दी पर्थ, जाक बुशे : (१० सप्टेंबर १७८८– ५ ऑगस्ट १८६८). प्रागैतिहासिक पुरातत्त्व आणि भूविज्ञान यांची सांगड घालणारे हौशी फ्रेंच पुरातत्त्वज्ञ, नोकरशहा व लेखक. पूर्ण नाव जाक बुशे दी क्रेव्हकोर दी पर्थ. त्यांचा जन्म रोजी फ्रान्सच्या उत्तर सीमेजवळील आर्डेन या प्रदेशातील रेथेल या गावात झाला. त्यांचे वडील जूल्स-अर्मांड दी क्रेव्हकोर हे स्थानिक उमराव तसेच नेपोलियनच्या काळात सोम नदीच्या मुखापाशी असलेल्या अबीव्हील या शहरात सीमाशुल्क अधिकारी आणि पॅरिसच्या अकॅडमी ऑफ सायन्सेसचे सदस्य होते. पुढे जाक बुशे यांनी आईच्या घराण्याला अधिक प्रतिष्ठा असल्याने आईच्या घराण्याचे नाव ‘दी पर्थʼ जोडून मूळ नावातील दी क्रेव्हकोर (de Crèvecoeur) हे शब्द काढून टाकले.

जाक बुशे हे देखणे, दणकट, एखाद्या खेळाडूसारखी शरीरयष्टी असलेले आणि घोडेस्वारीत निष्णात होते. त्यांचे शिक्षण जरी अधिकृतपणे झाले नसले, तरी त्यांनी स्वयंप्रेरणेने अनुभवातून स्वतःला घडवले होते. लहानवयातच ते सीमाशुल्क अधिकारी झाले व त्यांची नेमणूक नेपोलियनने नव्याने जिंकलेल्या, उत्तर इटलीतील जेनोवा या शहरात झाली. तेथे पाच वर्षे राजसेवा केल्यानंतर जाक बुशे यांना फ्रान्सला परत बोलावण्यात आले. तेथे त्यांची कस्टम खात्यातील सेवा १८१४ मध्ये फ्रान्सचा पराभव होईपर्यंत चालू राहिली. त्यानंतर जाक बुशे यांनी लेखन सुरू केले. काव्य व काही नाटके लिहिली; तथापि त्यात त्यांना फारसे यश मिळाले नाही.

फ्रान्समध्ये राजकीय घडी काहीशी स्थिरस्थावर झाल्यावर नवीन राजवटीला अनुभवी अधिकाऱ्यांची गरज असल्याने जाक बुशे यांना पुन्हा सीमाशुल्क खात्यात नेमणूक मिळाली. थोड्या कमी दर्जाच्या पदांवरील नेमणूक स्वीकारून ते सेवेत रुजू झाले (१८२३). त्यानंतर दोन वर्षांनी त्यांना त्यांच्या वडिलांच्या पदावर अबीव्हील येथे नेमण्यात आले. या पदावर ते पुढील सत्तावीस वर्षे होते. तथापि १८५२ मध्ये तत्कालीन सम्राट तिसरा नेपोलियन याच्या धोरणाविरुद्ध गुप्त पत्रके पसिद्ध केल्याने त्यांची हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर ते मृत्यूपर्यंत अबीव्हील येथेच स्थायिक झाले होते.

अबीव्हील येथे असताना जाक बुशे यांनी एक संस्था स्थापन केली होती. एखाद्या क्लबप्रमाणे असलेल्या या संस्थेत (Sociétie d’ Émulation) डॉक्टर, लेखक, कवी, चित्रकार, रंगकर्मी, व्यापारी, वकील, धर्मगुरू अशा अनेकजणांचा समावेश होता. तीन दशके या संस्थेच्या बैठकांमध्ये निबंध वाचले जात असत. ज्ञानविज्ञान व तत्त्वज्ञान या विषयांवर चर्चा चालत असत आणि जाक बुशे संस्थेच्या नियतकालिकात लेखन करत असत. त्यांनी अबीव्हीलच्या वास्तव्यात विविध विषयांवर प्रचंड लेखन (४९ पुस्तके, शेकडो प्रकाशित लेख आणि असंख्य अप्रकाशित हस्तलिखित निबंध) केले.

जाक बुशे दी पर्थ यांनी जमा केलेली प्रागैतिहासिक अवजारे.

सीमाशुल्क खात्यात सेवा करत असतानाच जाक बुशे यांनी सोम नदीच्या खोऱ्यात पुरातत्त्वीय शोधकार्याची सुरुवात केली (१८२५). त्यांना प्रागितिहासात रस निर्माण झाला याचे कारण पेशाने डॉक्टर असलेले हौशी निसर्गवैज्ञानिक कासीमीर पिकार्ड (१८०६–१८४१) हे त्यांच्या संपर्कात आले. जाक बुशेंना १८३७ मध्ये फ्लिंट दगडांपासून बनवलेली हातकुऱ्हाड आणि काही अवजारे मिळाली. तसेच त्यांना आता विलुप्त झालेल्या सस्तन प्राण्यांची (हत्ती व गेंडे) निक्षेपात अडकलेली हाडे आढळली. यानंतर त्यांनी नदीच्या एका मंचकावर (Terrace) खणलेल्या खड्ड्यांमधून दगडी अवजारे गोळा करणे सुरू केले. जाक बुशेंनी १८४७ मध्ये केल्टिक अँड अँटेडिलुवियल अँटिक्विटीज (Les Antiquités Celtiques et Antédiluviennes) हे पुस्तक प्रकाशित केले. त्यात त्यांनी आपल्या संशोधनासाठी सर्वप्रथम भू-पुरातत्त्व (Geo-archaeology) असा शब्द वापरला होता. त्यांनी या अवशेषांवरून असा निष्कर्ष काढला की, बायबलमधील जेनेसिसमध्ये वर्णन केलेल्या महापुराच्या (Delug) अगोदर मानव अस्तित्वात असले पाहिजेत. जगाच्या उगमासंबंधी बायबलप्रणीत तत्कालीन सिद्धांतापेक्षा हा निश्चित वेगळा, क्रांतिकारी विचार होता. त्या काळातील निसर्गविज्ञानावर प्रख्यात फ्रेंच वैज्ञानिक जॉर्ज कुविए (१७६९–१८३२) यांच्या विचारांचा पगडा होता. महापुराच्या आधी मानवी अस्तित्व असल्याचे कुविए यांना मान्य नव्हते. लेखनात अमाप कल्पनाविलास असल्याने व संशोधनाला शिस्त नसल्याने वैज्ञानिक जगतात जाक बुशेंचे लेखन कोणीही गांभीर्याने घेत नसे. नेमके हेच झाल्याने त्यांचे प्रागितिहासातील लक्षणीय योगदान दीर्घकाळ दुर्लक्षित राहिले. नंतरच्या काळात ब्रिटिश भूवैज्ञानिक सर चार्ल्स लायेल यांनी जाक बुशे यांनी गोळा केलेली अवजारे व उत्खनने पाहून त्यांच्या प्रतिपादनाला दुजोरा दिला.

आयुष्याच्या अखेरीस जाक बुशे यांना काहीशी प्रतिष्ठा मिळाली. तिसऱ्या नेपोलियन बादशहाने त्यांचा सन्मान केला आणि त्यांनी जमवलेल्या प्रागैतिहासिक वस्तूंच्या प्रदर्शनाला राष्ट्रीय संग्रहालयात जागा दिली. इतकेच नाही, तर पॅरिस आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात त्यांनी जमवलेली अवजारे लोकांना पाहण्यासाठी ठेवण्यात आली (१८६७).

अबीव्हील येथे ते मरण पावले.

संदर्भ :

  • Cohen, Claudine &  Hublin, Jean-Jacques, Boucher de Perthes. Les Origines Romantiques de la Préhistoire, Belin, Paris, 1989.
  • Sackett, J. ‘Boucher de Perthes and the Discovery of Human Antiquityʼ, Bulletin of the History of Archaeology, 24, 2014.
  • https://www.archaeologybulletin.org/articles/10.5334/bha.242/

                                                                                                                                                                               समीक्षक : जयेंद्र जोगळेकर