आंध्र प्रदेशातील एक आदिवासी जमात. या जमातीतील लोक मुख्यत: आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम या जिल्ह्यात विखुरलेले दिसतात. यांना मुलीआ किंवा मुलीया असेही म्हणतात. कुलीया जमातीची लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार ३८५ इतकी होती. कुलीया जमातीच्या लोकांची संख्या फार कमी आहे. या जमातीबद्दल फारशी माहिती उपलब्ध होत नाही.
कुलीया जमातीमध्ये अनेक गोत्र असून नागा (नाग), मस्त्य (मासा), अलामा (मर्कट), सूर्य ही प्रमुख गोत्रे आहेत. यांशिवाय वंथाला, मात्ताम, गोल्लोरी, कोरा इत्यादी त्यांच्यातील बहिर्विवाही कुलनामे आहेत. ते आपापसांत तेलुगु व इतरांबरोबर ओडिया भाषा बोलतात. कुलीया लोक बगाटा जमातीतील लोकांकडून शिजवलेले अन्न व पाणी स्वीकारतात; परंतु वाल्मिकी जमातीबरोबर हे व्यवहार निषिद्ध मानतात.
कुलीया जमात पितृसत्ताक असून कुटुंब पैतृक अधिकाराने चालते. शेती हा त्यांचा प्रमुख व्यवसाय आहे. सर्वसामान्यपणे ते मांसाहारी असून भात हे त्यांचे मुख्य अन्न आहे. त्यांच्यात असगोत्र विवाह किंवा बहिर्विवाह पद्धती आढळून येते. ‘मेनारीकम’ परंपरेनुसार मोठ्या बहिणीच्या मुलीशी म्हणजेच मामा-भाशीचे तसेच मामाच्या किंवा आत्याच्या मुलीशी विवाह करण्यास मान्यता आहे. त्यांच्यात सामान्यपणे एकपत्नीत्वाची पद्धत आढळून येते. घटस्फोट किंवा पुनर्विवाहास मान्यता असून घटस्फोटानंतर पतीकडून घटस्फोटित पत्नीला वधुमूल्य परत करणे बंधनकारक असते.
कुलीया लोक त्यांच्या पारंपरिक आदिवासी देवांना भजतात; तर काही लोक हिंदू देवतांची पुजा करतात. ‘कुलपंचायत’ ही पारंपरिक समिती जमातीतील तंटे सोडविण्याचे काम करते. तसेच कुलीयांचे ‘कोथापंदुगा’ आणि ‘इतिकालापंदुगा’ हे पारंपरिक सण आयोजित करण्याची जबाबदारी या समितीवर असते. कुलीया लोकांचा भूतांवर विश्वास आहे.
संदर्भ : Sing, K. S., India’s Communities, Vol. III, Delhi, 1997.
समीक्षक : शौनक कुलकर्णी