भारतात पुरातत्त्वशास्त्राच्या अभ्यासाला प्रोत्साहन देण्यासाठी समर्पित शैक्षणिक व्यासपीठ असलेली संस्था. या परिषदेची स्थापना १९६७ मध्ये बनारस हिंदू विद्यापीठाच्या प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती आणि पुरातत्त्व विभागात वाराणसी येथे झाली. ए. के. नारायण, बी. पी. सिन्हा इत्यादी पुरातत्त्वज्ञांच्या प्रयत्नांमधून पुरातत्त्वीय ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी व तरुण पुरातत्त्वज्ञांना वैचारिक आदानप्रदानासाठी एक व्यासपीठ या परिषदेने उपलब्ध करून दिले. प्रारंभापासूनच डेक्कन कॉलेजचे तत्कालीन संचालक ह. धी. सांकलिया व भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाचे तत्कालीन महासंचालक ए. घोष असे भारतातील अग्रणी पुरातत्त्वज्ञ परिषदेशी संबंधित होते. परिषदेच्या वाढीमध्ये ए. के. नारायण, बी. पी. सिन्हा, बी. के. थापर, स्वराज्यप्रकाश गुप्ता, वीरेंद्रनाथ मिश्र, बी. बी. लाल, के. व्ही. सुंदरराजन आणि के. एन. दीक्षित यांनी योगदान दिले आहे.
भारतीय पुरातत्त्व परिषद नवी दिल्ली येथे स्थलांतरित झाली (१९७०) व तेथून ती सध्या कार्यरत आहे. १९६८ मध्ये वाराणसीमध्ये भरलेल्या पहिल्या वार्षिक चर्चासत्रात परिषदेच्या पुरातत्त्व या नियतकालिकाचा पहिला अंक प्रसिद्ध झाला. हे नियतकालिक अव्याहतपणे चालू असून २०२० मध्ये पन्नासावा अंक प्रकाशित झाला आहे. हे नियतकालिक भारतीय पुरातत्त्वाच्या संदर्भात माहितीचा प्रथम दर्जाचा स्रोत असल्याचे मानले जाते. याशिवाय परिषदेतर्फे पुराप्रवाह हे हिंदी नियतकालिक प्रकाशित केले जाते. परिषद नियमितपणे समविचारी संस्थांच्या सहकार्याने वार्षिक चर्चासत्रे, कार्यशाळा आणि परिसंवाद आयोजित करते, ज्यात भारत आणि भारताबाहेरील विद्वान सक्रिय सहभाग घेतात.
नवी दिल्ली येथे परिषदेच्या मुख्यालयात परिषदेने स्थापन केलेले ‘इंद्रप्रस्थ संग्रहालयʼ असून त्यात देशविदेशांतील पुरावस्तूंचा उत्तम संग्रह आहे. यामध्ये प्रागितिहासाचे अभ्यासक ए. पी. खत्री यांनी गोळा केलेल्या विविध प्रागैतिहासिक अवजारांचा आणि नर्मदा नदीच्या परिसरातील जीवाश्मांचाही समावेश आहे.
संदर्भ :
समीक्षक : शंतनू वैद्य