दक्षिण महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील एक महत्त्वाचे ऐतिहासिक पुरातत्त्वीय स्थळ. कृष्णा व कोयना या नद्यांच्या संगमावर हे स्थळ वसलेले आहे.
लिखित पुराव्यांनुसार कराड हे प्राचीन काळातील करहाटक असल्याचे मत प्रचलित होते. कराडच्या जवळील टेकड्यांमध्ये ६३ बौद्ध लेणी असून तेथील ब्राह्मी शिलालेखांच्या आधारे त्या इ. स. पू. दुसऱ्या शतकातील असल्याचे दिसते. या पुराव्यांवरून कराडचे प्राचीनत्व स्पष्ट होते. पुणे येथील भारत इतिहास संशोधक मंडळाने कराड शहराच्या प्राचीन इतिहासाचा मागोवा घेण्यासाठी पुरातत्त्वीय सर्वेक्षण आणि उत्खननाचे कार्य हाती घेतले (१९४८-४९). या कार्याचे नेतृत्व मंडळाचे ग. ह. खरे (१९०१–१९८५) यांच्याकडे होते. त्यांनी ह. धी. सांकलिया व मोरेश्वर दीक्षीत यांच्या हाताखाली कोल्हापूर येथील पुरातत्त्वीय उत्खननात प्रशिक्षण घेतले होते.
कराड शहराच्या सर्वेक्षणात कृष्णा-कोयना संगमाच्या जवळ पक्की तटबंदी असलेले टेकाड आढळले. या टेकाडाला ‘पंताचा कोटʼ असे नाव होते. ही गढी अठराव्या शतकातील असून नदीच्या पुरामुळे टेकाडाच्या काही भागाची धूप होऊन प्राचीन अवशेष उघडे पडले होते. कोटात एक पायऱ्यांची विहीर आणि काही शोषखड्डे (soak pits) असा वापर केलेल्या इतर काही विहिरी आढळल्या. ८ × ८ मी. अशा खड्ड्याच्या उत्खननात एकूण सात स्तर आढळले. स्तर ७ ते ३ यांचा कालखंड सातवाहन काळ (इ.स.पू. २०० ते इ.स. ४००) असा निश्चित करण्यात आला. स्तर ७ यात शिसे धातूचे सातवाहन नाणे (१.८१४ ग्रॅम) आढळले. त्याच्या एका बाजूला घोडा, तर दुसऱ्या बाजूला धनुष्याचे अंकन आहे. स्तर ४ यात कोणतेही पुरावशेष न मिळाल्याने कराडची वस्ती काही काळ ओसाड पडल्याचे दिसले. स्तर १ व २ यांचा काळ ठरवता आला नाही. या वरच्या दोन थरांमध्ये मिळालेली घरे कच्ची, मातीची आणि तात्पुरत्या स्वरूपाची होती.
उत्खननात विविध आकाराची मातीची भांडी (थाळ्या, पाणी साठवण्याचे घडे, चंबू, हंड्या, माठांची झाकणे) मिळाली. त्यात स्थनिक भाषेत ‘ठावकेʼ या नावाने ओळखले जाणारे कपदेखील होते. विविध थरांमध्ये अनेक प्रकारचे मणी मिळाले. त्यात काचेचे (गडद निळे, हिरवे व सोनेरी), भाजलेले मातीचे, शंखांचे, दगडांचे (कार्नेलियन, लाल जास्पर आणि स्फटिक) मणी समाविष्ट होते. तसेच काच व शंखांच्या बांगड्या, शंखांचे दागिने बनवताना वाया गेलेले भाग (shell waste), भाजलेल्या मातीच्या प्रतिमा (हत्ती व स्त्री), हाडाच्या वस्तू आणि लोखंडाच्या वस्तू (खिळे व छिन्नी) उत्खननात मिळाल्या.
कराडचे उत्खनन व तेथील संशोधन हे अनेक दशकांनंतरही वैशिष्ट्यपूर्ण आहे. भारतात पुरातत्त्वीय संशोधनाच्या सुरुवातीच्या काळात सांस्कृतिक कालखंडांचे स्वरूप धूसर असून अद्याप संशोधन पद्धतींचा विकास होत होता. तसेच अत्यल्प अपवाद वगळता पुरातत्त्वीय संशोधन हे भारतीय पुरातत्त्वीय सर्वेक्षण या सरकारी संस्थेकडूनच केले जात असे. कराडचे उत्खनन हे महाराष्ट्रात कोणत्याही खासगी संस्थेने केलेले पहिले उत्खनन होते. तसेच इतिहासाच्या अभ्यासात पुरातत्त्वीय पुरावे उपयुक्त ठरतात, या बाबत सर्वसाधारपणे फारसा विश्वास ठेवला जात नसे, अशा काळात पुणे येथील भारत इतिहास संशोधक मंडळाने केलेले उत्खनन आणि त्याचा काटेकोरपणे पुरातत्त्वीय वैज्ञानिक पद्धतीने ताबडतोब प्रसिद्ध केलेला अहवाल हे लक्षणीय ठरतात.
संदर्भ :
- Anonymous, Explorations at Karad, Bharat Itihasa Samshodhaka Mandala, Pune, 1949.
समीक्षक : शंतनू वैद्य