जोशी, जगतपती : (१४ जुलै १९३२ – २७ जून २००८). भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाचे माजी महासंचालक व सिंधू संस्कृतीच्या अनेक स्थळांचे उत्खनन करणारे पुरातत्त्वज्ञ. त्यांचा जन्म अल्मोडा (उत्तराखंड) येथे झाला. त्यांच्या आईचे नाव माहेश्वरी देवी आणि वडिलांचे नाव पंडित हरीशचंद्र जोशी होते. जोशी यांनी अल्मोडा पदवी महाविद्यालयातून पदवी अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर ते लखनौ विद्यापीठात दाखल झाले आणि तेथून एल.एल.बी. पदवी मिळवली (१९५३). पुढे ते प्राचीन भारतीय इतिहास, पुरातत्त्व आणि संस्कृती विषयात एम. ए. उत्तीर्ण झाले (१९५४). ‘प्राचीन नाण्यांवरील मिथ्थकांचे अंकनʼ या विषयावर त्यांनी सादर केलेल्या प्रबंधाला सुवर्णपदक मिळाले होते.

भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाच्या नागपूर येथील उत्खनन शाखेतर्फे डॉ. एन. आर. बॅनर्जी यांच्या नेतृत्वात मध्य प्रदेशात नागदा येथे उत्खनन सुरू होते. जोशी यांनी तेथे पुरातत्त्वशास्त्राच्या क्षेत्रीय प्रशिक्षणासाठी प्रवेश घेतला (१९५५) आणि त्याच वर्षी ते भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाच्या सेवेत नागार्जुनकोंडा येथे रुजू झाले. त्यांनी बी. बी. लाल यांच्या हाताखाली गिलुंड या राजस्थानातील ताम्रपाषाणयुगीन स्थळाच्या उत्खननात सहभाग घेतला (१९५९-६०). भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाने लाल यांच्या नेतृत्वात राजस्थानातील कालिबंगा या हडप्पा संस्कृतीच्या महत्त्वाच्या स्थळाचे उत्खनन केले १९६०-६९). त्यात जोशी यांचा मोठा सहभाग होता. तसेच त्यांना बी. के. थापर यांच्या हाताखाली कालीबंगा येथील उत्खननात सहभागी होण्याची संधी मिळाली (१९६२-६३).

जोशी यांची उपअधीक्षक पुरातत्त्वज्ञ या पदावर बडोदा येथे नेमणूक झाली (१९६४). या पदावर असताना पुढील पाच वर्षे त्यांनी कच्छ भागात विस्तृत सर्वेक्षण केले. या कामामुळे गुजरातमधील हडप्पा संस्कृतीच्या अभ्यासात नवीन माहितीची भर पडली. या दरम्यान त्यांनी धोलावीरा व सुरकोटडा या प्रसिद्ध स्थळांचा शोध लावला. भारतीय पुरातत्त्वासाठी १९६०-७० या दशकात जोशी यांचे हे योगदान महत्त्वपूर्ण मानले जाते.

जोशी नागपूर येथे अधिक्षक पुरातत्त्वज्ञ झाले (१९६८). त्यांच्या नागपूर येथील कार्यकाळात भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाने अनेक संस्थांशी लक्षणीय शैक्षणिक सहकार्य केले. त्यात नागपूर विद्यापीठाचा समावेश होता. शां. भा. देव आणि जोशी यांनी आपापल्या सहकाऱ्यांच्या मदतीने पौनी येथे दोन स्तूप शोधले. बडोदा येथे असताना जोशी यांनी १९६७ मध्ये केंब्रिज विद्यापीठातील एफ. आर. अल्चिन यांच्यासह गुजरातच्या पश्चिम किनारपट्टीवर सर्वेक्षण केले होते (१९६७). या संशोधनाचा पुढचा टप्पा म्हणून १९७० मध्ये दोघांनी संयुक्तपणे मालवण येथे उत्तर हडप्पा काळातील स्थळाचे उत्खनन केले.

जोशी यांनी १०७१-७२ मध्ये सुरकोटडाचे उत्खनन केले. सुरकोटडा येथील उत्खननाने कच्छमधील हडप्पा संस्कृतीच्या अभ्यासात नवीन माहितीची भर पडली. तसेच या स्थळावर घोड्यांची हाडे व दात मिळाले असल्याचे अनुमान काढण्यात आल्यावर (हे अवशेष रानगाढवांचे असल्याचे काहींचे मत असल्याने) मोठे वादविवाद झाले. हडप्पा संस्कृतीत घोडा होता की, नाही या विषयी दीर्घकाळ चालू असलेल्या वादविवादाला या उत्खननाने प्रारंभ झाला. जोशी यांनी १९७५-७६ मध्ये हरयाणातील कुरुक्षेत्र जिल्ह्यात सर्वेक्षण केले आणि काशीताल या स्थळाचे उत्खनन केले. येथे त्यांना राखाडी चित्रित मृद्भांडी वापरणाऱ्या संस्कृतीचे (PGW) व ऐतिहासिक  काळातील अवशेष मिळाले. येथे तीन वेळा सरस्वती नदीला आलेल्या महापुरांचा महत्त्वाचा पुरावा आढळला. राखाडी चित्रित मृद्भांडी वापरणाऱ्या संस्कृतीचा व उत्तर हडप्पा काळातील स्थळांचा संबंध शोधण्यासाठी जोशी यांनी १९७६-७७ मध्ये हरयाणा (भगवानपुरा, जिल्हा कुरुक्षेत्र), पंजाब (नगर, जिल्हा जालंधर) आणि जम्मू व काश्मीर (मांडा, जिल्हा जम्मू) या क्षेत्रांत विस्तृत संशोधन केले.

जोशी १९८२ मध्ये अतिरिक्त महासंचालक झाले. अतिरिक्त महासंचालक या नात्याने, त्यांनी विस्तृत दौरे केले आणि विशेषतः उत्तर भारतातील स्मारकांचे संवर्धन केले. त्यांनी परदेशात भारतीय पुरातत्त्वज्ञांच्या पथकाचे दोन वेळा (कोलंबो १९८८ आणि इस्लामाबाद १९८९) नेतृत्व केले होते. ते १९८७ मध्ये महासंचालक झाले आणि त्या पदावरून १९९० मध्ये सेवानिवृत्त झाले.

सेवानिवृत्तीनंतर जोशी यांनी सालारजंग म्युझियम (हैदराबाद), भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण, अलाहाबाद म्युझियम व नॅशनल म्युझियम (दिल्ली) अशा अनेक संस्थांसाठी सल्लागार या नात्याने योगदान दिले. तसेच त्यांनी ह. धी. सांकलिया स्मृतिव्याख्यान (१९९८) व वाय. डी. शर्मा स्मृतिव्याख्यान (२००४) अशी अनेक व्याख्याने दिली. भारतीय पुरातत्त्व परिषदेच्या कन्याकुमारी येथील अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते (१९९०).

जोशी यांनी केलेल्या सर्व उत्खननांचे अहवाल प्रकाशित केले. त्यांच्या प्रकाशित पुस्तकांमध्ये पौनी एस्कव्हेशन्स (सहलेखक शां. भा. देव, १९७२), कॉर्पस ऑफ इंडस सील्स (सहलेखक आस्को पार्पोला, १९८७), एस्कव्हेशन ॲट सुरकोटडा अँड अदर एक्सप्लोरेशन्स इन कच्छ (१९९०), एस्कव्हेशन ॲट भगवानपुरा (१९९३), एस्कव्हेशन्स ॲट मालवण (सहलेखक एफ. आर. अल्चिन, १९९५) आणि एस्कव्हेशन्स ॲट कालिबंगा (सहलेखक बी. बी. लाल, बी. के. थापर आणि मधुबाला, २००३, २०२०) यांचा समावेश आहे.

त्यांच्या पुरातत्त्वातील उल्लेखनीय योगदानाबद्दल इंडियन सोसायटी फॉर प्रिहिस्टॉरिक अँड क्वाटर्नरी स्टडीज या संस्थेने आर. के. शर्मा पुरस्काराने त्यांना सन्मानित केले (२००७). भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाचे सी. मार्गबंधू व त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी २०१२ मध्ये जोशी यांच्या सन्मानार्थ पुराजगत हा दोन खंड असणारा गौरवग्रंथ प्रकाशित केला.

दिल्ली येथे त्यांचे निधन झाले.

संदर्भ :

  • Annonymous , ‘Jagat Pati Joshiʼ, Puratattva, Vol. 38, 2008.
  • Mani, B. R.; Ray, Purnima & Patil, C. B. Remembering Stalwarts, Archaeological Survey of India, New Delhi, 2014.

                                                                                                                                                                                        समीक्षक : शंतनू वैद्य