वाढीमुळे मानवी कृती वाढल्या आहेत. त्यामुळे वन्य जीवांना धोका निर्माण झाला आहे. याचा परिणाम म्हणून मागील काही वर्षांत काही सजीवांची संख्या घटली आहे, तर काही सजीव विलुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. म्हणून मानवाने सजीवांच्या संधारणाची गरज असल्याचे मान्य केले आहे. निसर्गातील विविध नैसर्गिक प्रक्रिया नियमित घडून येण्यासाठी पर्यावरणाचा समतोल राखणे आवश्यक असते; त्यात वन्य जीवांची भूमिका महत्त्वाची असते.

मानवाच्या आनंदासाठी व त्याच्या भावी पिढ्यांसाठी निसर्गाचे जतन करणे, हे वन्य जीव संधारणाचे उद्दिष्ट आहे. मानवी कृतींमुळे वन्य जीवांवर संकटे आली असल्याचे आढळून आले आहे. अप्रगत व प्रगत अशा शस्त्रांचा वापर मनुष्याने प्राण्यांच्या हत्येसाठी तसेच शिकारीसाठी केलेला आहे. त्यामुळे प्राण्यांच्या व त्यांच्याबरोबर वनस्पतींच्या अनेक जाती नष्ट झालेल्या आहेत. मानवाने वनांचा ऱ्हास केला, नद्यांवर धरणे बांधली, शेती व उद्योगधंदे यासाठी वनभूमीच्या वापरात बदल केला. अशा सर्व मानवी कृतींमुळे वनस्पती आणि प्राणी यांच्या नैसर्गिक अधिवासाची गंभीर हानी झाली आहे. मानवी हस्तक्षेपामुळे अधिवासातील नैसर्गिक प्रक्रिया बिघडल्या आणि परिणामी अधिवासातील जैवविविधता घटली आहे. नैसर्गिक अधिवास हे लहान क्षेत्र असल्याने मोठ्या परिसंस्थेपासून वेगळे झाले आहे. याशिवाय पर्यावरणीय प्रदूषणाचाही असंख्य वन्य जीवांच्या जातींवर प्रतिकूल परिणाम झाला आहे. मानवी कृतींचा दुष्परिणाम वन्य जीवांवर होत असल्याने वन्य जीव संधारणाची गरज निर्माण झालेली आहे. वन्य जीवांच्या अधिवासाची हानी, त्या क्षेत्राचे विभाजन, त्या क्षेत्रात झालेली घट आणि अधिवासाची अवनती यांमुळे वन्य जीव धोक्यात आले आहेत. हवामान बदल, पर्यावरणीय प्रदूषण, नैसर्गिक संसाधनाचा अतिवापर, निर्वनीकरण इ. बाबी वन्य जीव ऱ्हासाला कारणीभूत आहेत.

वन्य जीवांचे अस्तित्व कमी होऊ नये, म्हणून अठराव्या शतकांच्या अखेरीस वन्य जीव संधारणाची संकल्पना पुढे आली. या प्रयत्नांमधून अनेक राष्ट्रांनी ‘वन्य जीव संरक्षण कायदा’ अंमलात आणला आहे. त्यामुळे काही दुर्मीळ प्रजातींचे संरक्षण झाले आहे. तरीही शेकडो प्राणी-प्रजाती आणि हजारो वनस्पती-प्रजाती विलुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. उदा., आशिया खंडातील सिंह, बंगाली वाघ, ब्लू व्हेल, पर्वतीय गोरिला इ. प्राणी, तसेच रोझवुड, चेस्टनट, ब्लॅक कोबी इ. वनस्पती विलुप्त होणाऱ्या सजीवांची उदाहरणे आहेत.

वन्य जीव संधारणाचे महत्त्व : मानवासाठी वन्य जीव पुढील कारणांसाठी महत्त्वाचे आहेत –

(१) सौंदर्य : निसर्गातील प्रत्येक वनस्पती आणि प्राणी यांच्या प्रजाती परस्परांपेक्षा भिन्न आहेत. त्यामुळे निसर्गाच्या सौंदर्यात भर पडलेली आहे. निसर्ग सौंदर्यामुळे असंख्य लोकांना जीवन ऊर्जा लाभते. तसेच अनेकांना मनोरंजनासाठी निसर्गाचे सौंदर्य आवडते.

(२) आर्थिक मूल्य : प्राणी आणि वनस्पती यांच्या अनेक वन्य जातींमुळे मौल्यवान वस्तू व पदार्थ उपलब्ध होतात. अनेक राष्ट्रांच्या अर्थव्यवस्थेत वन्य जीवांपासून उपलब्ध होत असलेल्या पदार्थांचा मोलाचा वाटा असतो. औद्योगिक राष्ट्रांमध्ये वन्य जीवांची ही क्षेत्रे मनोरंजनासाठी व आनंदासाठी आहेत. या माध्यमातून या देशांना मोठा महसूल मिळतो.

(३) वैज्ञानिक मूल्य : वन्य जीवांच्या अभ्यासातून निरनिराळ्या सजीवांच्या जीवन-प्रक्रियांचे बहुमोल ज्ञान मिळते. या अभ्यासाचा उपयोग मानवी जीवनमानाची, तसेच मानवी शरीराच्या कार्याची कारणमीमांसा करण्यासाठी होतो. वन्य जीवांच्या अभ्यासामुळे वैद्यकीय ज्ञानात भर पडली आहे. महत्त्वाची औषधनिर्मिती करण्यासाठी वन्य जीवांचा अभ्यास उपयुक्त ठरला आहे. पर्यावरण प्रदूषणाचा परिणाम वन्य जीवांवर कसा झाला आहे, याच्या अभ्यासावरून त्याचा मानवावर कसा विपरित परिणाम होऊ शकतो, हे जाणण्यासाठी वन्य जीव अभ्यास उपयुक्त ठरला आहे.

(४) जीवित मूल्य : पृथ्वीच्या जीवनप्रणालीत प्रत्येक वन्य जीव जातीचे योगदान आहे. सजीवांच्या प्रणालीत समतोल राखण्यास वन्य जीवांची मदत होते. या प्रणालीचे कार्य निरंतर राहणे, मानवी जीवनासाठी आवश्यक आहे. त्यामुळे एका जीवनप्रणालीचा अंत हा मानवासह सर्व जीवनप्रणालींचा शेवट ठरू शकतो.

दुर्मीळ वन्य जीव : दुर्मीळ वन्य जीवांचे पुढील तीन गटांत वर्गीकरण केले जाते.

(१) विलुप्त होणाऱ्या प्रजाती : काही प्रजाती विलुप्त होण्याच्या मार्गावर असून त्यांची स्थिती गंभीर आहे. त्यांच्या जीवनाला धोका असल्याने मानवाकडून त्यांना थेट संरक्षण मिळणे आवश्यक आहे.

(२) असुरक्षित प्रजाती : काही सजीवांच्या प्रजाती पर्यावरणाच्या प्रतिकूल स्थितीमुळे असुरक्षित आहेत. त्यांना ‘धोक्यातील प्रजाती’ म्हटले जाते. एकाच प्रजातीचे जीव बहुसंख्येने एकाच भागात राहत असतील तरीही धोका निर्माण होतो. शिकार, मत्स्यपकड, प्राणी पकडणे, मांस मिळवणे, अटकाव घालणे इत्यादींमुळे या प्रजातींना धोका असतो.

(३) कमी जोखमीच्या प्रजाती : त्यांना ‘दुर्लभ प्रजाती’ असेही म्हणतात. त्यांची संख्या मर्यादित असते. ते ठराविक भौगोलिक क्षेत्रात राहतात. परंतु त्यांची संख्या कमी होत नाही.

संधारण पद्धती : वन्य जीव संधारणाच्या पद्धती या वन्य सजीवांना कोणत्या कारणांमुळे धोका आहे, यांवर अवलंबून असतात. वन्य जीवांना मुबलक अन्न, पाणी व योग्य निवारा यांची उपलब्धता असलेल्या अधिवासात ठेवता येते. ही ‘अधिवास व्यवस्थापन’ पद्धती आहे. यात मृदा संधारण, उत्तम वानिकी (वनविद्या) आणि जलव्यवस्थापन या बाबींचा समावेश होतो.

प्राण्यांची हत्या किंवा शिकार केली जाते, त्यावर कायद्याने प्रतिबंध घालून वन्य जीवांचे संरक्षण केले जाते. जर काही प्रजाती त्यांच्या नैसर्गिक अधिवासात जगू शकत नसल्यास त्यांच्याबाबत वेगळे नियम किंवा कायदे करून, ताब्यात घेऊन, त्यांची वाढ करून संरक्षित क्षेत्रात ठेवली जातात. लहान अधिवासात वनस्पती केंद्रित झाल्यास त्यांच्या वाढीस धोका पोहोचतो. असे संपूर्ण क्षेत्र संरक्षित करायचे झाल्यास, ते ‘राष्ट्रीय उद्यान’ किंवा ‘वन्य जीव संरक्षण क्षेत्र’ म्हणून घोषित केले जाते. काही वेळा धोक्यात असलेल्या वन्य जीवांची शिकार दुसऱ्या प्राण्यांकडून होते. त्यांवर नियंत्रण ठेवून धोक्यात असलेल्या प्रजातीची योग्य संख्या कशी राहील, हे पाहिले जाते. काही वेळा एकच प्रजाती संख्येने वाढल्यास त्यांना स्वत:च्या जीविताची भीती असते. ज्या प्रजाती रोगांमुळे मृत्युमुखी पडतात, तेव्हा त्यांच्या अधिवासाची स्वच्छता राखली जाते. वन्य जीव संधारणाचे यश हे वन्य जीव प्रजातीच्या पारिस्थितिकीचे ज्ञान किती आहे, यावर अवलंबून असते. थोडक्यात वन्य जीव ज्या अधिवासात राहतात, तो अधिवास कोणत्या घटकामुळे प्रभावित आहे, यासंबंधीची माहिती वन्य जीव संधारणासाठी गरजेची असते.

संयुक्त राष्ट्रांच्या स्थापनेनंतर १९४५ मध्ये जागतिक पातळीवर वन्य जीव संधारणास आंतरराष्ट्रीय सहकार्य मिळू लागले. संयुक्त राष्ट्रांच्या फुड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन आणि यूनेस्को यांनी वन्य जीव संधारण कार्यक्रम आखला आहे. १९५६ मध्ये निसर्गाच्या संरक्षणासाठी आंतरराष्ट्रीय संघ स्थापन झाले आहे. निसर्ग आणि नैसर्गिक संसाधने संधारणाकरिता ‘जागतिक वन्य जीव निधी’ उभारण्यात आला. त्याला ‘जागतिक स्तरावरील निसर्ग निधी – वर्ल्ड वाइड फंड फॉर नेचर’ (डब्ल्यूडब्ल्यूएफएन) म्हणतात.

वन्य जीव संधारण : (१) कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान, (२) पेरियार राष्ट्रीय उद्यान, (३) गीर राष्ट्रीय उद्यान, (४) दाचिगाम (काश्मीर) राष्ट्रीय उद्यान.

वन्य जीव संधारणासाठी सध्या जगात सु. ३७,००० संरक्षित क्षेत्रे अस्तित्वात आहेत. वन्य जीव संधारणाच्या गरजा पुरवण्यासाठी अनेक व्यावसायिक, संशोधक, पारिस्थितिकीतज्ज्ञ, जीवविज्ञानतज्ज्ञ संशोधन-विकासाचे कार्य करीत आहेत. हे विषयतज्ज्ञ वनस्पती आणि प्राणी यांच्या संवर्धनासाठी, तसेच पर्यावरणाच्या व्यवस्थापनासाठी साहाय्य करीत आहेत.

भारतात वन्य जीव संधारण सतराव्या शतकापासून केले जात आहे. प्रारंभी ते ठरावीक सजीवांच्या प्रजातींसाठी आणि ठराविक भौगोलिक प्रदेशापुरते मर्यादित होते. १९७२ मध्ये भारतात ‘वन्य जीव संरक्षण कायदा’ राष्ट्रीय स्तरावर अंमलात आणला गेला. भारतात त्यानंतर वन्य जीवांच्या संरक्षणाकरिता अनेक प्रकल्प राबवले गेले आहेत. भारतात वन्य जीवांच्या संरक्षणासाठी सु. ८७० क्षेत्रे राखून ठेवण्यात आलेली असून त्यांची वर्गवारी राष्ट्रीय उद्याने (१०४), अभयारण्ये (५५१), संवर्धन क्षेत्रे (८८) आणि समुदायाने चालवलेली क्षेत्रे (१२७) अशी आहे. या क्षेत्रांमध्ये वाघांसाठी कान्हा (मध्य प्रदेश), बंदिपूर (कर्नाटक), कॉर्बेट (उत्तराखंड), सुंदरबन (प. बंगाल), मेळघाट (महाराष्ट्र), येथील व्याघ्र प्रकल्प; एकशिंगी गेंड्यांकरिता काझिरंगा अभयारण्य (आसाम); हत्तींसाठी सिंहभूम (झारखंड), मयूरभंज (ओडिशा), निलगिरी (तमिळनाडू), पेरियार (केरळ) येथील गज प्रकल्प; सिंहांसाठी गीर राष्ट्रीय उद्यान (गुजरात), हिमालयातील निरनिराळ्या प्राण्यांसाठी दाचिगाम (काश्मीर) राष्ट्रीय उद्यान इत्यादी क्षेत्रे मुख्य आहेत.