खत्री, आत्मा प्रकाश : (८ एप्रिल १९३२–१७ नोव्हेंबर २००४). विख्यात प्रागैतिहासिक पुरातत्त्वज्ञ आणि पुरामानवशास्त्रज्ञ.  त्यांचा जन्म बवहाळपूर (पाकिस्तान) येथे झाला. फाळणीनंतर त्यांचे कुटुंब भारतात आले. त्यांचे सर्व शिक्षण पंजाबमध्ये झाले. बी.एस्सी. व एम.एस्सी. या पदव्या प्राप्त केल्यावर त्यांनी पुणे येथे डेक्कन कॉलेजात पुरातत्त्व विषयात डॉक्टरेटसाठी प्रवेश घेतला व प्रा. ह. धी. सांकलिया यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच. डी. प्राप्त केली (१९५७). ‘स्टोन एज कल्सर्च ऑफ माळवा (सेंट्रल इंडिया)ʼ हा त्यांच्या प्रबंधाचा विषय होता.

खत्री यांनी गुवाहाती (गौहाती) विद्यापीठात व्याख्याता, हार्वर्ड विद्यापीठात सिनियर रिसर्च फेलो (वरिष्ठ छात्र संशोधक), पॅरिसमधील इन्स्टिट्यूट ऑफ पॅलिओंटॉलॉजीत सिनियर रिसर्च सायंटिस्ट (वरिष्ठ संशोधक वैज्ञानिक) व सीएसआयआर रिसर्च प्रोफेसर (संशोधक प्राध्यापक) आदी विविध पदांवर काम केले.

हिमाचल प्रदेशात मनालीजवळ राहणाऱ्या कुलवी आणि लाहुली या जमातींचा मानवमिती (Anthropometry) दृष्टिकोनातून खत्री यांनी अभ्यास केला. तसेच त्यांनी सिंधू, लिडर आणि झेलम या नद्यांच्या खोऱ्यातील प्लायस्टोसीन कालखंडाच्या निक्षेपांवर संशोधन केले. सतलज नदीचे खोरे आणि हरितालयानगर या गावाजवळील जीवाश्म असलेल्या शिवालिक निक्षेपांवरील आपले निष्कर्ष त्यांनी प्रकाशित केले. या खेरीज खत्री यांनी राजस्थानातील गंभीरी, आंध्र प्रदेशात गोदावरी व मध्य प्रदेशात नर्मदा या नद्यांच्या खोऱ्यांमध्ये प्रागैतिहासिक अवजारे व पर्यावरण याबद्दल दीर्घकाळ संशोधन केले.

खत्री यांनी भारताबाहेरही भरपूर संशोधन केले. त्यात फ्रान्समधील डोर्डोन नदीचे खोरे, ले इझे जवळील आब्री पतॉ (Abri Pataud) हे उत्तर पुराश्मयुगीन स्थळ, निअँडरथल मानवाची वसती असलेली रागोर्दु (Ragordu) ही गुहा, इथिओपियात रिफ्ट व्हॅली आणि अमेरिकेतील पुलमन गावाजवळ स्नेक नदीच्या काठावरील अमेरिकन इंडियन लोकांची प्राचीन वसाहत यांचा समावेश होता.

भारतीय प्रागैतिहासिक इतिहासातील खत्री यांचे योगदान दोन बाबतींत आहे. जर्मन भूवैज्ञानिक हेल्मुट डी टेरा (१९००-१९८१) आणि स्कॉटिश  पुराजीवशास्त्रज्ञ टी. टी. पॅटरसन (१९०९-१९९४) यांनी भारतात मिळालेल्या पुरापुराश्मयुगीन दगडी अवजारांचे वर्गीकरण ‘सोनियन संस्कृतीʼत (Soanian culture) केले होते. खत्री यांनी या निष्कर्षाशी असहमती दर्शवली. खत्रींनी भारतात पुरापुराश्मयुगीन काळात अश्युलियनपूर्व (pre-Acheulian) संस्कृती असल्याचे मत मांडून तिला ‘महादेवियनʼ (Mahadevian culture) असे नाव दिले. तसेच त्यांनी ही संस्कृती व आफ्रिकेतील ओल्डोवान संस्कृती (Oldowan industry) यांच्यात साम्य असल्याचे प्रतिपादन केले. खत्रींच्या कामामुळे १९६०-७० या दशकात भारतीय पुराश्मयुगाच्या क्रमामध्ये मोठा बदल घडून आला; तथापि पुढे संशोधनातून नर्मदा नदीच्या खोऱ्यात अश्युलियनपूर्व संस्कृती नव्हती व तेथील स्तररचना (stratigraphy) अधिक गुंतागुंतीची होती, असे सिद्ध झाले.

खत्री यांचे रोजी निधन झाले.

संदर्भ :

  • De Terra, H. & Paterson, T. T. Studies on the Ice Age in India and Associated Human Cultures, Carnegie Institution, Washington DC, 1939.
  • Gupta, S. P.  ‘A. P. Khatri (1932–2004)ʼ, Puratattva, 34: viii, 2003-2004.
  • Khatri, A. P. ‘Origin and development of Series II culture in Indiaʼ, Proceedings of the Prehistoric Society,  28: 191-208, 1962.

                                                                                                                                                                                           समीक्षक : शंतनू वैद्य