बोटा, पॉल-एमिल : (६ डिसेंबर १८०२ – २९ मार्च १८७०). विख्यात पुरातत्त्वज्ञ आणि  फ्रेंच मुत्सद्दी. त्यांचा जन्म रोजी इटलीतील ट्युरिन येथे झाला. त्यांचे वडील कार्लो बोटा हे पेशाने डॉक्टर आणि हौशी इतिहासकार होते. त्यांच्या वडिलांनी १८१४ मध्ये फ्रेंच नागरिकत्व घेतले व फ्रान्सला स्थलांतर केले. वयाच्या अठराव्या वर्षी पॉल-एमिल बोटा यांनीही वडिलांप्रमाणे डॉक्टर होण्यासाठी वैद्यकीय विद्यापीठात प्रवेश घेतला; पण १८२६ मध्ये अचानक शिक्षण सोडून त्यांनी जगप्रवास करण्याचे ठरवले. तीन वर्षांच्या प्रवासात त्यांनी अनेक दुर्मीळ औषधी वनस्पती व प्राण्यांचे नमुने गोळा केले.

पुढे विद्यापीठातून वैद्यकीय पदवी घेतल्यानंतर (१८३०) बोटा पुन्हा प्रवासाला निघाले. सुरुवातीला ते अनेक महिने इजिप्तमध्ये फिरले आणि नंतर सिरियाला व येमेनला गेले (१८३३). या प्रवासात त्यांनी आपल्याजवळचा औषधी वनस्पती आणि खनिजांचा संग्रह वाढविला; तथापि त्यांचा संशोधनाचा हा उद्योग पुढे चालला नाही. कारण त्यांनी १८४२ मध्ये राजनैतिक अधिकाऱ्याची नोकरी स्वीकारली. प्रारंभी बोटा यांची नेमणूक इजिप्तमधील अलेक्झांड्रिया येथे झाली. परंतु तेव्हा ऑटोमन (ओटोमान) साम्राज्याचा भाग असलेल्या मेसोपोटामियात (सध्याचा इराक) पुरातत्त्वविद्येत रस असणारा अधिकारी असावा, असे फ्रेंच सरकारला वाटल्याने बोटा यांना वाणिज्यदूत (कॉन्सुल जनरल) म्हणून मोसुल (इराक) येथे पाठवण्यात आले. ही त्यांच्या पुरातत्त्वीय कारकिर्दीची सुरुवात होती.

नोकरी करत असतानाचा बोटा यांना जुन्या काळातील वास्तू व कलाकृती यांच्यात अधिकाधिक रस वाटू लागला. आपले दूतावासातले काम सांभाळून ते शहराभोवती फिरून सर्वेक्षण करत असत. त्या काळात प्राचीन अॅसिरियामधल्या आता विलुप्त झालेल्या शहरांबद्दल त्यांना कुतूहल निर्माण झाले. या शहरांची लिखित वर्णने उपलब्ध होती. त्यानुसार बोटा यांनी मोसुल शहराच्या समोर टायग्रीस नदीच्या पलीकडच्या तीरावर तेल क्वायुनिक (Tell Quyunjik) या ठिकाणी उत्खनन सुरू केले. या कामासाठी त्यांना पॅरिसच्या फ्रेंच एशियाटिक सोसायटीने मदत केली होती. या ठिकाणी आपल्याला प्राचीन ॲसिरियाची राजधानी निनेव्ह (निनेवे) (Nineveh) सापडली असल्याचे त्यांना वाटले. तसे त्यांनी पॅरिसला कळवलेही, पण नंतर त्यांनी काही महिन्यांतच हे काम बंद करून मोसुलजवळ असलेल्या खोरासाबाद (Khorasabad) येथे उत्खनन सुरू केले. पुढे ब्रिटिश पुरातत्त्वज्ञ सर ऑस्टेन हेन्री-लेअर्ड (१८१७-१८९४) यांनी याच ठिकाणी टेकाडांवर पद्धतशीर उत्खनन करून बायबलमध्ये वर्णन केलेल्या निनेव्हचा शोध लावला.

खोरासाबाद उत्खननातील (१८४३-१८५४) अवशेष पाहून बोटा यांना हेच निनेव्हचे ठिकाण असल्याचे वाटले, कारण येथे त्यांना अनेक कोरीव लेख, उत्कृष्ट शिल्पे, कलावस्तू आणि भव्य राजवाडा सापडला. परंतु हा समज चुकीचा होता. त्यांनी तसे सरकारला कळवल्यावर सरकारने पुढील उत्खननाची जबाबदारी घेतली आणि त्यांच्याकडे अनेक तज्ज्ञ आणि साहाय्यक पाठवले. त्यात यूजीन फ्लान्दिन (Eugene Flandin) या निष्णात चित्रकाराचा समावेश होता. त्याने खोरासाबाद येथे मिळालेल्या अनेक नाजूक आणि जवळजवळ नष्ट झालेल्या प्राचीन वस्तूंचे जतन करण्याची मोलाची कामगिरी केली. बोटा यांनी उत्खननात मिळालेल्या अनेक कलाकृती व प्राचीन अवशेष फ्रान्सला रवाना केले. खोरासाबादमधील अनेक शिल्पे आता पॅरिसमधील लूव्र संग्रहालयात आहेत. बोटा यांना प्रत्यक्षात प्राचीन ॲसिरियामधल्या दुसरा सर्गोन (Sargon II) या राजाचा प्रासाद सापडला होता. या राजाने इ.स.पू. ७२२ ते ७०५ या काळात राज्य केले असून दूर शाहरूकीन (Dur Sharrukin) ही त्याची राजधानी होती. खोरासाबाद म्हणजेच प्राचीन दूर शाहरूकीन असल्याचे बोटा यांच्या मृत्यूनंतर सिद्ध झाले. ॲसिरियामधल्या पुरातत्त्वीय अवशेषांचे संशोधन करणारे ते पहिले पुरातत्त्वज्ञ होते. केवळ प्राचीन अवशेष शोधणे महत्त्वाचे नसून त्या अवशेषांचा अर्थ लावण्याच्या त्यांच्या संशोधनामुळे ॲसिरिया आणि तेथील लोकांच्या जीवनाबद्दल आणि संस्कृतीबद्दल अधिक जाणून घेण्याची उत्सुकता वाढीस लागली.

बोटा वृद्धापकाळापर्यंत कार्यरत होते. नोकरीतील काम वेगळे असूनही ते नेहमी काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करीत असत. १८४६ ते १८६८ या काळात त्यांनी जेरूसलेम व त्रिपोली (ट्रिपोली) (लिबिया) येथे वाणिज्यदूत म्हणून काम केले. पण मायदेशी परतण्याच्या इच्छेने त्यांनी नोकरी सोडली आणि ते फ्रान्सला परतले.

फ्रान्समधील अशेरे येथे त्यांचे निधन झाले.

संदर्भ :

  • Lloyd, Seton, Foundations in the Dust: The Story of Mesopotamian Exploration, Thames and Hudson, New York, 1980.
  • https://www.britannica.com/biography/Paul-Emile-Botta
  • https://www.encyclopedia.com/science/encyclopedias-almanacs-transcripts-and-maps/paul-emile-botta
  • https://www.oxfordreference.com/view/10.1093/oi/authority.20110803095520213
  • https://www.istmira.com/w-hist/modern-history/2497-paul-emile-botta-a-short-biography.html

                                                                                                                                                                                    समीक्षक : जयेंद्र जोगळेकर