बोर्डे, फ्रान्स्वा : (३० डिसेंबर १९१९ – ३० एप्रिल १९८१). फ्रेंच भूवैज्ञानिक, प्रागैतिहासिक पुरातत्त्वज्ञ आणि फ्रान्सिस कारसॅक या टोपणनावाने विज्ञानकथा लिहिणारे लेखक. पूर्ण नाव हेन्री लुई फ्रान्स्वा बोर्डे. त्यांचा जन्म नैर्ऋत्य फ्रान्सच्या पेरीगो नॉय (Périgord Noir) प्रदेशात रिवा (Rives) या गावी झाला. बोर्डे हे लहानवयातच पुरातत्त्वाकडे आकर्षित झाले होते. त्याला कारण म्हणजे त्या काळी अतिशय लोकप्रिय अशी ला गेर्री फू (La Guerre de Feu) ही कादंबरी. जोसेफ व सेरांफा बोएक्स या दोन बंधूंनी जे. एच. रोस्नी या टोपणनावाने लिहिलेली ही कादंबरी प्रागैतिहासिक काळातील अद्भुतरम्य प्रेमकथा होती. सुखवस्तू घरात जन्मलेल्या बोर्डे यांना उत्तम शिक्षण सहज मिळाले आणि बालवयापासूनच आजूबाजूच्या परिसरात फिरण्याच्या आवडीमुळे त्यांना निसर्गविज्ञान, प्राचीन इतिहास व संस्कृती यांत रस निर्माण झाला. बोर्डे यांना वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी ले रोक द गुवादाँ  (Le Roc de Gauvaudun) या शैलाश्रयाच्या उत्खननाची परवानगी मिळाली होती.

बोर्डे यांनी भूविज्ञान आणि जीवविज्ञानातील उच्च शिक्षणासाठी बोर्डो विद्यापीठात (University of Bordeaux) प्रवेश घेतला (१९३६). पुढे त्यांची पत्नी झालेली डेनिस डी सोनव्हिल-बोर्डे ही त्यांना तेथेच भेटली. या दोघांनी नंतर एकत्र काम केले. पुढे दुसरे महायुद्ध सुरू झाल्यानंतर बोर्डे सैन्यात भरती झाले. फ्रान्सचा पाडाव झाल्यावर ते काही काळ स्थानबद्ध होते. जर्मनीने सगळा फ्रान्स व्यापल्यानंतर बोर्डे नाझींविरूद्ध फ्रेंच प्रतिकार चळवळीत (French Resistance) सहभागी झाले (१९४२). भूमिगत राहून त्यांनी अनेक कारवायांमध्ये भाग घेतला. या दरम्यान ग्रेनेडमुळे गंभीर जखमी झाल्याने त्यांची ही गुरीला लढवय्याची (Maquisard) कारकिर्द संपुष्टात आली. या काळातील त्यांच्या अनुभवांमुळे ते कडवे राष्ट्राभिमानी झाले. ते कटाक्षाने फ्रेंच भाषाच वापरत, कारण त्यांच्या मनात अखेरपर्यंत इंग्लिश भाषिकांबद्दल काहीशी संशयाची भावना होती.

दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर बोर्डे पुन्हा विद्यापीठीय शिक्षणाकडे परतले आणि त्यांनी सॉबॉन विद्यापीठातून (University of Sorbonne) डॉक्टरेट पदवी प्राप्त केली (१९५१). त्यांच्या प्रबंधाचा विषय पॅरिस भागातील भूपुरातत्त्वीय संशोधन असा होता. पुढे ते विद्यापीठात प्राध्यापक झाले (१९५६) आणि अखेरपर्यंत ते तेथेच होते.

बोर्डे यांनी फ्रान्समधील कोंबे ग्रेनाल या यूरोपातील मध्य पुराश्मयुगीन मुस्टेरियन (Mousterian) संस्कृतीच्या स्थळाचे उत्खनन केले. या ठिकाणी गुहेमध्ये मुस्टेरियन संस्कृतीच्या काळातील (१,७५,००० ते ५०,००० वर्षपूर्व) निअँडरथल मानवांच्या वस्तीचे ५५ स्तर मिळाले असून त्याखालील ९ स्तर अश्युलियन संस्कृतीचे आहेत. त्याचप्रमाणे त्यांनी निअँडरथल मानवांचे अवशेष आढळलेल्या पेच दु एलाज (Pech de l’Azé) या गुहेचे उत्खनन केले.

बोर्डे यांच्या कामाचे महत्त्व त्यांच्या शोधलेल्या पुरातत्त्वीय स्थळांबाबत तितकेसे नाही, तर त्यांनी उत्खननात आणि विश्लेषण तंत्रात आणलेल्या नाविन्यपूर्ण पद्धतींमध्ये आहे. उत्खननातून मिळालेल्या दगडी अवजारांचे विश्लेषण करून त्यांनी त्यामधून अर्थ काढण्याची अभिनव कल्पना वर्गीकरणातून पुढे आणली. त्यांच्या या कामाचा काही प्रमाणात जागतिक पातळीवर आणि संपूर्ण युरेशियामध्ये वापरल्या जाणाऱ्या प्रागैतिहासिक निष्कर्ष पद्धतींवर खोल परिणाम झाला. तसेच १९६० ते १९८० या काळात पुरातत्त्वातील पद्धती आणि सिद्धांतांवर झालेल्या गहन वादविवादांमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. बोर्डे हे स्वतः दगडी अवजारांच्या प्रतिकृती तयार करण्यात कुशल होते. तसेच प्रागितिहासात संख्याशास्त्राच्या वापराचे ते खंदे समर्थक होते.

बोर्डे यांनी दगडी अवजारांच्या वर्गीकरणाची जी पद्धत तयार केली होती, ती मध्य पुराश्मयुगीन मानवांच्या वर्तनासाठी आहे. बोर्डेंची वर्गीकरण पद्धत हा यूरोपीय प्रागितिहासातील महत्त्वाचा टप्पा आहे. कारण त्यांच्या या कामामुळे अवजारांच्या वर्णनातील व वर्गीकरणातील संदिग्धता काही प्रमाणात कमी झाली. परंतु निश्चित मानकांवर आधारीत अशी पद्धत नसल्याने दोन किंवा जास्त पुरातत्त्वीय स्थळांवरील अवजारांच्या तौलनिक अभ्यासात अडचणी येत असत. एक प्रकारे बोर्डेंच्या वर्गीकरणामुळे वैज्ञानिकदृष्ट्या वस्तुनिष्ठ तुलनेसाठी पद्धत उपलब्ध झाली; तथापि हा निव्वळ वस्तुनिष्ठतेचा आभासच ठरला, असे या पद्धतीच्या टीकाकारांनी म्हटले आहे. ही पद्धत आधुनिक सांख्यिकी विश्लेषणासाठी उपयुक्त नाही आणि प्राचीन मानवी वर्तनासंबंधी निष्कर्ष काढायला ती अपुरी आहे, असे प्रतिपादन अनेक पुरातत्त्वज्ञांनी केले आहे.

निव्वळ दगडी अवजारे यांना अतिशय गुंतागुंतीच्या मानवांच्या वर्तनाचे योग्य निर्देशक (behavioural indicators) मानणे पुरेसे नाही, असा आक्षेप या पद्धतीवर घेण्यात आला. तसेच जी दगडी अवजारे आपल्यासमोर पुरातत्त्वीय उत्खननांमधून येतात, ती बनवत असताना त्या वेळच्या माणसांच्या मनात तयार झालेल्या आकारांनुसार त्यांचे प्रत्यक्षातील रूप घडते,  हे बोर्डे यांचे गृहीतक पॉल मेलार्स, हॅरॉल्ड डिबल, जेम्स सॅकेट व स्टिव्हन कुन्ह अशा अनेक पुरातत्त्वज्ञांना मान्य नव्हते. त्यात नवपुरातत्त्वाचे एक अग्रणी अमेरिकन पुरातत्त्वज्ञ लुईस बिनफर्ड यांचाही समावेश होता.

बोर्डे यांनी फ्रान्सिस कारसॅक या टोपणनावाने अनेक विज्ञानकथा आणि सात कादंबऱ्या लिहिल्या. रशियन आणि जवळजवळ सर्व पूर्व यूरोपीय भाषांमध्ये त्यांचे अनुवाद अत्यंत लोकप्रिय होते; तथापि त्यांची एकही साहित्यकृती इंग्लिश भाषेत आली नाही.

अमेरिकेतील टक्सन येथे प्रवासात असताना त्यांचे निधन झाले.

संदर्भ :

  • Bisson, Michael S. ‘Nineteenth Century Tools for Twenty-First Century Archaeology? Why the Middle Paleolithic Typology of François Bordes Must Be Replacedʼ, Journal of Archaeological Method and Theory,  7 (1): 1-48, 2000.
  • Kolpakov, E. M. & Vishnyatsky, L. B. ‘Bordes Methodʼ, Norwegian Archaeological Review, 22(2): 108-118, 1989.
  • Sackett, James, ‘François Bordes and the Old Stone Ageʼ, Bulletin of the History of Archaeology, 24: 2014.
  • https://www.archaeologybulletin.org/articles/10.5334/bha.243/print/
  • https://www.oxfordreference.com/view/10.1093/oi/authority.20110803095518725
  • https://peoplepill.com/people/francois-bordes
  • https://www.researchgate.net/publication/276191419

                                                                                                                                                                                   समीक्षक : जयेंद्र जोगळेकर