ग्यरदाँ, जाँ-क्लुड : (३ एप्रिल १९२५ – ८ एप्रिल २०१३). पुरातत्त्वीय सिद्धांतात योगदान देणारे आणि पुरातत्त्वीय संशोधनात गणित, तर्कशास्त्र आणि संगणकाचा उपयोग करण्याचा आग्रह धरणारे फ्रेंच पुरातत्त्वज्ञ. त्यांचा जन्म पॅरिसमध्ये झाला. दुसऱ्या महायुद्धात १९४० मध्ये फ्रान्सचा पाडाव झाल्यानंतर ते इंग्लंडला गेले आणि तेथे शार्ल द गॉल यांनी स्थापन केलेल्या फ्री फ्रेंच सैन्यामध्ये (Forces françaises libres) सेवा बजावली. या सेवेतील त्यांच्या असामान्य कामगिरीसाठी त्यांना मिलिटरी क्रॉस (Croix de guerre) देऊन सन्मानित करण्यात आले होते.

महायुद्ध संपल्यावर (१९४५) ग्यरदाँनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये प्रवेश घेतला आणि १९४८ मध्ये अर्थशास्त्रात बी.एस्सी. पदवी मिळवली (१९४८). फ्रान्सला परतल्यावर त्यांनी सॉबॉन विद्यापीठात (University of Sorbonne) पुढील उच्च शिक्षण घेतले. तेथे त्यांनी संगणक आणि माहिती विज्ञानाचा अभ्यास केला. सुरुवातीच्या संशोधनात त्यांनी पुरातत्त्वीय नोंदींचे आयोजन, वर्गीकरण आणि सूचीकरण करण्यासाठी संगणकाच्या वापरावर लक्ष केंद्रित केले. जेव्हा संगणक आणि संगणन (computing) ही संकल्पना बाल्यावस्थेत होती. त्या वेळी या साधनांचा पुरातत्त्वात उपयोग करता येईल, हे मांडण्यातील त्यांचा द्रष्टेपणा लक्षणीय आहे. नंतरच्या काळात जरी त्यांना पुरातत्त्वीय संशोधनात अर्थबोधात्मक (cognitive) आणि चिन्हविज्ञानाच्या (semiotics) पद्धतींच्या वापरात रस निर्माण झाला असला, तरी ते अखेरपर्यंत पुरातत्त्वीय संगणनाच्या (archaeological computing) क्षेत्रात कार्यरत होते. विशेषतः पुरातत्त्वीय संशोधनात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI- artificial intelligence) उपयोगासंबंधी त्यांनी मूलगामी सैद्धांतिक मांडणी केली आहे. तसेच ग्यरदाँ यांना मानवी संस्कृतीच्या प्रगतीमधील तंत्रज्ञानाची भूमिका आणि स्थानिक अथवा पारंपरिक ज्ञान यांच्यातील संबंधांमध्ये रस होता.

तसेच त्यांनी अफगाणिस्तान व पाकिस्तानातील सिंधू नदीच्या खोऱ्यात संशोधन केले. त्यांनी आपल्या संशोधनात गणिताचा भरपूर वापर केला आणि म्हणूनच ते पुरातत्त्वातील तर्कवादाचे (logicism) प्रणेते मानले जातात. त्यांच्या पुरातत्त्वीय सिद्धांतांच्या संदर्भातील या योगदानाचा यूरोपीय पुरातत्त्वज्ञांवर मोठा प्रभाव होता. अमेरिकन पुरातत्त्वज्ञांमध्ये ग्यरदाँ हे प्रक्रियावादी (processualist) मानले जातात, परंतु त्यांच्या लेखनामध्ये दिसणारी चिन्हविज्ञानाच्या वापराची त्यांची पद्धत प्रक्रियावादी पुरातत्त्वाच्या पलीकडे जाणारी आहे.

ग्यरदाँ यांनी १९५८ मध्ये संगणनावर आधारीत पुरातत्त्वीय माहिती विश्लेषण केंद्राची स्थापना केली. ते पॅरिसमधील सांत्र नासिओनाल दी ला रिसर्शे सँतिफिक (CNRS- Centre National de la Recherche Scientifique) या संस्थेशी संबंधित होते. त्यांनी पॅरिसमध्ये सांत्र दी रिसर्शे आर्किओलोजिक (Centre de Recherches Archéologiques) या पुरातत्त्वीय संशोधन केंद्राची स्थापना केली (१९७०).

ग्यरदाँ यांना पुरातत्त्वीय संशोधनातून मिळणारी माहिती जगभरात सर्वांना खुली असावी, असे वाटत असे. त्यासाठी त्यांनी संगणकाच्या मदतीने एक जागतिक माहितीप्रणाली उभी करण्यासाठी आर्किओटेक (Arkeotek- European Association for the Archaeology of Techniques) या संस्थेची स्थापना केली. पुरातत्त्वीय माहिती केवळ डिजिटल स्वरूपात उपलब्ध करणे, यापेक्षा ती वापरून निष्कर्ष काढावेत यासाठी सर्वांना प्रशिक्षण देणे हा या संस्थेचा मुख्य उद्देश आहे.

ग्यरदाँ काही काळ अमेरिकेतील इंडियाना विद्यापीठाशी संलग्न होते. फिसेन फाउंडेशनने (Fyssen Foundation) आंतरराष्ट्रीय पारितोषिक देऊन त्यांचा सन्मान केला (१९८८).

विख्यात चित्रपट अभिनेता चार्ली चॅप्लिन यांची कन्या जोसेफाइन हॅना चॅप्लिन (जन्म १९४९) हिच्याशी ग्यरदाँ विवाहबद्ध झाले होते (१९८९). त्यांना आर्थर ग्यरदाँ हा मुलगा आहे.

ग्यरदाँ यांचे पॅरिस येथे निधन झाले.

संदर्भ :

  • Ammons, Michelle, ‘Gardin, Jean-Claudeʼ, Encyclopedia of Global Archaeology (Ed., Claire Smith), pp. 4440-4441, Springer, 2020.
  • Gardin, J. C. ‘Artificial intelligence and the future of semiotics: An archaeological perspectiveʼ, Semiotica, 77: 5-26, 1989.
  • Gardin, J. C. ‘Four codes for the description of artefacts: An essay in archaeological technique and theoryʼ, American Anthropologist, 60: 335–357, 1958.

                                                                                                                                                                                  समीक्षक : जयेंद्र जोगळेकर