मिरजकर, मेहबूब खॉं : (१८६८ – २८ ऑगस्ट १९६५) भारतातील फरूखाबाद घराण्याचे ख्यातकीर्त तबलावादक. त्यांचा जन्म पुणे येथे झाला. लहानपणापासून त्यांना तबलावादनाची आवड होती. यासाठी त्यांनी घर सोडले आणि  उ. जुगना खान यांचे शिष्यत्व पतकरले. त्यावेळी जुगना खानही प्रसिद्ध तबलावादक नन्हे खान यांच्याकडे तबल्याच्या आणखी वेगवेगळ्या रीती शिकत होते. दहा वर्षे त्यांच्याकडे शिकल्यानंतर पुढचे शिक्षण त्यांनी इंदूरचे लखनौ बाजाचे उस्ताद जहांगीर खॉं यांच्याकडे घेतले. तसेच पंडित बळवंतराव वाटवे यांच्याकडेही त्यांनी तबलावादनातील अनेक रीतींचे शिक्षण घेतले. अनेक घराण्यांच्या तबलावादकांकडून शिकल्यामुळे त्यांना तबलावादनातील त्या-त्या घराण्याचे मर्म समजत गेले. त्यानुसार त्यांनी स्वत:ची वादनाची वेगळी शैली विकसित केली. स्वतंत्र वादन व साथसंगत या दोहोंवर त्यांचे कमालीचे प्रभुत्व होते. उ. अब्दुल करीम खॉं, रोशन आरा बेगम, पं. मल्लिकार्जुन मन्सूर, पं. सवाई गंधर्व, पं. गजाननराव जोशी, पं. जगन्नाथ बुवा पुरोहित यांसारख्या हिंदुस्थानी संगीतातील प्रसिद्ध आणि ज्येष्ठ कलाकारांची त्यांनी साथसंगत केलेली आहे.

मेहबूब खॉं यांनी मुक्तहस्ताने विद्यादान केले. त्यांच्या या स्वभावामुळे त्यांनी अनेक शिष्य घडविले. त्यांच्याकडे संगीतातील अनेक दुर्मीळ चिजांचा संग्रह होता. त्यांच्या कार्यक्षेत्रात म्हणजेच कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे येथे त्यांनी तबल्याचा खूप प्रसार केला. त्यांच्या शिष्यांमध्ये म्हम्हूलाल सांगावकर, वसंतराव भेंडिगिरी, नारायणराव चिक्कोडी, अब्बास कवठेकर, बाबासाहेब मिरजकर, राजाराम जाधव, रमाकांत देवळेकर, गणपत पर्वतकर, शेख दाऊद, मधुकर गणेश गोडबोले इत्यादी कलाकार उल्लेखनीय असून त्यांचे पुत्र अब्दुल खान मिरजकर, हनीफभाई मिरजकर व नातू नवाज मिरजकर यांनी त्यांच्या घराण्याचा वारसा पुढे चालविला आहे. नवाज मिरजकर यांच्या ‘तालविश्व’ या संस्थेतर्फे ‘उस्ताद मेहबूब खाँसाहेब मिरजकर’ या नावाने संगीत क्षेत्रात तबलावादनाने वेगळी ओळख निर्माण केलेल्या कलाकारांना पुरस्कार दिला जातो.

मेहबूब खॉं यांचे पुणे येथे निधन झाले. पुणे महानगरपालिकेने त्यांचे निवासस्थान असलेल्या मार्गाला त्यांचे नाव दिले आहे.

संदर्भ :

https://www.nawazmirajkar.com/

समीक्षक : सुधीर पोटे